कृषी मंत्रालय

2021 च्या खरिपाच्या हंगामासाठी इंटरफ़ेस बैठक


अन्न सुरक्षेसह पोषणविषयक सुरक्षेचीही घेणार दखल

कृषी क्षेत्रात संशोधन विस्तार संवादाला अतिशय महत्व – कृषी सचिव

Posted On: 20 APR 2021 10:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 एप्रिल 2021

 

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय,कृषी विभाग, सहकार्य आणि शेतकरी कल्याण (डीएसी आणि एफडब्ल्यू) यांनी आयसीएआर, भारतीय कृषी संशोधन परिषदेसमवेत, 2021 च्या खरीप हंगामासाठी 20 एप्रिलला दुरदृष्य प्रणालीद्वारे एक बैठक आयोजित केली होती.  डीएसी आणि एफडब्ल्यूने आयसीएआरमधल्या त्यांच्या संबंधित विभागाशी चर्चा करून संशोधनात्मक मुद्यांबाबत, खरीप आणि रब्बी हंगामापूर्वी वर्षातून दोनदा होणाऱ्या हंगाम पूर्व संवादासाठी गट शिफारसी तयार केल्या. या शिफारसीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

कृषी आणि संलग्न क्षेत्रात संशोधन आणि विकास या दोन्ही दृष्टीकोनातून महत्वाचे मुद्दे जाणून घेण्याचा आणि येत्या खरीप हंगामात यांची दखल घेण्यासाठी संयुक्त धोरण आखण्याचा यामागचा उद्देश आहे.

आज, पूर्व-खरीप कार्यशाळेत पिके,बियाणे, फलोत्पादन, वनस्पती संरक्षण, यांत्रिकी आणि तंत्रज्ञान, एकात्मिक पोषक व्यवस्थापन, नैसर्गिक संसाधने व्यवस्थापन या मुद्द्यांबाबत गट शिफारसी तयार करण्यात आल्या ज्या खरीप हंगाम 2021 साठी आयसीएआरशी चर्चेवर  आधारित होत्या. सध्याचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय फळे आणि भाजीपाला वर्ष म्हणून साजरे केले जात आहे आणि कृषी विज्ञान केंद्रासह आपल्या संशोधन आणि विस्तार प्रणालीने चालू वर्षात परिषदामधून आपल्या कामगिरीचे दर्शन घडवले पाहिजे.

डीएसी आणि एफडब्ल्यू  सचिव संजय अग्रवाल यांनी कृषी आणि बागायती पिकांमध्ये उत्पादन आणि उत्पादकता सुधारण्यासाठी पिकांच्या कीटक आणि रोग प्रतिबंधक अशा योग्य  वाणांचा वापर करून लागवडीची किंमत कमी करण्यावर भर दिला.

अन्न सुरक्षेबरोबरच पोषक सुरक्षा लक्षात घेण्यासाठी डाळींसह पोषण मुल्ये वाढवणाऱ्या बायोफॉर्टीफाईड वाणाला, राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशनद्वारे  प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कृषी क्षेत्रात वारंवार होणाऱ्या संशोधन विस्तार इंटरफेसला अतिशय महत्व आहे. 2021 च्या खरीप हंगामासाठी पेरणीच्या आराखड्यावर  चर्चा करण्यासाठी  30 एप्रिलला 2021 ला राष्ट्रीय आभासी परिषद आयोजित करण्यात आली आहे. खरीप पिके 2021 वरच्या या परिषदेला सर्व राज्यांचे अतिरिक्त सचिव आणि कृषी आणि फलोत्पादन प्रधान सचिव सहभागी होतील. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या पावसाच्या अनुकूल  अंदाजाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि अन्नधान्य उत्पादनाचे उदिष्ट गाठण्याच्या दृष्टीने हा आराखडा तयार करण्यात येईल. 


* * *

Jaydevi PS/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1713114) Visitor Counter : 141


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi