उपराष्ट्रपती कार्यालय
मूलभूत साक्षरतेला बळकटी देण्यासाठी तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण करा- उपराष्ट्रपती
सरला दास यांच्या 600व्या जयंतीदिनी त्यांचा आदी कवी, आदी ऐतिहासिका आणि आदी भूगोलविद म्हणून वेंकैया नायडू यांच्याकडून गौरव
प्रविष्टि तिथि:
02 APR 2021 9:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 एप्रिल 2021
बालकांची मूलभूत साक्षरता बळकट करण्यासाठी लहान वयातच त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू यांनी केले आहे. बालकांना वाचनाची आवड लागावी यासाठी शिक्षणतज्ञ, विचारवंत,पालक आणि शिक्षकांनी विशेष लक्ष देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बालकांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी आणि विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक मनोरंजक उपकरणांच्या अतिवापरापासून त्यांना परावृत्त करण्यासाठी वाचनाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. शाळेत वर्गांमध्ये पुस्तकांचे आकर्षक विश्व निर्माण करण्यासाठी शाळांनी पुढाकार घेण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला आणि बालकांसाठी जास्तीत जास्त लिखाण करण्याचे लेखकांना आवाहन केले. बालकांना असलेल्या आवडीनिवडी आणि त्यांच्या क्षमता यांना लक्षात घेऊन या पुस्तकांचे लिखाण आणि प्रदर्शन झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
आदिकवी सरला दास यांच्या 600 व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपराष्ट्रपती बोलत होते. सरला दास यांनी केलेल्या महाभारताच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतील लिखाणामुळे आणि विवेचनामुळे शेकडो वर्षानंतरही ओदिया जनतेमध्ये या ग्रंथाचे महत्त्व कमी झालेले नाही, असे ते म्हणाले. यामुळे लिहिण्यासाठी आणि लोकांशी संवाद साधण्यासाठी अतिशय साध्यासोप्या आणि सर्वसामान्य लोकांना आकलन होणाऱ्या भाषेचे महत्त्व लक्षात येते असे त्यांनी सांगितले. सरला दास केवळ आदी कवी नव्हते तर ते आदी ऐतिहासिका आणि आदी भूगोलविद होते अशा शब्दात नायडू यांनी त्यांचा गौरव केला. 15 व्या शतकासारख्या प्राचीन काळातही त्यांनी सामान्यांना समजेल अशा बोलीभाषेचा वापर केल्यामुळे लोकाभिमुख साहित्यनिर्मितीचे ते प्रणेते होते असे त्यांनी सांगितले. कबीर आणि योगी वेमना यांच्याशी सरला दास यांची तुलना करत वेंकैया नायडू म्हणाले की अतिशय गुंतागुंतीच्या भावना आणि कल्पनांना साध्यासोप्या भाषेत लोकांसमोर मांडण्याचे असामान्य कसब महान कवींच्या अंगी असते आणि त्यामुळे असंख्य वाचकांमध्ये ते आपला ठसा कायम राखतात. महाभारतातील नायक आणि नायिका यांच्या पात्रांची मांडणी सरला दास यांनी ज्या प्रकारे केली त्यातून त्यांच्या नंतरच्या काळातील लेखकांना देखील एक किंवा दोन पात्रांना विचारात घेऊन त्यांच्या भोवताली एका संपूर्ण कादंबरीचे लिखाण करण्याची प्रेरणा मिळाली, असे नायडू यांनी सांगितले. त्यांनी उभी केलेली महिलांची पात्रे अतिशय कणखर आणि बुद्धिमान आणि कनवाळू होती आणि धैर्य आणि आत्मविश्वासाने कृती करणारी होती, असे ते म्हणाले. सरला दास असामान्य प्रतिभावान साहित्यिक होते आणि ओदिया भाषेचे पितामह अशी उपाधी त्यांना प्राप्त झाली होती, अशा शब्दात उपराष्ट्रपतींनी त्यांचा गौरव केला. त्यांनी ओदिया भाषा आणि संस्कृती समृद्ध केली असे ते म्हणाले. त्यामुळेच भारत सरकारने ओदिया भाषेचा भारताची सांस्कृतिक भाषा म्हणून सन्मान केला असून सरला दास हे या भाषेचे दीपस्तंभ आहेत, असे त्यांनी सांगितले.
* * *
M.Chopade/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1709245)
आगंतुक पटल : 278