वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय स्टार्ट अप सल्लागार परिषदेची पहिली बैठक

Posted On: 15 APR 2021 8:52PM by PIB Mumbai

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, रेल्वे, ग्राहक संरक्षण आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय स्टार्ट अप सल्लागार परिषदेची (एनएसएसी) पहिली बैठक आज झाली. शाश्वत आर्थिक विकास आणि मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्मितीसाठी देशात बळकट परिसंस्था उभारण्यासाठी आणि  नवोन्मेष आणि स्टार्ट अप्सची जोपासना करण्यासाठी आवश्यक उपायांबाबत सरकारला सल्ला देण्यासाठी औद्योगिक आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने राष्ट्रीय स्टार्ट अप सल्लागार परिषदेची स्थापना केली आहे. 

राष्ट्रीय स्टार्ट अप सल्लागार परिषद भारतातल्या अनेक उदयोन्मुख स्टार्ट अप उद्योजकांना मार्गदर्शक दीप म्हणून काम करेल असे गोयल यांनी उद्घाटनपर संबोधनात सांगितले. आपल्या देशाच्या इतिहासात प्रथमच खासगी आणि सरकारी  क्षेत्रातून उच्च अधिकारप्राप्त चमू एकत्र आला आहे त्यामुळे आपण आपले धोरणात्मक निर्णय स्वतः घ्यावे.  विविध समस्यांवर कल्पक तोडगा शोधल्याबद्दल  सर्व क्षेत्रातल्या स्टार्ट अपच्या कार्याची प्रशंसा करत भारत हे नवोन्मेष आणि  चौकटीबाहेर  विचार करणारे अभिनव विचारांचे केंद्र असल्याचे ते म्हणाले. गेल्या पाच वर्षात स्टार्ट अप चळवळीने उद्योजकतेच्या भावनेला खतपाणी घातले आहे.  स्टार्ट अप इंडिया हा आपल्या पंतप्रधानांचा दृष्टीकोन साकारण्यासाठी राष्ट्रीय स्तरापासून ते गट पातळीपर्यंत सर्व संबंधितांचे अभूतपूर्व प्रयत्न आपण पाहत असल्याचे गोयल यांनी सांगितले. स्टार्ट अप हे आत्मनिर्भर भारताचे नवे चॅम्पियन असून जगातली सर्वात मोठी आणि सर्वात कल्पक स्टार्ट अप परिसंस्था होण्याची क्षमता भारताकडे आहे. भारतीय स्टार्ट अप परिसंस्थेची प्रगती होत राहावी यासाठी सरकार नेहमीच सहाय्यकारी भागीदार म्हणून काम करत आहे आणि काम  करत राहील असे आश्वासन त्यांनी दिले. स्टार्ट अप इंडिया हे राष्ट्रीय भागीदारी आणि राष्ट्रीय जाणीवेचे प्रतिक करण्याचे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना देण्यासाठी शालेय स्तरापासूनच त्यांच्यामध्ये उद्योजकतेची भावना रुजवण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

***

S.Thakur/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1712128) Visitor Counter : 213


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi