उपराष्ट्रपती कार्यालय
महावीर जयंतीच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींनी जनतेला दिल्या शुभेच्छा
Posted On:
24 APR 2021 6:53PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती एम,वेंकय्या नायडू यांनी उद्याच्या महावीर जयंतीनिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांच्या संदेशातील मजकूर खाली दिला आहे:
महावीर जयंतीच्या मंगल प्रसंगी मी आपल्या देशवासियांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांचे अभीष्टचिंतन करतो.
भगवान महावीरांनी त्यांच्या अहिंसा, दयाभाव आणि निस्वार्थ भावाच्या शिकवणीतून मानवजातीचा एकोपा आणि प्रगती यासाठी प्रकाशमान मार्गाची दिशा दाखवली. ते खरोखरीच आपल्या देशातील सामाजिक सुधारणा आणि शांतीच्या महान प्रेषितांपैकी एक आहेत.
जैन समुदायामध्ये या उत्सवाला विशेष महत्त्व आहे आणि संपूर्ण भारतभर तसेच जगात हा सण अध्यात्मिक चैतन्याने आणि उत्सवी उर्जेने साजरा केला जातो. भक्तांनी केलेले दानधर्म, स्तवनांचे पठण, रथातून भगवानांची मिरवणूक तसेच जैन मुनी आणि साध्वी यांची प्रवचने ही या उत्सवाची विशेष आकर्षणे आहेत. मात्र सध्याच्या कोविड-19 महामारीच्या परिस्थितीत, मी माझ्या सहकारी नागरिकांना हा सण आपापल्या घरी राहून आणि कोविड अनुरूप आरोग्य आणि स्वच्छता विषयक नियमावलीचे संपूर्ण पालन करून साजरा करण्याची विनंती करतो.
भगवान महावीरांच्या शिकवणीच्या चैतन्यमयी प्रकाशात, आपण सर्वजण आपापल्या पद्धतीने कोविड -19 विरुद्धच्या सामायिक लढ्यात सहभागी होऊया. भगवान महावीरांची शिकवण आत्मसात करण्यासाठी आपल्या बांधिलकीचा पुनरुच्चार करूया आणि शांतताप्रिय, सुसंवादी आणि न्यायी समाजाची उभारणी करण्यासाठी स्वतःला समर्पित करूया.
***
Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1713819)
Visitor Counter : 174