PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 16 APR 2021 7:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 16 एप्रिल 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील वैद्यकीय वापराच्या ऑक्सिजनच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. आरोग्य, उद्योग प्रोत्साहन आणि आणि अंतर्गत व्यापार विभाग, पोलाद, रस्ते वाहतूक अशा सर्व विभागांकडून देशातल्या ऑक्सिजनच्या स्थितीविषयी त्यांनी माहिती घेतली. या स्थितीत, सर्व मंत्रालये आणि राज्य सरकारांमध्ये समन्वय असणे अत्यंत महत्वाचे आहे, यावर पंतप्रधानांनी यावेळी भर दिला.

केंद्र आणि राज्य सरकारे एकमेकांच्या सतत संपर्कात असून, 20 एप्रिल, 25 तसेच 30 एप्रिल रोजी देशात ऑक्सिजनची अंदाजे किती मागणी असू शकेल, याची माहिती सर्व राज्यांना देण्यात आली आहे, असे पंतप्रधानांना यावेळी सांगण्यात आले. त्यानुसार, या तीन तारखांना अनुक्रमे, 4,880 मेट्रिक टन, 5,619 मेट्रिक टन आणि 6,593 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज पडू शकेल.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

जगातील सर्वात विशाल लसीकरण मोहिमेचा भाग असलेल्या लसीकरण मोहिमेद्वारे, देशभरात कोविड -19 च्या एकूण 11.72 कोटी लसींच्या मात्रा देण्याचा टप्पा आज ओलांडण्यात आला.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, एकूण 17,37,539 सत्रांद्वारे 11,72,23,509 लसींच्या एकत्रित मात्रा देण्यात आल्या.यापैकी 90,82,999 आरोग्य कर्मचाऱ्यांनी (HCW) लसीची पहिली मात्रा घेतली, 56,34,634 आरोग्य कर्मचाऱ्यांनी(HCW) लसीची दुसरी मात्रा घेतली, 1,02,93,524, आघाडीच्या कर्मचाऱ्यांनी (FLW) लसीची पहिली मात्रा घेतली,51,52,891आघाडीच्या कर्मचाऱ्यांनी (FLW) लसीची दुसरी मात्रा घेतली, तर वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या 4,42,30,842 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा 30,97,961 लाभार्थ्यांना (लसीची दुसरी मात्रा), तसेच 45 ते 60 वर्षे वयोगटातील 3,87,41,890 लाभार्थ्यांना (लसीची पहिली मात्रा) तर 9,88,768 लाभार्थ्यांना (लसीची दुसरी मात्रा)लस देण्यात आली.

देशभरात आतापर्यंत दिलेल्या डोसांपैकी 59.63% डोस आठ राज्यांत दिले गेले आहेत.

भारतातील दैनंदिन, नवीन रुग्णसंख्येत भर पडत आहे. गेल्या 24 तासांत 2,17,353 नव्या रुग्णांची नोंद झाली.

महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, मध्यप्रदेश,गुजरात,केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या दहा राज्यांतील दैनंदिन कोविड बाधित रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. एकूण बाधित रुग्णांपैकी 79.10% नवे रूग्ण या 10 राज्यांत आहेत.

महाराष्ट्राच्या दैनंदिन बाधित रुग्णांत, सर्वाधिक 61,695 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल उत्तरप्रदेशमधे 22,339 तर दिल्लीत 16,699 नव्या रूग्णांची नोंद झाली.

भारतातील सक्रीय बाधित रूग्णसंख्या आता 15,69,743 वर पोचली आहे. ही संख्या देशातील एकूण बाधित रुग्णांच्या 10.98% इतकी आहे. गेल्या 24 तासांत, बाधित रूग्णसंख्येत 97,866 सक्रीय रुग्णांची भर पडल्याची नोंद झाली आहे

महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या पाच राज्यांत भारतातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी 65.86% सक्रीय रुग्ण आहेत. देशातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी 39.60% रूग्ण केवळ महाराष्ट्रात आहे.

राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविड-19 व्यवस्थापनासाठी केंद्रीय मंत्रालयांनी आणि त्यांच्या सार्वजनिक उपक्रमांनी त्यांच्या रुग्णालयातील खाटा समर्पित करण्याचा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा सल्ला

देशभरातील कोविड -19 च्या गंभीर रुग्णांच्या प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापनासाठी, रुग्णालयातील पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यासाठी महत्वाच्या उपाययोजना म्हणून ,सर्व केंद्रीय मंत्रालयांनी त्यांच्या नियंत्रणाखाली असलेली रुग्णालये किंवा सार्वजनिक उपक्रमांनी कोविड उपचारांसाठी गेल्या वर्षी प्रमाणे विशेष समर्पित रुग्णालय विभाग किंवा रुग्णालयांमध्ये स्वतंत्र विभाग स्थापन करण्याच्या सूचना द्याव्यात, असा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.

इतर अपडेट्स

कोरोना संकट थोपवण्यासाठी आयुष मंत्रालय प्रयत्नरत-केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक

कोरोना संक्रमणाचे संकट मोठे आहे. हे संकट थोपवण्यासाठी आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सक्रीय आहेत. त्याचबरोबर आयुष मंत्रालय आयुर्वेद आणि योग या माध्यमातून कोरोना संक्रमण थोपवण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.

महाराष्ट्र अपडेट्स

राज्यात गुरुवारी 3 लाख 69 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. पुण्यात सर्वाधिक 59,190 लसीच्या मात्रा देण्यात आल्या, त्यापाठोपाठ मुंबईत 50930 मात्रा देण्यात आल्या. तिसऱ्या क्रमाकांवर ठाणे शहर होते. ठाण्यात 32085 मात्रा देण्यात आल्या. याचदिवशी राज्यात 61,695 नव्या रुग्णांची नोंद झाली, यामुळे एकूण सक्रीय रुग्णसंख्या 6,20,060 एवढी झाली. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा आरोग्य विभागांना खाटांची क्षमता वाढवणे, रेमेडिसीवर आणि वैद्यकीय ऑक्सिजची उपलब्धता सुनिश्चित करणे याविषयीच्या सूचना केल्या आहेत. ते म्हणाले, पॉझिटीव्ह रुग्णांनी संस्थात्मक विलगीकरण करुन घेणे आवश्यक आहे, अनेकजण क्वारन्टाईनचे नियम मोडत असल्यामुळे इतरांना संसर्ग होत आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेने चार आणि पंचतारांकित हॉटेल्स ताब्यात घेऊन सौम्य लक्षणे किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांची व्यवस्था केली आहे.  

***

S.Thakur/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1712313) Visitor Counter : 223