माहिती आणि प्रसारण मंत्रालय
डिजिटल तंत्रज्ञान क्रांतीमुळे समाजात महत्वपूर्ण सकारात्मक बदल - केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी सरकारने जारी केलेल्या नियमांच्या माध्यमातून पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न आणि विविध माध्यमांना समान संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न - केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
Posted On:
20 MAR 2021 3:54PM by PIB Mumbai
मुंबई, 20 मार्च 2021
ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी सरकारने जारी केलेल्या नियमांच्या माध्यमातून पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला आहे असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केले. एका खासगी वृत्तसंस्थेद्वारे आयोजीत 'माझा महाराष्ट्र, डिजिटल महाराष्ट्र' या कार्यक्रमाचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज मुंबईत उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. ओटीटी प्लॅटफॉर्म ही चांगली गोष्ट आहे, माहितीचा स्रोत सर्वांपर्यंत पोहचला पाहिजे पण तो योग्य, अचूक असावा, असे त्यांनी नमूद केले. ओटीटी प्लॅटफॉर्म साठीचे नियम ही केवळ एक न्याय्य व्यवस्था (Fair system), स्वयंनियंत्रण (Self- regulation) आहे आणि आम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म नियंत्रित करत नाही किंवा स्वातंत्र्यावर निर्बंध घातलेले नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले. जो नियम ओटीटी प्लॅटफॉर्म यांना आहे तोच विविध विविध माध्यमांना आहे, मग ती इलेक्ट्रॉनिक किंवा मुद्रित माध्यमे किंवा डिजिटल पोर्टल असोत, असेही त्यांनी सांगितले.
डिजिटल तंत्रज्ञानामुळे प्रशासनात पारदर्शकता आली असून हा एक महत्वपूर्ण सकारात्मक बदल डिजिटल क्रांतीमुळे घडून आल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. डिजिटल तंत्रज्ञानामुळे प्रशासनात झालेल्या चांगल्या लाभांविषयी बोलताना ते म्हणाले की याच डिजिटल क्रांतीमुळे सुमारे 12 कोटी 30 लाख शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये 2 हजार रुपये एका क्लिकवर जमा झाले आहेत. तसेच मधली गळतीही थांबली असे त्यांनी नमूद केले. गेल्या 3 वर्षात साधारण 35 कोटी लोकांना 13 लाख कोटी रुपये डीबीटीच्या (Direct Benefit Transfer) माध्यमातून पाठवण्यात आले. प्रत्येकाला पैसा हातात मिळाला, हा तंत्रज्ञानाने जीवनात, राजकारणात आणि प्रशासनात घडवलेला महत्वपूर्ण बदल आहे असे जावडेकर म्हणाले. इनकम टॅक्स रिफंड महिन्याभरात प्राप्त होणे डिजिटल तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे असेही ते म्हणाले. आज डिजिटल युगात आपण भाजीपाला यासारख्या किरकोळ खर्चासाठी देखील यू पी आय (UPI), भीम (BHIM)अँप अशा डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
कोविड काळात एका वर्षामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या 50 बैठका व्हर्च्युअल अर्थात आभासी पद्धतीने झाल्या, त्यामुळे कुठलाही निर्णय अडकला नाही असेही प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सांगितले. याशिवाय कोरोना काळात महाभारत, रामायण यासारख्या अजरामर कलाकृती पुन्हा दूरदर्शनच्या माध्यमातून दाखवण्याच्या आमच्या निर्णयाने नव्या पिढीनेही या मालिका अनुभवल्या आणि मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला असे त्यांनी सांगितले.
अभिनेता श्रेयस तळपदे, ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजित सिंह डिसले आणि इतर मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते यावेळी ब्लॉग माझा आणि मीम (Memes) स्पर्धेच्या विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.
RT/ST/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1706280)
Visitor Counter : 263