संरक्षण मंत्रालय
समुद्र सेतू II या मोहिमेसाठी भारतीय नौदलाची सात जहाजे तैनात
Posted On:
01 MAY 2021 6:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 मे 2021
कोविड -19 विरूद्धच्या देशाच्या लढ्याचे समर्थन करण्यासाठी आणि ‘समुद्र सेतु II’ या मोहिमेचा एक भाग म्हणून, विविध देशांमधून द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनने भरलेल्या क्रायोजेनिक कंटेनर आणि संबंधित वैद्यकीय उपकरणे आणण्यासाठी सात भारतीय नौदल नौका आयएनएस कोलकाता, आयएनएस कोची, आयएनएस तलवार, आयएनएस तबर, आयएनएस त्रिकंद, आयएनएस जलाश्व आणि आयएनएस ऐरावत तैनात करण्यात आल्या आहेत.
आय.एन.एस. कोलकाता व आय.एन.एस. तलवार हा पर्शियन आखातात तैनात केलेला पहिला जहाजांचा ताफा होता ज्यांना त्वरित या कामासाठी वळविण्यात आले आणि त्यांनी 30 एप्रिल 21 रोजी मनामा, बहरीन बंदरात प्रवेश केला.
आयएनएस तलवार हे 40 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन (एलएमओ) घेऊन मायदेशी परतले आहे.
आयएनएस कोलकाता वैद्यकीय पुरवठा मिळवण्यासाठी दोहा, कतार येथे रवाना झाले आहे आणि त्यानंतर द्रवरूप ऑक्सिजन टाक्या आणण्यासाठी ते कुवेतला मार्गस्थ होईल.
तसेच, पूर्वकिनारपट्टीवर , आयएनएस ऐरावतलासुद्धा या कामासाठी वळविण्यात आले आहे, तर गेल्या वर्षी समुद्र सेतू मोहिमेदरम्यान महत्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या आयएनएस जलाश्वची देखभाल दुरुस्ती करून या मोहिमेच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी त्याला तैनात करण्यात आले आहे.
द्रवरूप ऑक्सिजन टाक्या आणण्यासाठी आयएनएस ऐरावत सिंगापूरमध्ये दाखल होणार आहे आणि अल्प मुदतीच्या सूचनेनुसार वैद्यकीय साठा आणण्यासाठी आयएनएस जलाश्वलाही त्या प्रांतात सज्ज ठेवण्यात आले आहे.
अरबी समुद्रात तैनात आयएनएस कोची, आयएनएस त्रिकंद आणि आयएनएस तबर या दुसर्या तुकडीलाही राष्ट्रीय प्रयत्नात सामील करून घेण्यात आले आहे
दक्षिणी नौदल कमांडमधून आयएनएस शार्दुल या मोहिमेमध्ये 48 तासात सामील होण्यासाठी सज्ज आहे.
कोविड -19 विरूद्धच्या देशाच्या लढ्यात गरजेनुसार अधिक नौका तैनात करण्याची भारतीय नौदलाची क्षमता आहे.
समुद्र सेतू मोहीम गेल्या वर्षी नौदलाने सुरू केली होती आणि कोविड -19 च्या उद्रेकात शेजारच्या देशांमध्ये अडकलेल्या सुमारे 4,000 भारतीय नागरिकांना यशस्वीरित्या मायदेशी आणण्यात आले होते .
Jaydevi PS/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1715389)
Visitor Counter : 306