अर्थ मंत्रालय
आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये झालेल्या एकूण कर संकलनापेक्षा आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये अंतरिम (वस्तू आणि सेवा कर तसेच बिगर-वस्तू आणि सेवा कराच्या) एकूण अप्रत्यक्ष कर संकलनात 12% हून जास्त वाढ दिसून आली
आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये झालेले एकूण अप्रत्यक्ष कर संकलन हे 9.89 लाख कोटी रुपयांच्या अप्रत्यक्ष कर संकलनाच्या सुधारित अंदाजाच्या 108.2% आहे
Posted On:
13 APR 2021 4:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 एप्रिल 2021
आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये अंतरिम (वस्तू आणि सेवा कर तसेच बिगर-वस्तू आणि सेवा कराच्या) एकूण अप्रत्यक्ष कर संकलनाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये झालेल्या 9.54 लाख कोटी रुपयांच्या कर संकलनाच्या तुलनेत या आर्थिक वर्षात म्हणजे 2020-21 मध्ये एकूण अप्रत्यक्ष कर संकलनात 12.3% वाढ नोंदवत 10.71 लाख कोटी रुपये इतका एकूण महसूल जमा झाला आहे. यावरून असे दिसते की आर्थिक वर्ष 2020-21 साठी अप्रत्यक्ष कर संकलनाचा जो सुधारित अंदाज व्यक्त करण्यात आला होता त्याच्या 108.2% इतके एकूण अप्रत्यक्ष कर संकलन करण्यात यश आले आहे.
सीमा शुल्काचा विचार करता, गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या 1.09% लाख कोटी रुपयांच्या तुलनेत, सुमारे 21% ची वाढ नोंदवत, आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 1.32 लाख कोटी रुपयांचे महसूल संकलन झाले आहे.
गत आर्थिक वर्षात केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सेवा करापोटी (थकबाकी) 2.45 लाख कोटी रुपये जमा झाले होते त्याच्या तुलनेत, 2020-21 या आर्थिक वर्षात 59% टक्क्याहून जास्त वाढ होऊन 3.91लाख कोटी रुपये कर संकलन झाले आहे.
गेल्या आर्थिक वर्षात वस्तू आणि सेवा करापोटी (यात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर, राज्य वस्तू आणि सेवा कर तसेच एकात्मिक वस्तू आणि सेवा कर आणि नुकसान भरपाई उपकर यांचा समावेश आहे) 5.99 लाख कोटी रुपये इतके एकूण कर संकलन झाले होते त्या तुलनेत या वर्षी वस्तू आणि सेवा करापोटी 5.48 लाख कोटी रुपये इतके एकूण कर संकलन झाले आहे. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर तसेच नुकसान भरपाई उपकरासह एकूण वस्तू आणि सेवा कर स्वरुपात 5.15 लाख कोटी रुपये कर संकलनाचा सुधारित अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे, प्रत्यक्षातील वस्तू आणि सेवा कराचे संकलन एकंदर निश्चित संकलनाच्या 106% इतके झाले आहे, मात्र हे संकलन गेल्या आर्थिक वर्षातील संकलनापेक्षा 8% नी कमी आहे.या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कोविड महामारीच्या संकटामुळे वस्तू आणि सेवा कर संकलनावर मोठा परिणाम झाला होता मात्र नंतरच्या सहामाहीत वस्तू आणि सेवा कर संकलनात चांगली वाढ नोंदवली, या सहामाहीतील प्रत्येक महिन्यात वस्तू आणि सेवा करापोटी 1 लाख कोटी रुपयांहून जास्त संकलन झाले. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत उत्तम कर संकलन झाल्यानंतर, एकट्या मार्च महिन्यात तर सर्वात जास्त म्हणजे 1.24 लाख कोटी रुपये जमा झाले. केंद्र सरकारने राबविलेल्या अनेक उपायांमुळे वस्तू आणि सेवा कर संकलनात सुधारणा होण्यास मदत झाली आहे.
वर दिलेली आकडेवारी अंतरिम असून सर्व बाबींचा मेळ घातल्यानंतरची अंतिम आकडेवारी अजून जाहीर व्हायची आहे.
Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1711461)
Visitor Counter : 509