गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोविड-19 च्या झपाट्याने वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्यासाठी विविध उपायांचे निर्देश दिले


ऑक्सिजन वाहतूक करणार्‍या वाहनांना पुरेशी सुरक्षा पुरवावी आणि वाहतुकीसाठी विशेष मार्गिकेची तरतूद करण्यासंदर्भात गृहमंत्रालयाने आज सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठविले

Posted On: 23 APR 2021 10:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 एप्रिल 2021

 

कोविड-19 च्या रुग्णसंख्येत झपाट्याने होणारी वाढ आणि देशभरात वैद्यकीय ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या  परिस्थितीचा आढावा घेतला आणि वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्यासाठी विविध उपायांचे निर्देश दिले. त्यानुसार, कोविड-19 ची सक्रीय रुग्णसंख्या  आणि वैद्यकीय ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी एक तज्ञ गट विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ऑक्सिजनचे अनुमानित आणि तर्कसंगत वाटप करीत आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 अंतर्गत 22 एप्रिल 2021 रोजी एक आदेश जारी करत राज्य / केंद्रशासित प्रदेशांना देशभरात वैद्यकीय ऑक्सिजनचा अखंड पुरवठा करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी आणि ऑक्सिजन वाहतूक करणार्‍या वाहनांना पुरेशी सुरक्षा पुरविण्यासाठी आणि या वाहनांना रुग्णवाहिकांप्रमाणेच विशेष मार्गिका उपलब्ध करून देण्यासाठी गृहमंत्रालयाने आज सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे.

केंद्र सरकारने18 एप्रिल 2021 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार काही आवश्यक क्षेत्र वगळता औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास बंदी घातली आहे. यामुळे वैद्यकीय ऑक्सिजनच्या पुरवठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. उद्योगांद्वारे औद्योगिक ऑक्सिजनचा वापर आणखी कमी करण्यासाठी पावले उचलली जात आहेत ज्यामुळे वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनचा पुरवठा वाढेल.

राज्य/ केंद्रशासित प्रदेशांनी जिल्हाधिकारी/ उपायुक्तांना आपल्या भागातील स्थापित क्षमतेसह विविध प्रकारच्या ऑक्सिजनची निर्मिती होत असलेल्या ऑक्सिजन निर्मिती केंद्रांची यादी तयार  तयार करण्याचे निर्देश द्यावे असेही त्या पत्रात नमूद केले आहे. बंद पडलेली ऑक्सिजन निर्मिती केंद्र पुन्हा चालू करण्यासाठी कारवाई करावी. या प्रयत्नांद्वारे नेहमीच्या मार्गांद्वारे होणाऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठ्या व्यतिरिक्त जिल्हा स्तरावर ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित होईल.

गृह मंत्रालय मंजूर वाटप योजनेनुसार  देशभरात वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक सुलभ करीत आहे. संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेशांना ऑक्सिजन वितरीत केल्यानंतर वाहतुकीचा वेळ वाचविण्यासाठी भारतीय हवाई दल ऑक्सिजनचे रिकामे टँकर हवाई मार्गे ऑक्सिजन निर्मिती केंद्रात घेऊन जात आहेत.  ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी अतिरिक्त टँकर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, गृहमंत्रालय भारतीय हवाई दलाच्या मालवाहतूक करणाऱ्या विमानांद्वारे सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिराती सारख्या देशातून उच्च क्षमतेचे टँकर मागविण्यासाठी समन्वय साधत आहे. याव्यतिरिक्त, ऑक्सिजनच्या वेगवान वाहतुकीसाठी रेल्वे मंत्रालय विशेष रेल्वे चालवत आहे.

वैद्यकीय ऑक्सिजनच्या सुयोग्य वापरास प्रोत्साहन देण्यासाठी गृहमंत्रालय आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नियमित संपर्कात आहेत आणि वैद्यकीय ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांचा अपव्यय होणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी नियमित लेखापरीक्षण केले जात आहे.

 

* * *

S.Patil/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1713671) Visitor Counter : 172