आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारत सरकारने आतापर्यंत राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना 15 कोटीपेक्षा अधिक लसी विनामूल्य पुरविल्या आहेत
अद्यापि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे 1 कोटींपेक्षा अधिक मात्रा लसीकरणासाठी शिल्लक व उपलब्ध आहेत
येत्या तीन दिवसांत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांपर्यंत 80 लाखांहून अधिक मात्रा पोहोचणार आहेत
Posted On:
27 APR 2021 8:33PM by PIB Mumbai
कोरोना प्रतिबंधासाठी भारत सरकारद्वारा लागू होत असलेल्या पाचकलमी रणनीतीचा, लसीकरण हा महत्त्वाचा स्तंभ आहे. या साथरोगाचा सामना करण्यासाठी चाचण्या, शोध, उपचार आणि कोविडसमुचित वर्तणूक (CAB) हे चार स्तंभही तितकेच पूरक आणि महत्त्वपूर्ण असून साथ प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी हे सर्व पाचही स्तंभ मिळून प्रभावशाली ठरत आहेत. भारताने जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम 16 जानेवारी 2021 रोजी सुरु केली. आता 1 मे 2021 पासून अधिक सर्वसमावेशक आणि अधिक वेगवान अशी तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहीम सुरु होईल. या तिसऱ्या टप्प्यात, लसींच्या किमतींवरील नियंत्रण कमी करण्याचे तसेच अधिकाधिक लोकांना लसी देण्याचे उद्दिष्ट राष्ट्रीय लस रणनीतीने ठेवले आहे. या धोरणान्तर्गत लसीची खरेदी, लाभार्थ्यांची पात्रता आणि लस देण्याचे काम यांमध्ये लवचिकता आणण्यात आली आहे.
भारत सरकारने आतापर्यंत राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या 15 कोटींहून अधिक (15,65,26,140) मात्रा विनामूल्य पुरविल्या आहेत. यापैकी, नासाडी धरून एकूण 14,64,78,983 मात्रा वापरल्या गेल्या आहेत.
1 कोटीपेक्षा अधिक (1,00,47,157) मात्रा अद्यापि राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये शिल्लक असून लसीकरणासाठी त्या उपलब्ध आहेत.
याखेरीज 80 लाखांहून अधिक (86,40,000) मात्रा येत्या तीन दिवसांत राज्ये / केंद्रशासित प्रदेशांपर्यंत पोहोचणार आहेत.
नजीकच्या काही काळापासून, महाराष्ट्रातील काही सरकारी अधिकाऱ्यांचा दाखल देत काही असे अहवाल येत आहेत, की 'राज्यातील लसींचा साठा संपला आहे'- यामुळे राज्यात लसीकरण मोहिमेवर विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर हे स्पष्ट करण्यात येते की, 27 एप्रिल 2021 (सकाळी 8 वाजेपर्यंत) महाराष्ट्राला लसींच्या एकूण 1,58,62,470 मात्रा मिळाल्या आहेत. यापैकी नासाडी (0.22%) धरून एकूण 1,49,39,410 मात्रा वापरल्या गेल्या आहेत. बाकी 9,23,060 मात्रा अद्यापि राज्याकडे शिल्लक असून लाभार्थ्यांना लसीकरण करण्यासाठी त्या उपलब्ध आहेत. याखेरीज, पुढील तीन दिवसांत कोविड लसीच्या 3,00,000 मात्रा तेथे पोहोचण्याच्या मार्गात आहेत.
***
M.Chopade/J.Waishampayan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1714437)
Visitor Counter : 231