पंतप्रधान कार्यालय

प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होणारे आदिवासी पाहुणे, एनसीसीचे छात्रसैनिक, एनएसएस स्वयंसेवक आणि चित्ररथाबरोबर सहभागी होणाऱ्या कलाकारांसोबत आयोजित ' ऍट होम' या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 24 JAN 2021 11:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 जानेवारी 2021

 

मंत्रिमंडळातील माझे वरिष्ठ सहकारी, देशाचे संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह जी, श्री. अर्जुन मुंडा जी, श्री किरण रिजिजू जी, श्रीमती रेणुका सिंह सरूटा जी आणि देशभरातून येथे आलेले माझ्या प्रिय युवा सहकाऱ्यांनो, कोरोनाने खरोखरच खूप काही बदलून टाकले आहे. मास्क, कोरोना चाचणी, दोन मीटरचे अंतर हे सर्व काही आता असे वाटत आहे की, दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहे. पूर्वी आपण छायाचित्र काढण्यासाठी जात होतो तेव्हा छायाचित्रकार म्हणत असे, हसा. आता मास्कमुळे तो आता हे म्हणत नाही. इथे पण आपण बघत आहोत की, वेगवेगळ्या ठिकाणी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी लागली आहे. खूप अंतर ठेवावे लागले आहे. मात्र असे असले तरी तुमचा उत्साह, तुमची उमेद यात कोणतीही कमी दिसत नाही, तो जसाच्या तसा आहे. 

मित्रांनो,

तुम्ही इथे देशाच्या कानाकोपऱ्यातून आले आहात. इथे देशाच्या दुर्गम भागातील आदिवासी क्षेत्रातून आलेले सहकारी आहेत. एनसीसी-एनएसएसचे उत्साही तरुणसुद्धा आहेत आणि राजपथावर विविध राज्यांच्या चित्ररथांच्या माध्यमातून विविध राज्यांचे संदेश देशाच्या उर्वरित भागात पोहोचवणारे कलाकारही येथे उपस्थित आहेत. ज्या उत्कट भावनेने तुम्ही राजपथावर संचलन करता तेव्हा प्रत्येक देशवासियात उत्साह निर्माण होतो. जेव्हा तुम्ही भारताची समृद्ध कला, संस्कृती, परंपरा आणि वारसा यांची झलक दाखवता, तेव्हा प्रत्येक देशवासीयाची मान अभिमानाने आणखी उंचावते. आणि मी पाहिले आहे की, संचलनाच्यावेळी माझ्या बाजूला कोणत्या ना कोणत्या देशाचे प्रमुख बसलेले असतात, या सगळ्या गोष्टी बघून ते आश्चर्यचकित होतात आणि अनेक प्रश्न विचारून हे देशाच्या कोणत्या भागात आहे, काय आहे, कसे आहे ... ? या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.  जेव्हा आमचे आदिवासी बांधव राजपथावर संस्कृतीचे रंग उधळतात , तेव्हा संपूर्ण भारत या रंगात रंगून जातो आणि आनंदित होतो. प्रजासत्ताक दिनाचे संचलन भारताच्या  महान सामाजिक आणि सांस्कृतिक वारश्यासोबतच आपल्या सामरिक सामर्थ्याला मानवंदना देते. प्रजासत्ताक दिनाचे संचलन जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला जिवंत करणाऱ्या आपल्या संविधानालाही अभिवादन करते. 26 जानेवारीला सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी मी तुम्हाला अनेकोत्तम शुभेच्छा देतो. माझी तुम्हाला एक आग्रही विनंती आहे. दिल्लीत सध्या थंडी आहे, जे दक्षिणेकडून आले आहेत त्यांना तर आणखी त्रास होत असेल आणि तुम्ही खूप दिवसांपासून इथे आहात आणि मी सांगितल्याप्रमाणे तुमच्यापैकी अनेक जणांना थंडीची सवय नाही. सकाळी लवकर उठून तुम्हाला कवायतीसाठी बाहेर पडावे लागते, मी इतकेच सांगेन तुम्ही तुमच्या आरोग्याची जरूर काळजी घ्या.

मित्रांनो,

यावर्षी आपला देश, आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश करीत आहे. यावर्षी गुरू तेग बहादुर जी यांचे 400 वे प्रकाशपर्वही आहे. आणि याच वर्षी आपण नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 125 वी जयंतीही साजरी करीत आहोत.  नेताजींची जयंती आपण पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्याचे आता देशाने ठरविले आहे. काल पराक्रम दिवसानिमित्त मी त्यांची कर्मभूमी असलेल्या कोलकात्यातच होतो. स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष,  गुरू तेग बहादुर जी यांचे जीवन, नेताजींचे शौर्य, त्यांचे धैर्य हे सर्व काही आपल्या सर्वांसाठी मोठी प्रेरणा आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्याला आपल्या सर्वस्वाचा त्याग करण्याची संधी मिळाली नाही कारण आपल्यापैकी अधिकाधिक लोक स्वातंत्र्यानंतर जन्मले आहेत. पण देशाने आपल्याला आपले सर्वोत्तम देण्याची संधी नक्कीच दिली आहे. आपण जे काही देशासाठी चांगले करू शकतो, भारताला मजबूत करण्यासाठी जे काही करू शकतो ते आपण करीत राहिले पाहिजे.

मित्रांनो,

इथे प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या तयारीदरम्यान आपला देश किती वैविध्यपूर्ण आहे याची जाणीव तुम्हाला झाली असेल. अनेक भाषा, अनेक पोटभाषा, भिन्न खाद्यपदार्थ यात किती विविधता आहे. मात्र इतके वैविध्य असूनही भारत एक आहे. भारत म्हणजे कोट्यवधी सामान्य जनांचे रक्त - घाम, आकांक्षा आणि अपेक्षांची सामूहिक शक्ती. भारत म्हणजे राज्य अनेक राष्ट्र एक. भारत म्हणजे समाज अनेक भावना एक. भारत म्हणजे पंथ अनेक लक्ष्य एक. भारत म्हणजे परंपरा अनेक मूल्य एक. भारत म्हणजे भाषा अनेक अभिव्यक्ती एक. भारत म्हणजे रंग अनेक तिरंगा एक. एका ओळीत वर्णन करायचे असेल तर  भारतात मार्ग भलेही वेगवेगळे आहेत मात्र अंतिम ठिकाण एकच आहे, आणि हे एकमेव अंतिम ठिकाण म्हणजे एक भारत, श्रेष्ठ भारत.

मित्रांनो,

आज एक भारत, श्रेष्ठ भारत ही शाश्वत भावना, देशाच्या कानाकोपऱ्यात दिसून येते आहे, ती मजबूत होत आहे. तुम्ही आता पाहिले आणि ऐकलेही की, मिझोरमच्या एका  4 वर्षीय बालिकेने जेव्हा वंदे मातरम गायले तेव्हा श्रोते अभिमानाने भारावले. केरळमधील एक शालेय विद्यार्थिनी कठोर मेहनतीने शिकून हिमालयीन गीत परिपूर्णतेने गाते तेव्हा देशाच्या सामर्थ्याची जाणीव होते. तेलुगू भाषक एक मुलगी शालेय प्रकल्पाचा एक भाग म्हणून अतिशय

मनोरंजक पद्धतीने हरयाणाच्या खाद्यपदार्थांचा परिचय करून देते तेव्हा आपल्याला भारताच्या श्रेष्ठतेचे दर्शन घडते.

मित्रांनो,

देश आणि जगाला भारताच्या याच सामर्थ्याचा परिचय करून देण्यासाठी एक भारत, श्रेष्ठ भारत पोर्टल तयार करण्यात आले आहे. आणि तुम्ही तर सगळे डिजिटल पिढीतील आहात त्यामुळे या पोर्टलला नक्की भेट द्या. या पोर्टलवर जो पाककृती विभाग आहे, या विभागात एक हजारांहून अधिक लोकांनी आपल्या प्रदेशातील पाककृती उपलब्ध केल्या आहेत. कधीतरी वेळ काढून तुम्ही हे पोर्टल नक्की बघा आणि कुटुंबातील अन्य सदस्यांना विशेष करून तुमच्या आईला सांगा, तुम्हाला नक्की आनंद मिळेल.

मित्रांनो , 

गेल्या दिवसांमध्ये कोरोना काळात शाळा, महाविद्यालये इत्यादी बंद झाल्यानंतरही देशातील युवा वर्गाने डिजिटल माध्यमातून अन्य राज्यांसोबत वेबिनार आयोजित केले. या वेबिनार्स मध्ये संगीत, नृत्य, खाद्यपदार्थांच्या वेगवेगळ्या राज्यातील विविध पद्धतींवर मोठ्या विशेष चर्चा झाल्या. प्रत्येक प्रांत, प्रत्येक प्रदेशातील भाषा, खाद्यपदार्थ आणि कलांचा प्रसार संपूर्ण देशात होण्यासाठी सरकारचेही प्रयत्न सुरु आहेत.  भारतातील प्रत्येक राज्याची जीवनशैली, सण उत्सवांविषयी देशात जागरूकता आणखी वाढली पाहिजे. विशेषतः आपल्या समृद्ध आदिवासी परंपरा, कला आणि कलाकुसर यातून देश खूप काही शिकू शकतो. या सर्व गोष्टी पुढे घेऊन जाण्यासाठी एक भारत श्रेष्ठ भारत अभियान खूप सहाय्य्यकारी ठरत आहे.

मित्रांनो,

आजकाल तुम्ही ऐकत असाल देशात व्होकल फॉर लोकल खूपदा बोलले जाते, हा शब्द अनेकदा कानावर पडतो. ज्या वस्तू आपल्या घराच्या आजूबाजूला तयार होत आहेत, स्थानिक स्तरावर तयार केल्या जात आहेत, त्यांचा आदर करणे, त्याचा अभिमान बाळगणे आणि त्याला प्रोत्साहित करणे, हेच आहे व्होकल फॉर लोकल. जेव्हा एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेतून सामर्थ्य मिळेल तेव्हाच ही व्होकल फॉर लोकल ची भावना आणखी बळकट होईल.  हरयाणाशी संबंधित एखाद्या गोष्टीचा मी तामिळनाडूत राहात असेल तरी मला अभिमान वाटायला हवा. मी हिमाचलमध्ये राहात असेन तरी मला केरळच्या एखाद्या गोष्टीचा अभिमान वाटायला हवा. एखाद्या प्रदेशातील स्थानिक उत्पादनाचा दुसऱ्या प्रदेशालाही अभिमान वाटेल. त्याला प्रोत्साहन मिळेल तेव्हाच स्थानिक उत्पादने देशभर पोहोचतील आणि त्या उत्पादनांमध्ये जागतिक उत्पादन बनण्याचे सामर्थ्य निर्माण होईल. 

मित्रांनो,

हे व्होकल फॉर लोकल, हे आत्मनिर्भर भारत अभियान यांची यशस्विता तुमच्यासारख्या तरुणांवर अवलंबून आहे आणि आज माझ्यासमोर एनसीसी आणि एनएसएसचे इतके सगळे तरुण आहेत. या सगळ्यांना शिक्षण - दीक्षा सर्व काही इथे दिले जाते. मी आज तुम्हाला एक छोटेसे कार्य देऊ इच्छितो आणि देशभरातील आपले एनसीसीचे तरुण मला या कार्यात नक्की मदत करतील. तुम्ही एक काम करा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या गोष्टींचा तुम्ही वापर करता, टूथपेस्ट असेल, टूथब्रश असेल, कंगवा असेल अगदी काहीही, घरातील एसी असेल, मोबाईल फोन असेल, काहीही असो जरा बघा तरी तुम्हाला दिवसभर किती गोष्टींची आवश्यकता भासते आणि त्यापैकी किती वस्तू आहेत त्या वस्तूंमध्ये  आपल्या देशातील मजुरांच्या घामाचा वास आहे. किती वस्तू आहेत ज्यात आपल्या या महान देशाच्या मातीचा सुगंध आहे. तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, कळत नकळत इतक्या परदेशी वस्तू आपल्या आयुष्यात  घुसल्या आहेत आणि हे आपल्याला माहितदेखील नाही. एकदा आपण यावर नजर टाकली तर आपल्याला समजेल आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी सगळ्यात पहिले कर्तव्य आपल्याकडूनच सुरु करावे लागेल. मी हे सांगतो आहे याचा अर्थ असा नाही की, कोणतेही परदेशी वस्तू तुम्ही उद्या जाऊन फेकून द्याल. मी असेही म्हटलेले नाही की, जगातील एखादी चांगली वस्तू असेल आणि ती आपल्याकडे नसेल तर ती खरेदी करू नये, हे शक्य होणार नाही ₹. मात्र आपल्याला माहितीदेखील नाही अशा वस्तूंनी आपल्याला दैनंदिन आयुष्यात एका प्रकारे गुलाम बनवले आहे, मानसिक गुलाम बनवले आहे. माझ्या तरुण मित्रांना मी आग्रह करेन की, तुम्ही आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना बसवून एक यादी तयार करा, एकदा बघा, तुम्हाला माझे शब्द पुन्हा आठवावे लागणार नाहीत, तुमचा आत्माच तुम्हाला सांगेल आपण आपल्या देशाचे कितीतरी नुकसान केले आहे.

मित्रांनो,

एखाद्याच्या सांगण्यामुळे भारत आत्मनिर्भर होणार नाही तर मी जसे तुम्हाला सांगितले की, तुमच्या सारख्या तरुण सहकार्यांमुळे भारत आत्मनिर्भर होईल. आणि तुमच्याकडे आवश्यक कौशल्य संच असेल तेव्हा तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे हे करू शकाल . 

मित्रांनो,

कौशल्याचे महत्व लक्षात घेऊनच, 2014 ला सरकार आल्यानंतर कौशल्य विकासासाठी विशेष मंत्रालय तयार  करण्यात आले. या अभियानाअंतर्गत आतापर्यंत साडे पाच कोटींहून अधिक युवा मित्रांना विविध कला आणि कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. कौशल्यविकासाच्या या कार्यक्रमांतर्गत केवळ प्रशिक्षणच दिले जात नाही तर रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी मदतही केली जात आहे. भारताकडे कौशल्य असलेला युवा वर्गही असावा आणि कौशल्य संचाच्या आधारे त्यांना रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध होतील, हे उद्दिष्ट आहे. 

मित्रांनो,

आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने देशाच्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात युवा वर्गाच्या कौशल्यावर भर देण्यात आला आहे. तुम्हीही ते पाहू शकाल. यात अभ्यासासोबतच अभ्यासाला उपयुक्त अशा एप्लिकेशनवरही तितकाच भर देण्यात आला आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा हा प्रयत्न आहे की, युवा वर्गाला त्यांच्या आवडीनुसार विषय निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. त्यांना कधी अभ्यास करायचा आहे , कधी अभ्यास सोडायचा आहे आणि पुन्हा कधी अभ्यास करायचा आहे, यासाठीही लवचिकता देण्यात आली आहे. आपले विद्यार्थी जे काही स्वतः करू इच्छितात त्यात ते पुढे जावेत हाच प्रयत्न आहे.

मित्रांनो,

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात  प्रथमच व्यावसायिक शिक्षणाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इयत्ता 6 वी पासूनच विद्यार्थ्यांना स्थानिक आवश्यकता आणि स्थानिक व्यवसायाशी संबंधित आपल्या आवडीचा  कोणताही अभ्यासक्रम निवडण्याचा पर्याय देण्यात आला आहे. हे अभ्यासक्रम फक्त अभ्यासासाठी नसतील तर शिकण्याचे आणि शिकविण्याचे हे अभ्यासक्रम असतील. यात स्थानिक कुशल कारागिरांसोबत प्रत्यक्ष अनुभवही दिला जाईल. त्यांनतर टप्प्याटप्प्याने सर्व माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक विषयात व्यावसायिक शिक्षणाला एकीकृत करण्याचेही उद्दिष्ट आहे. मी आज तुम्हाला हे विस्ताराने अशासाठी सांगत आहे, कारण तुम्ही जितके जागरूक राहाल तितकेच तुमचे भविष्यही उज्वल होईल.

मित्रांनो,

तुम्ही सगळे आत्मनिर्भर भारताचे खरे कर्णधार आहात. एनसीसी असेल, एनएसएस असेल किंवा दुसरी एखादी संस्था असेल, देशावर आलेली प्रत्येक आव्हाने, प्रत्येक संकटकाळात तुम्ही आपली भूमिका निभावली आहे. कोरोना काळातही तुम्ही स्वयंसेवकांच्या रूपात जे काम केले आहे, त्याची कितीही प्रशंसा केली तरी कमीच आहे. जेव्हा देशाला, शासन - प्रशासनाला सगळ्यात जास्त गरज होती, तेव्हा तुम्ही स्वयंसेवकांच्या रूपात पुढे येऊन व्यवस्था उभी करायला मदत केली. आरोग्य सेतू एपला जनतेपर्यंत पोहोचवणे असो की कोरोना संक्रमणाशी संबंधित इतर माहितीबाबत जागरूकता, तुम्ही प्रशंसनीय काम केले आहे. कोरोनाच्या या काळात फिट इंडिया मोहिमेच्या माध्यमातून तंदुरुस्तीसंदर्भात जनजागृती करण्यासाठी तुमची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे.

मित्रांनो,

तुम्ही आतापर्यंत जे काही केले त्याला पुढच्या टप्प्यात घेऊन जाण्याची वेळ आली आहे. आणि मी हे तुम्हाला यासाठी सांगत आहे, कारण देशाच्या प्रत्येक भागात, प्रत्येक समाजापर्यंत तुमची पोच आहे. माझा तुम्हाला आग्रह आहे की देशात सुरु असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशाची मदत करण्यासाठी तुम्ही पुढे यायला हवे.  देशातील अत्यंत गरीब आणि सामान्याहून सामान्य नागरिकांना लसीसंदर्भात तुम्ही योग्य माहिती द्यावी. कोरोना प्रतिबंधक लस भारतात तयार  करून, भारतीय वैज्ञानिकांनी आपले कर्तव्य योग्य प्रकारे निभावले आहे. आता आपल्याला आपले कर्तव्य पार पाडायचे आहे. असत्य आणि अफवा पसरविणाऱ्या प्रत्येक यंत्रणेला आपल्याला अचूक माहितीसह पराभूत करायचे आहे. आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहे की, कर्तव्याच्या भावनेने वचनबद्ध असल्यामुळेच आपले प्रजासत्ताक बळकट आहे. याच भावनेला आपल्याला मजबूत करायचे आहे. यामुळे आपले प्रजासत्ताकही  बळकट होईल आणि आत्मनिर्भरतेचा आपला संकल्पही दृढ होईल. तुम्हाला सगळ्यांना या महत्वपूर्ण राष्ट्रीय उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. मनाला जाणीव करून देण्याचा, देशासाठी काही ना काही करण्याचा, याच्यापेक्षा मोठा संस्कार अन्य कोणताही असूच शकत नाही.आपणा सर्वाना हे भाग्य लाभले आहे. मला विश्वास आहे की, 26 जानेवारीच्या भव्य कार्यक्रमानंतर तुम्ही जेव्हा घरी परताल, तेव्हा इथल्या अनेक गोष्टींची आठवण घेऊन जाल. मात्र त्यासोबतच हे कधीच विसरू नका, आपल्याला देशासाठी आपले सर्वोत्तम देणे आवश्यक आहे. ते आपल्याला द्यावेच लागेल आणि आपल्याला द्यायचेच आहे. आपणा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा ..

खूप खूप धन्यवाद ..

 

* * *

S.Tupe/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1708042) Visitor Counter : 178