रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

हरित दृष्टीकोन ठेवून पायाभूत सुविधांचा विकास करण्याची गरज आहे: केंद्रीय मंत्री गडकरी

Posted On: 24 MAR 2021 6:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 मार्च 2021


आपल्या देशाला विकास हवा आहे, मात्र तो करताना सजीव सृष्टीची परिसंस्था आणि पर्यावरण यांन सुस्थितीत ठेवणे आवश्यक आहे असे ठाम प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. “हरित सुविधा केंद्रित” दृष्टिकोनावर आधारित आभासी राष्ट्रीय मार्ग आणि महामार्ग परिषदेला संबोधित करताना त्यांनी आज हरित महामार्गाच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांबद्दल चर्चा केली. ते म्हणाले की हे महामार्ग हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे, कार्बनची पदचिन्हे आणि पारंपरिक उर्जा स्त्रोतांचा वापर या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी उपयुक्त असतात.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हाती घेतलेल्या उल्लेखनीय पर्यावरणस्नेही उपक्रमांबाबत माहिती देताना गडकरी यांनी सांगितले की, राष्ट्राय महामार्गांच्या बाजूने पर्जन्य जल संधारणासारख्या उपायांनी पाण्याचे संचयन सुनिश्चित करणे तसेच कृत्रिम भूजल पुनर्भरण यंत्रणा विकसित करणे यासारखे उपक्रम राबविले जात आहेत. तसेच सर्व टोल वसुली केंद्रांमध्ये सौर उर्जेचा वापर अनिवार्य केला आहे असे ते म्हणाले.रस्ते आणि पुलांच्या उभारणीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या सुधारित खनिजात 10% प्लास्टिक किंवा रबर वापरण्याचा निर्णय मंत्रालयाने घेतला आहे आणि हा पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे असे ते म्हणाले. रस्ते निर्मितीच्या कामात काथ्या आणि ताग यांच्या चटया वापरण्याच्या दृष्टीने मंत्रालय नियोजन करीत आहे अशी माहिती गडकरी यांनी दिली.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत हरित महामार्ग अभियानाची स्थापना करण्यात आली आहे आणि त्याच्या अंतर्गत महामार्गांलगत वृक्षारोपण करण्यात येत आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या झाडांना वाचविण्यासाठी प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची गरज गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली. रस्ते निर्मिती करताना एकही झाड कापण्याची गरज पडू नये म्हणून प्रत्यारोपण करण्याच्या कामांसाठी 1000 कंत्राटदारांची नेमणूक करण्याचा विचार मंत्रालय करीत आहे असे ते म्हणाले. जिथे शक्य असेल तिथे अभयारण्य तसेच राष्ट्रीय उद्याने यांचे परिसर टाळावेत आणि नियोजित मार्ग बदलून, वळसा घेऊन उर्वरित काम पूर्ण करावे अशा सूचना मंत्रालयाने रस्ते निर्मितीशी संबंधित सर्व संस्थांना दिल्या आहेत अशी माहिती गडकरी यांनी दिली.

रस्ते आणि पुलांच्या बांधणीच्या कामात सिमेंट आणि पोलाद यांचा वापर कमी करण्यासाठी मंत्रालय उपाय शोधत असून या कामात सिमेंट आणि पोलादाचा वापर टाळण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.  

वाया जाणाऱ्या घटकांपासून संपत्ती आणि ऊर्जा यांची निर्मिती करणे हा पर्यावरणविषयक समस्या सोडविण्यासाठी योजलेल्या अनेक उपायांपैकी एक महत्त्वाचा शाश्वत उपाय आहे असे ते म्हणाले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी विजेचा वापर करण्यासाठी सरकार प्राधान्याने प्रयत्नशील आहे असे त्यांनी सांगितले. प्रतिदिन 34 किलोमीटर या वेगाने, एप्रिल 2020 पासून आतापर्यंत 12,205 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करून रस्ते बांधणीतील महत्त्वाचा टप्पा पार केल्याची माहिती केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिली.

गडकरी यांचे संपूर्ण भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://www.youtube.com/watch?v=URtXYlt-CvQ


* * *

M.Chopade/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1707335) Visitor Counter : 170