अर्थ मंत्रालय

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आंतरराष्ट्रीय पत आणि आर्थिक समितीच्या बैठकीत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी

Posted On: 08 APR 2021 10:03PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 एप्रिल 2021

 

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन आज व्हर्चुअल स्प्रिंग मिटींग्ज 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या(आयएमएफ) आंतरराष्ट्रीय पत आणि आर्थिक समितीच्या( आयएमएफसी) गव्हर्नर मंडळाच्या पूर्ण बैठकीत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाल्या. या बैठकीत आयएमएफच्या 190 सदस्य देशांचे गव्हर्नर/ अल्टरनेट गव्हर्नर सहभागी झाले होते. या बैठकीत आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या “विपरित परिस्थितीचा सामना आणि पुनरुज्जीवनाला चालना” या शीर्षकाखालील जागतिक धोरणविषयक जाहीरनाम्यावर आधारित चर्चा झाली.

आयएमएफसीच्या सदस्यांनी यावेळी, सदस्य देशांनी कोविड-19 महामारीला तोंड देण्यासाठी आणि आर्थिक पुनरुज्जीवनासाठी केलेल्या उपाययोजनांची समितीला माहिती दिली.

जागतिक धोरणविषयक जाहीरनाम्यात सर्वांना फायदेशीर ठरू शकेल अशा विकासाला चालना देणाऱ्या अल्प- कार्बन अर्थव्यवस्थेकडे संक्रमण जलदगतीने करण्याच्या सूचनेचा विचार उदयोन्मुख बाजारपेठ आणि विकसनशील अर्थव्यवस्था आणि अल्प उत्पन्न अर्थव्यवस्थांवर होणाऱ्या परिणामांच्या दृष्टीकोनातून झाला पाहिजे, यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भर दिला. अल्प कार्बन अर्थव्यवस्थेकडे होणाऱ्या आर्थिक संक्रमणाचा बोजा अशा देशांवर अयोग्य पद्धतीने खूपच जास्त प्रमाणात पडू शकतो आणि अल्प काळामध्ये त्यांना त्याची सकारात्मक फळे मिळण्याची शक्यता कमी असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. हवामान विषयक कृतीसंदर्भातील सामायिक जबाबदारी आणि समानता याबाबतच्या सहमतीप्राप्त सिद्धांतावर भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. या महामारीचा अंत करण्याला प्राधान्य देण्यात यावे आणि लसीची सार्वत्रिक उपलब्धता आणि वैद्यकीय उपचारांवर भर देण्याच्या आयएमएफच्या दृष्टीकोनाचा अर्थमंत्र्यांनी पुरस्कार केला.

जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात प्रगतीपथावर असल्याची आणि 6 एप्रिल 2021 पर्यंत भारतात 83.1 दशलक्ष मात्रा देण्यात आल्याची आणि भारतात तयार झालेल्या लसींच्या 1 कोटी मात्रांच्या अनुदानासह 65 दशलक्ष मात्रा 80 देशांना पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी समितीला दिली. आयएमएफसीच्या वर्षातून दोन बैठका होत असतात आणि त्यापैकी एका बैठकीचे आयोजन एप्रिल महिन्यात स्प्रिंग मिटींग दरम्यान होत असते आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये वार्षिक बैठक होते. जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या सामाईक चिंताजनक बाबींवर समितीच्या बैठकीत चर्चा होते आणि त्यावर उपाययोजना करण्याचे निर्देश आयएमएफला देण्यात येतात. यावर्षी कोविड-19 महामारीमुळे स्प्रिंग मिटींगचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले.


* * *

Jaydevi PS/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1710535) Visitor Counter : 295


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu