अर्थ मंत्रालय
आपत्कालीन पतहमी योजना (ECLGS) 1.0 आणि 2.0 ला 30 जून 2021 पर्यंत मुदतवाढ
आपत्कालीन पतहमी योजना ECLGS 3.0 अंतर्गत आदरातिथ्य, पर्यटन आणि क्रीडा तसेच मनोरंजन क्षेत्रासाठी विशेष खिडकी
Posted On:
31 MAR 2021 6:34PM by PIB Mumbai
कोविड-19 महामारीचा देशातील काही विशिष्ट उद्योगक्षेत्रांवर अद्याप विपरीत प्रभाव होत असून हे लक्षात घेऊन, केंद्रसरकारने अशा क्षेत्रांसाठी आपत्कालीन पतहमी योजनेला मुदतवाढ दिली आहे. सरकारने आज आपत्कालीन पतहमी योजना ECLGS 3.0 ची घोषणा केली असून त्यात आदरातिथ्य, पर्यटन, मनोरंजन, क्रीडा यांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत एकूण थकीत कर्ज 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक नसून थकबाकी 29 फेब्रुवारी पासून 60 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस असू नये.
ECLGS 3.0 अंतर्गत,29.02.2020 पर्यंत सर्व संस्थांकडे असलेल्या एकूण थकीत कर्जापैकी 40% पेक्षा अधिक आपत्कालीन कर्ज घेता येणार नाही. या योजनेअंतर्गत एकूण 6 वर्षांसाठी कर्ज दिले जाईल ज्यात दोन वर्षांच्या अधिस्थगन काळाचाही समावेश असेल.
तिन्ही आपत्कालीन पतहमी योजनांचीची वैधता 30 जून 2021पर्यंत किंवा 3 लाख कोटी रुपयांपर्यंतच्या रकमेवरची हमी असेपर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, कर्ज वितरीत करण्यास 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
योजनेत करण्यात आलेल्या सुधारणांनुसार, पात्र लाभार्थ्यांना अधिक निधी उपलब्ध करुन देण्यासाठी MLIs ना सवलती देतांना आर्थिक उन्नती,रोजगाराचे संरक्षण आणि रोजगारनिर्मितीसाठी पोषक वातावरण तयार होईल, अशी काळजी घेण्यात आली आहे.
या संदर्भातल्या सुधारित कार्यान्वयन मार्गदर्शक सूचना राष्ट्रीय पतहमी विश्वस्त कंपनी लिमिटेड (NCGTC) कडून जारी केल्या जातील.
****
Jaydevi PS/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1708759)
Visitor Counter : 308