उपराष्ट्रपती कार्यालय
कोविड-19 विरोधात उभ्या ठाकलेल्या आघाडीवरील महिला योद्ध्यांची उपराष्ट्रपतींकडून प्रशंसा
भारतीय उद्योग महासंघाच्या महिला संघटनेच्या 'वन्दे मातरम' या कार्यक्रमाला श्री.नायडू यांनी केले संबोधित
Posted On:
30 APR 2021 6:54PM by PIB Mumbai
भारतातील महिला श्रमिकांचे प्रमाण जवळपास 20 टक्के इतके असल्याचे नमूद करत उपराष्ट्रपती एम.वेंकैया नायडू यांनी, "भारताच्या जलदगती विकासासाठी उद्योगजगताने लोकसंख्येतील स्त्रियांचे प्रमाण लक्षात घेऊन त्यानुसार त्यांना संधींची कवाडे खुली करून दिली पाहिजेत" अशी अपेक्षा व्यक्त केली.
फिक्की अर्थात भारतीय उद्योग महासंघाच्या महिला संघटनेच्या हैदराबाद विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. "आपल्या महत्त्वपूर्ण लोकसंख्यात्मक लाभांशाचा चांगल्या पद्धतीने फायदा उठवू शकतो, असे आपण अभिमानाने म्हणतो." असे ते म्हणाले. उद्योगजगतातील श्रमिकदलाचे नेतृत्व स्त्रियांकडे गेल्यास अधिक जलद गतीने विकास साधता येईल, यावर त्यांनी भर दिला. "या बौद्धिक साठ्यातून आपण सर्वोत्कृष्ट असे काही शोधून काढले पाहिजे , जेणेकरून आपली अर्थव्यवस्था पूर्ण ताकदीनिशी आगेकूच करेल. आपल्या भविष्यातील विकासाच्या नेतृत्वाची धुरा स्त्रियाच वाहणार आहेत", असेही उपराष्ट्रपती म्हणाले.
वेतनातील असमानतेचा उल्लेख करून उपराष्ट्रपती नायडू म्हणाले की, 'समान कामासाठी समान वेतन' ही मूलभूत मागणी आजही बहुतांश विकसित देशांमध्येसुद्धा कायम राहिलेली दिसते. कॉर्पोरेट जगताच्या उच्चतम श्रेणींमध्येही हेच चित्र दिसते, असे ते म्हणाले. "वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे प्रकाशित झालेला 'जागतिक स्त्री-पुरुष विषमता अहवाल-2020' असे सांगतो की -प्रगत अर्थव्यवस्थांमध्येही सुमारे 15% वेतन-असमानता अस्तित्वात असून कोणत्याही देशाला अद्यापि स्त्री पुरुषांच्या वेतनात समानता प्रस्थापित करण्यात यश मिळालेले नाही."- याकडे नायडू यांनी लक्ष वेधले.
या दृष्टीने ही दरी सांधण्यासाठी भारताने जगाला मार्गदर्शन केले पाहिजे, असे मत उपराष्ट्रपतींनी व्यक्त केले. 'मातृत्व लाभ (दुरुस्ती) कायदा 2017' हा कायदा प्रागतिक असल्याचे सांगत त्यांनी त्याची प्रशंसा केली. 'पगारी प्रसूती रजा 12 ऐवजी 26 आठवड्यांपर्यंत देण्यासंदर्भात, या कायद्याने अगदी विकसित देशांनाही मार्ग दाखविला' असे ते म्हणाले.
स्त्रियांच्या बाबतीत, "शिक्षण द्या, जाणीव जागृत करा, सक्षम करा" या मूलमंत्राचा अवलंब करून देशाला उचित स्थानी पोहोचविण्यासाठी आपण स्त्रियांकडे आपल्या देशाचे नेतृत्व सोपविले पाहिजे" असेही उपराष्ट्रपती म्हणाले.
***
M.Chopade/J.Waishampayan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1715155)
Visitor Counter : 187