पंतप्रधान कार्यालय

बांग्लादेशाच्या राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 26 MAR 2021 7:00PM by PIB Mumbai

नोमोश्कार !

मान्यवर,

बांग्लादेश चे राष्ट्रपती

अब्दुल हामिद जी,

 

पंतप्रधान

शेख हसीना जी,

 

कृषि मंत्री

डॉक्टर मोहम्मद अब्दुर रज्जाक जी,

 

मैडम शेख रेहाना जी,

 

इतर मान्यवर पाहुणे

 

शोनार बांग्लादेशेर प्रियो बोंधुरा, 

 

आपल्या सर्वांकडून इथे मिळालेला हा स्नेह माझ्या आयुष्यातील अत्यंत मौल्यवान क्षणांपैकी एक आहे.बांग्लादेशाच्या विकासयात्रेच्या या महत्वाच्या टप्प्यावर, तुमच्या आनंदात तुम्ही मला सहभागी करुन घेतलं, याचा मला विशेष आनंद आहे. आज बांग्लादेशाचा राष्ट्रीय दिवस आहे आणि ‘शाधी-नौता’ चा पन्नासावा वर्धापन दिवसही आहे. याच वर्षी भारत-बांगलादेश मैत्रीला 50 वर्षे पूर्ण होत  आहेत. जातिर पिता वंगबंधू शेख मुजीबूर रेहमान यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ करणारे ठरले आहे.

मान्यवर,

राष्ट्रपती अब्दुल हमीद जी, पंतप्रधान शेख हसीना जी आणि बांग्लादेशातील नागरिकांचे मी आभार मानतो. आपल्या या गौरवास्पद क्षणांचा, उत्सवाचा भागीदार बनण्यासाठी त्यांनी भारताला सप्रेम आमंत्रण दिले. मी सर्व भारतीयांच्या वतीने आपल्या सर्वांना बांग्लादेशातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो. बांग्लादेश आणि इथल्या लोकांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे, वंगबंधू शेख मुजीबूर रेहमान जी यांनाही आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. आम्हा भारतीयांसाठीही ही अभिमानास्पद बाब आहे की आम्हाला, शेख मुजीबूर रेहमान यांना गांधी शांतता पुरस्कार देण्याची संधी मिळाली. आज हा भव्य आणि सुरेख कार्यक्रम सादर करणाऱ्या सर्व कलाकारांचे मी कौतुक करतो.

 

बंधूगण, मला आज बांग्लादेशातील त्या लाखो मुला-मुलींचे स्मरण होत आहे, ज्यांनी आपला देश, आपली भाषा आणि आपल्या संस्कृतीसाठी अनन्वित अत्याचार सहन केले, आपले रक्त दिले, आपले आयुष्य पणाला लावले होते. बांगलादेश मुक्तीयुद्धातील शूरवीरांचे मी आज स्मरण करतो आहे. मी स्मरण करतो आहे, शहीद धीरेंद्रनाथ दत्तो यांचे, शिक्षणतज्ञ रॉफिकुद्दिन अहमद यांचे, भाषा शहीद सलाम, रॉफिक, बरकत, जब्बार आणि शफ़िऊर जी यांचे!

मी आज भारतीय सैन्यातील त्या वीर जवानांनाही वंदन करतो, ज्यांनी या मुक्तीयुद्धात बांग्लादेशातील बंधू-भगिनींच्या खांद्याला खांदा लावून लढा दिला. ज्यांनी या मुक्तीयुद्धासाठी आपले बलिदान दिले आणि स्वतंत्र बांगलादेशाच्या निर्मितीचे स्वप्न साकार करण्यात महत्वाची भूमिका पार पडली. फिल्ड मार्शल सॅम माणेकशा, जनरल अरोरा, जनरल जेकब, लांस नायक अल्बर्ट एक्का, ग्रुप कॅप्टन चन्दन सिंह, कॅप्टन मोहन नारायण राव सामंत असे असंख्य वीर आहेत ज्यांच्या नेतृत्व आणि साहसाच्या कथा आपल्याला आजही प्रेरणा देतात. बांगलादेश सरकारने या वीरांच्या स्मरणार्थ आशुगंज येथे युध्दस्मारक बांधून ते त्यांना समर्पित केले आहे. त्यासाठी देखील मी आपले आभार मानतो.

मला आनंद आहे की या मुक्तीयुद्धात सहभागी झालेले अनेक भारतीय सैनिक, आज विशेषतः आज या कार्यक्रमात माझ्यासोबत उपस्थित आहे. बांग्लादेशातील माझ्या बंधू-भगिनींनो आणि इथल्या नव्या पिढीला मी एका गोष्टीचे स्मरण करुन देऊ इच्छितो आणि अत्यंत अभिमानाने स्मरण करुन देऊ इच्छितो. बांग्लादेशाच्या स्वातंत्र्याच्या संघर्षात सहभागी होणे, हे माझ्या आयुष्यातील पहिल्या आंदोलनांपैकी एक आंदोलन होते. माझे वय त्यावेळी 20-22 वर्षे असेल, ज्यावेळी मी माझ्या अनेक सहकाऱ्यांसोबत बांग्लादेशाच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता.

बांग्लादेशाच्या स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ केलेल्या आंदोलनामुळे मला अटकही झाली होती, आणि तुरुंगात जाण्याचीही वेळ आली होती. म्हणजेच, बांग्लादेशाच्या स्वातंत्र्याची जेवढी आस इकडे होती, तेवढीच तिकडेही होती. इथे पाकिस्तान च्या सैन्याने जे अनन्वित नृशंस अत्याचार आणि अपराध केले, त्याची छायाचित्रे आम्हाला तिकडेही विचलित करत असत. कित्येक रात्री झोप येत नसे.

 

 

गोविंद हालदार यांनी म्हटले होते—

 

‘एक शागोर रोक्तेर बिनिमोये,

बांग्लार शाधीनोता आन्ले जारा,

आमरा तोमादेर भूलबो ना,

आमरा तोमादेर भूलबो ना’,

 

म्हणजे, ज्यांनी आपल्या रक्ताचा पाट वाहवून बांग्लादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यांना आम्ही कधीही विसरणार नाही. त्याना आम्ही कधीही विसरणार  नाही. एक निरंकुश सरकार आपल्याच नागरिकांचा नरसंहार करत होते.

त्यांची भाषा, त्यांचा आवाज, त्यांची ओळख चिरडून टाकत होते. ‘ऑपरेशन सर्च लाईट’ चे क्रौर्य, दडपशाही, अत्याचार याबाबत जगभरात जेवढी चर्चा व्हायला हवी होती,तेवढी चर्चा झाली नाही. बंधूगण, या सगळ्या काळात इथल्या लोकांसाठी आणि आम्हा भारतीयांसाठीही आशेचा किरण होते-बंगबंधू शेख मुजीबूर रेहमान.

 

बंगबंधू यांची हिम्मत, त्यांच्या नेतृत्वाने हा दृढनिश्चय केला होता की कोणतीही शक्ती आता बांग्लादेशाला गुलाम ठेवू शकत नाही.

 वंगबंधूंनी घोषणा केली होती –

 

एबारेर शोंग्राम आमादेर मुक्तीर शोंग्राम,

एबारेर शोंग्राम शाधिनोतार शोंग्राम।

 

यावेळचा संग्राम मुक्तीसाठी आहे, यावेळचा संग्राम स्वातंत्र्यासाठी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली इथले सर्वसामान्य नागरिक-मग ते पुरुष असो की स्त्री, शेतकरी, कामगार सगळे एकत्र येऊन मुक्तीवाहिनी तयार झाली होती.

 

आणि म्हणूनच, आजचा हा प्रसंग, मुजिब वर्ष, वंगबंधूंची दूरदृष्टी, त्यांचे आदर्श, आणि त्यांचे साहस याचे स्मरण करण्याचाही दिवस आहे. ही वेळ ‘चीर विद्रोहाची’ मुक्तीयुद्धाची भावना पुन्हा जागवण्याचा दिवस आहे. बंधूगण, बांग्लादेशाच्या स्वातंत्र्यसंग्रामाला भारताच्या कानाकोपऱ्यातून, प्रत्येक वर्गातून, पाठींबा मिळाला होता.

 

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे प्रयत्न आणि त्यांची महत्वपूर्ण भूमिका सर्वश्रुत आहे. त्याच काळात 6 डिसेंबर 1971 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी म्हटले होते, ‘आम्ही केवळ मुक्ती संग्रामात आपल्या जीवनाची आहुती देणाऱ्यासमवेत लढत आहोत असे नव्हे तर इतिहासाला नवी दिशा देण्याचाही प्रयत्न करत आहोत.बांगलादेशमध्ये त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे आणि भारतीय जवान यांचे रक्त बरोबरीने सांडत आहे. या रक्तामुळे असे संबंध निर्माण होतील जे कोणत्याही दबावाने तुटणार नाहीत, कोणत्याही मुत्सद्देगिरीला बळी पडणार नाहीत.” आमचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटले होते, बंगबंधूना त्यांनी  टायरलेस स्टेट्समन म्हटले होते.शेख मुजीबुर रहेमान यांचे जीवन धैर्य, कटिबद्धता आणि आत्मसंयमाचे प्रतिक आहे असे त्यांनी म्हटले होते.

बंधुनो, बांगलादेशच्या स्वातंत्र्याची 50 वर्षे आणि भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे एकाच काळात आली आहेत हा एक सुखद योगायोग आहे. दोन्ही देशांसाठी 21 व्या शतकातली पुढच्या 25 वर्षांचा प्रवास अतिशय महत्वाचा आहे. आपला वारसा  सामायिक आहे,  आपला विकासही सामायिक आहे. आपले लक्ष्य, आपली आव्हानेही सामायिक आहेत. व्यापार आणि उद्योग यामध्ये आपल्याला समान संधी आहेत त्याच वेळी हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की दहशतवादासारखे समान धोकेही आहेत.अशा अमानवी कारवायांना पाठींबा देणाऱ्या शक्ती अद्यापही सक्रीय आहेत.

आपल्याला त्यांपासून सावध राहायला हवे आणि त्यांच्याशी मुकाबला करण्यासाठी एकजूट राहायला हवे. आपल्या दोन्ही देशांकडे लोकशाहीचे सामर्थ्य आहे आणि पुढच्या वाटचालीसाठी स्पष्ट संकल्पही  आहेत. भारत आणि बांगलादेश यांची बरोबरीने आगेकूच ही या संपूर्ण प्रांताच्या विकासासाठी तितकीच आवश्यक आहे.

म्हणूनच भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांची सरकारे हे जाणून या दिशेने प्रयत्न करत आहेत. परस्पर विश्वास आणि सहकार्य यामुळे प्रत्येक बाबतीत तोडगा निघू शकतो हे आम्ही दर्शवले आहे. भू हद्दी विषयीचा करार याचीच प्रचीती देत आहे. कोरोनाच्या या कालखंडातही दोन्ही देशात उत्तम समन्वय राहिला आहे.

सार्क  कोविड निधी स्थापनेसाठी तसेच मनुष्य बळ प्रशिक्षणातही आम्ही सहयोग दिला.मेड इन इंडिया,भारतात निर्मिती झालेली लस बांगलादेशच्या आमच्या बंधू-भगिनीच्या उपयोगाला येत  आहे याचा आम्हाला आनंद आहे.  या वर्षी 26 जानेवारीला भारताच्या प्रजासत्ताक दिनी, बांगलादेश सशस्त्र दलाच्या त्रि सेवा दलांनी शोनो मुजीबोरेर थेके धुनवर संचलन केले होते त्याचे चित्र अद्याप माझ्या स्मरणात आहे.

भारत आणि बांगला देश यांचे भविष्य सद्भावपूर्ण, परस्पर विश्वासाने युक्त अशा अगणित क्षणांची प्रतीक्षा करत आहे. मित्रहो, भारत बांगलादेश यांच्यातले संबंध बळकट करण्यासाठी दोन्ही देशांमधल्या युवकांमधला  परस्पर संबंध तितकाच आवश्यक आहे. भारत- बांगलादेश यांच्यातल्या संबंधांच्या  50 वर्षानिमित्त बांगलादेशातल्या 50 उद्योजकांना मी भारतात आमंत्रित करू इच्छितो.

 त्यांनी भारतात यावे,आमची स्टार्ट अप आणि नवोन्मेश परिसंस्था यांच्याशी  परिचित व्हावे  स्टार्ट अपना भांडवल पुरवणाऱ्याशी संवाद साधावा. आम्हीही त्यांच्याकडून शिकू आणि त्यानाही शिकण्याची संधी मिळेल. याबरोबरच बांगलादेशच्या युवकांसाठी सुवर्ण जयंती शिष्यवृत्तीची मी घोषणा करत आहे.

मित्रहो, बंगबंधू शेख मुजीबुर रेहमान यांनी म्हटले होते,  

"बांग्लादेश इतिहाशे, शाधिन राष्ट्रो, हिशेबे टीके थाकबे बांग्लाके दाबिए राख्ते पारे, एमौन कोनो शोक़्ति नेइ” बांगलादेश स्वतंत्र होणारच. बांगलादेशचा आवाज दाबून ठेवण्याचे सामर्थ्य कोणामध्ये नाही. बंगबंधुंची ही घोषणा बांगलादेशाच्या अस्तित्वाला विरोध करणाऱ्यांसाठी इशाराही होता आणि बांगलादेशाच्या सामर्थ्यावर विश्वासही होता. शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेश आपली चमक जगाला दाखवत आहे याचा मला आनंद आहे. ज्या लोकांना बांगलादेशच्या निर्मितीवर आक्षेप होता, ज्या लोकांना बांगला देशाच्या अस्तित्वावर शंका  होती त्यांना बांगला देशाने चुकीचे ठरवले आहे.

मित्रहो,

आपल्या समवेत काझी नॉजरुल इस्लाम आणि गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांचा  समान वारसा आणि त्याची प्रेरणा आहे.

गुरुदेवांनी म्हटले होते,

काल नाइ,

आमादेर हाते;

 

काराकारी कोरे ताई,

शबे मिले;

 

देरी कारो नाही,

शहे, कोभू

म्हणजे आपण आता वेळ दवडू शकत नाही, परिवर्तनासाठी आपल्याला पुढे जावेच लागेल,आपण आता आणखी विलंब करू शकत नाही. हे भारत आणि बांगलादेश या दोघांना एकसारखेच लागू होते.

आपल्या कोट्यवधी लोकांसाठी, त्यांच्या भविष्यासाठी, दारिद्रयाविरोधातल्या लढ्यासाठी, दहशतवादाविरोधातल्या लढाईसाठी आपले लक्ष्य एक आहे म्हणूनच प्रयत्नही अशाच प्रकारे एकजुटीने व्हायला हवेत.भारत आणि बांगलादेश एकत्रितपणे  वेगाने प्रगती करतील असा मला विश्वास आहे.

या पवित्र पर्वानिमित्त बांगलादेशाच्या सर्व नागरिकांना मी पुन्हा एकदा खूप- खूप शुभेच्छा देतो आणि आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.

भारोत बांग्लादेश मोईत्री चिरोजीबि होख।

या शुभेच्छांसह मी  भाषणाला विराम देतो.

जय बांगला !

जय हिंद  !

MC/RA/NC/CY

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1708009) Visitor Counter : 210