ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय
आयसीआरआयईआरने आयोजित केलेल्या “ॲक्ट इस्ट नीती”वरील वेबिनारमध्ये केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंग यांचे बीजभाषण
प्रविष्टि तिथि:
20 MAR 2021 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मार्च 2021
भारतीय स्वातंत्र्याच्या सन 2022 मध्ये साजऱ्या होणाऱ्या अमृत महोत्सवाच्या देशभर सुरु असलेल्या तयारीचा आढावा घेता, त्या प्रसंगी ईशान्य भारत नव्या भारताचे नेतृत्व करेल असा विश्वास केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अंतराळ विभाग मंत्री जितेंद्र सिंग यांनी व्यक्त केला आहे. “ ॲक्ट इस्ट नीती: ईशान्य प्रदेशातील व्यापारविषयक पायाभूत सुविधा आणि संपर्क यंत्रणा यांच्यात सुधारणा”या विषयावर आयसीआरआयईआर अर्थात आंतरराष्ट्रीय आर्थिक नातेसंबंधांच्या संशोधनासाठीच्या भारतीय परिषदेने आयोजित केलेल्या चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

कोविड पश्चात काळात, देशाच्या ईशान्य प्रदेशातील आतापर्यंत अज्ञात असलेल्या प्रचंड क्षमता आणि साधनसंपत्तीची काळजी घेतल्याशिवाय, भारताचे आर्थिक पुनरुत्थान होऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
सन 2014 मध्ये सत्तेवर आल्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “अॅक्ट इस्ट नीती”च्या संकल्पनेचे स्वप्न पाहिले आणि यापूर्वीच्या काळात “लुक इस्ट अर्थात पूर्वेकडे लक्ष द्या” या स्वरुपात असलेल्या धोरणाला नवे स्वरूप देऊन आपल्या दृष्टीकोनाला नवी उर्जा देण्यात आणि शेजारी देशांशी असलेल्या आपल्या नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असे ते म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी जेव्हापासून पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली तेव्हापासूनच भारताच्या ईशान्येकडील प्रदेशाच्या विकासाला त्यांनी विशेष प्राधान्य मिळेल याकडे त्यांनी लक्ष दिले आणि या गोष्टीला विशेष महत्त्व आहे कारण जर भारताला पूर्वेकडील सीमेपलीकडच्या देशांशी यशस्वीपणे संबंध प्रस्थापित करून टिकवायचे असतील तर देशाच्या पूर्व सीमेजवळील म्हणजेच ईशान्य भागातील राज्यांमध्ये सशक्त पाया घडवायला हवा असे सिंग यांनी सांगितले.
ईशान्य प्रदेशाचे भौगोलिक स्थान आणि संपन्न नैसर्गिक तसेच कृषी-हवामान संबंधी साधनसंपत्ती यांच्यामुळे,या भागातील व्यापार आणि उद्योगांच्या संधींचा जास्तीत जास्त उपयोग होण्यासाठी या भागाला वेगाने विकसित होणाऱ्या आसियान बाजारात प्रवेश मिळायला हवा असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपामुळे भारत-बांगलादेश करार यशस्वीपणे साध्य झाला आणि त्यामुळे बांगलादेश आणि इतर प्रदेशातून सुगम आणि किफायतशीर अनेक गोष्टींचे आदानप्रदान शक्य झाले याची त्यांनी आठवण करून दिली.
आयसीआरआयईआरमध्ये कार्यरत प्राध्यापक निशा तनेजा यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधनाद्वारे ईशान्य प्रदेशातील व्यापारविषयक पायाभूत सुविधा आणि संपर्क यंत्रणा यांच्यात सुधारणा घडवून आणण्याचे महत्त्व याप्रसंगी बोलताना अधोरेखित केले.
G.Chippalkatti/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1706326)
आगंतुक पटल : 210