सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडून अनुसूचित जातींच्या व्यक्तींसाठी “ऑनलाईन तक्रार व्यवस्थापन पोर्टल” सुरू

Posted On: 14 APR 2021 10:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 एप्रिल 2021

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडून (एनसीएससी) आयोजित कार्यक्रमात केंद्रीय दळणवळण व माहिती तंत्रज्ञान आणि कायदा व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी “अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोगाचे ऑनलाईन तक्रार व्यवस्थापन पोर्टल (एनसीएससी)” सुरू केले. यावेळी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रतनलाल कटारिया आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला उपस्थित होते. यावेळी एन अरुण हलदर, एनसीएससीचे उपाध्यक्ष,  सुभाष रामनाथ पारधी, सदस्य एनसीएससी, डॉ. अंजू बाला, सदस्य एनसीएससी आणि एमईआयटीचे सचिव अजय प्रकाश सावनी देखील उपस्थित होते. 

देशातील एक महान व्यक्तिमत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी एनसीएससीच्या ऑनलाइन तक्रार व्यवस्थापन पोर्टलचा शुभारंभ होणे हे विशेष महत्वाचे आहे असे यावेळी रविशंकर प्रसाद म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक समाजसुधारक आणि अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी समाजातील उपेक्षित आणि दलित वर्गातील लोकांच्या उद्धारासाठी कार्य केले. भारताच्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यात त्यांनी दिलेले अतुलनीय योगदान कायम स्मरणात राहील. भारताचे परिवर्तन आणि सशक्तीकरण करणाऱ्या डिजिटल इंडिया  क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने राबविलेल्या अनेक नवीन उपक्रमांची प्रसाद यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, डिजिटल इंडियाला जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त होण्याची आवश्यकता आहे.

या पोर्टलमुळे अर्जदाराला आपला अर्ज आणि अत्याचार व सेवा संबंधित इतर तक्रारी ऑनलाईन दाखल करणे शक्य होईल आणि निर्धारित कालावधीत या तक्रारींचे निवारण देखील होईल असे रतनलाल कटारिया यांनी सांगितले. हे पोर्टल डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करेल, असे ते म्हणाले.  

आज सुरू झालेल्या पोर्टलमुळे देशातील कोणत्याही भागातून तक्रारी नोंदविणे सोपे होईल. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत भास्कराचार्य इंस्टिट्यूट फॉर स्पेस ऍप्लिकेशन अँड जिओ इनफॉरमॅटिक्स (बीआयएसएजी-एन) च्या सहकार्याने हे पोर्टल तयार केले आहे. सुनावणी प्रक्रिया ई-न्यायालया नुसार करण्याचे उद्दिष्ट आहे. हे पोर्टल आयोगाच्या संकेतस्थळासोबत लिंक केलेले आहे आणि त्यावर नोंदणी केल्यावर कोणीही तक्रार नोंदवू शकते. कागदपत्रे आणि ऑडिओ / व्हिडिओ फाइल्स अपलोड करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.

 
* * *

S.Patil/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1711895) Visitor Counter : 327


Read this release in: English , Urdu , Hindi , Bengali