रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

सुरक्षिततेशी तडजोड न करता भांडवली खर्च कमी करण्यासाठी भारतात बोगदे खोदण्याच्या आधुनिक संकल्पना आत्मसात करण्याची गरज- नितीन गडकरी

Posted On: 05 MAY 2021 7:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 मे 2021

 
बोगदे खोदण्याच्या अद्ययावत संकल्पना आत्मसात करून घेण्याची भारताला गरज आहे, जेणेकरून मोठ्या भांडवली खर्चात कपात करता येईल, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग तथा सूक्ष्म, लघु आणि माध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. बोगद्यांजवळ स्मार्ट शहरे विकसित करून, तसेच रस्ते वाहतूक सुविधा आणि अन्य सोयीसुविधा उभारून महसुलात वाढ करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

'रस्त्यांवरील बोगद्यांविषयीच्या' आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ते आज बोलत होते. या बोगद्यांबाबतीत नवीन प्रकार, त्यातील अभिनव संकल्पना आणि नव्या दिशा- अशा व्यापक विषयावर या वेबिनारमधे चर्चा झाली. 'प्रि-कास्ट तंत्रज्ञान' वापरून बोगदे आणि नदी / सागरांखालील जलमग्न बोगदे खोदण्याच्या पद्धतींकडे लक्ष देण्याची गरज गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली. "सुरक्षेशी तडजोड न करता भांडवली खर्च कमी करणारे स्वस्त, किफायतशीर आणि अद्ययावत बोगदा-निर्मिती तंत्रज्ञान घेऊन या क्षेत्रातील भागीदारांनी व हितसंबंधीयांनी पुढे यावे", असे आवाहनही त्यांनी केले. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची लांबी 1.37 लाख किलोमीटर असून एकूण रहदारीच्या 40% भाग त्यावरून देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत प्रवास करतो असेही मंत्रिमहोदयांनी सांगितले. बोगदे खोदण्यासाठी जगभरातील उत्तमोत्तम तंत्रज्ञान आत्मसात आणि स्वीकृत करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

या वेबिनारमध्ये, रस्ते आणि महामार्ग राज्यमंत्री जनरल (निवृत्त) डॉ.व्ही.के.सिंग म्हणाले, "दुर्गम आणि हिवाळ्यात टोकाच्या हवामानामुळे संपर्क तुटणाऱ्या क्षेत्रांपर्यंत पोहोचता येण्यासाठी अधिकाधिक बोगदे तयार करण्यावर मंत्रालयाचा भर आहे."

भारतीय रस्ते परिषद, रस्ते आणि महामार्ग मंत्रालय आणि जागतिक रस्ते संघटना- यांनी एकत्रितपणे या वेबिनारचे आयोजन केले होते.

पूर्ण कार्यक्रम आपणास पुढील लिंकवर पाहता येईल-  https://www.youtube.com/watch?v=LHuZRuUvxUM

 

 

* * *

M.Chopade/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1716336) Visitor Counter : 152