पंतप्रधान कार्यालय

श्रीमद् भगवद्गीतेच्या श्लोकांवरील हस्तलिखित प्रकाशनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 09 MAR 2021 8:35PM by PIB Mumbai

कार्यक्रमाला माझ्यासोबत उपस्थित असलेले जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हाजी आणि   धर्मार्थ ट्रस्टचे अध्यक्ष विश्वस्त डॉ करण सिंह, इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो, 

आज आम्ही श्रीमद् भगवद्गीतेच्या 20 व्याख्या एकत्रित करणारे 11 खंड प्रकाशित करीत आहोत. या पवित्र कार्यासाठी प्रयत्न करणारे सर्व विद्वान, याच्याशी निगडित प्रत्येक व्यक्ती आणि त्यांनी केलेल्या प्रत्येक प्रयत्नांसाठी मी त्यांना आदरपूर्वक नमन करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो. आपण आजची तरुण पिढी तसेच येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी ज्ञानाची गंगा उपलब्ध करुन देण्याचे एक मोठे कार्य केले आहे. मी विशेषतः डॉ. करण सिंह यांचे अभिनंदन करतो, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य सिद्ध झाले.  मी जेव्हा कधी त्यांना भेटलो, तेव्हा त्यांच्याकडे असलेला ज्ञान आणि संस्कृतीचा झरा अखंड वाहत असलेला मला जाणवला, अशा दुर्मिळ व्यक्ती फार कमी असतात. आणि आज करण सिंह यांचा वाढदिवस आहे हा तर अतिशय शुभ प्रसंग आहे आणि एक प्रकारे त्यांचा 90 वर्षांचा सांस्कृतिक प्रवास आहे. मी मनापासून त्यांचे अभिनंदन करतो. मी तुमच्या दीर्घायुष्य, चांगल्या आरोग्याची मनोकामना करतो. डॉ. करण सिंह यांनी भारतीय तत्त्वज्ञानासाठी केलेले कार्य, या पवित्र कार्यासाठी त्यांनी आपले जीवन ज्या प्रकारे समर्पित केले आहे, त्याचा प्रकाश आणि प्रभाव भारतीय शिक्षण विश्वावर स्पष्टपणे दिसून येतो. शतकानुशतके संपूर्ण भारताच्या विचार परंपरेचे नेतृत्व करणाऱ्या  जम्मू-काश्मीरची ओळखही आपल्या प्रयत्नांनी त्यांनी पुन्हा जिवंत केली आहे. काश्मीरचे भट्ट भास्कर, अभिनवगुप्त, आनंदवर्धन, असंख्य विद्वानांनी गीतेचे रहस्य आपल्यासमोर उलगडले. देशाची संस्कृती समृद्ध करण्यासाठी आज ती महान परंपरा पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. काश्मिर सोबत संपूर्ण देशासाठी ही अभिमानाची बाब आहे.

मित्रांनो,

एकाच ग्रंथातील प्रत्येक श्लोकाच्या भिन्न-भिन्न व्याख्या, इतके गूढ अर्थ,  यातून गीतेच्या अथांगतेची प्रचीती येते. हजारो विद्वानांनी गीतेचा सखोल अभ्यास करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले.  हे भारताच्या वैचारिक स्वातंत्र्य आणि सहिष्णुतेचे देखील प्रतीक आहे, जे प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा विचार आणि दृष्टीकोन मांडण्यासाठी प्रेरित करते. काहींसाठी गीता हा ज्ञान ग्रंथ आहे, काहींसाठी ते सांख्यशास्त्र आहे, काहींसाठी योगसूत्र आहे, तर काहींसाठी कर्म पाठ आहे.  आता मी जेव्हा गीतेकडे पाहतो, तेव्हा ते मला विश्वरूप समान जाणवते, ज्याचे दर्शन आपल्याला  11 व्या अध्यायात होते - मम देहे गुडाकेश यच्च अन्यत् द्रष्टुम इच्छसि।  अर्थात तुम्हाला माझ्यामध्ये जे पाहण्याची इच्छा आहे ते तुम्ही पाहू शकता. प्रत्येक विचार, प्रत्येक शक्तीचे दर्शन तुम्ही करू शकता. 

मित्रांनो,

 

महाभारतापासून ते अगदी स्वातंत्र्यलढ्यापर्यंत प्रत्येक काळात गीतेच्या विश्वरूपाने आपल्या देशाचे मार्गदर्शन केले आहे. तुम्ही पहा, भारताला एकतेच्या सूत्रात बांधणाऱ्या आदी शंकराचार्यानी गीता म्हणजे आध्यात्मिक जाणीव या दृष्टीकोनातून पाहिले. रामानुजाचार्य यांच्यासारख्या संतानी गीता म्हणजे  आध्यात्मिक ज्ञानाची  अभिव्यक्ती मानली. स्वामी विवेकानंदासाठी गीता म्हणजे अतूट कर्मनिष्ठा आणि अजोड आत्मविश्वास यांचा स्त्रोत राहिली. श्री अरबिंदो यांच्यासाठी गीता म्हणजे ज्ञान आणि मानवता यांचे प्रतिरूप होते. महात्मा गांधींसाठी गीता म्हणजे अनेक कठीण काळात पथदर्शक होती. नेताजी सुभाष चंद्र बोस यांची देशभक्ती आणि पराक्रम यांचे स्फूर्तीस्थान गीता होती. या गीतेचा अर्थ बाळ गंगाधर टिळक यांनी उलगडला आणि स्वातंत्र्य लढ्याला नवे सामर्थ्य दिले. मला वाटते की ही यादी एवढी मोठी आहे की यासाठी आपल्याला वेळ कमी पडेल. देश स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असताना आपण सर्वांनी गीतेची ही बाजू देखील देशासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गीतेने स्वातंत्र्यलढ्याला कशी उर्जा दिली, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना देशासाठी बलिदान करण्याचे धैर्य दिले, गीतेने देशाला ऐक्याच्या आध्यात्मिक सूत्रात कसे बांधून ठेवले, या सगळ्यावर देखील तुम्ही संशोधन, लेखन करा आणि आपल्या तरुण पिढीला याची माहिती द्या. 

मित्रांनो,

गीता हा भारताची एकता आणि एकरूपतेच्या भावनेचा मूळ गाभा आहे, कारण गीतेत सांगितले आहे-  - ‘समम् सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तम् परमेश्वरम्’।  अर्थात, प्रत्येक प्राणीमात्रामध्ये देवाचा वास आहे. नरच नारायण आहे. गीता हे ज्ञान आणि संशोधनाच्या आपल्या प्रवृत्तीचे प्रतीक आहे, कारण गीते मध्ये म्हंटले आहे - ‘न हि ज्ञानेन सदृशम् पवित्रम् इह विद्यते’। अर्थात ज्ञानाशिवाय पवित्र काहीही नाही. गीता ही भारताच्या वैज्ञानिक स्वभाव वैज्ञानिक विचारांचा स्रोत देखील आहे, कारण गीतेमध्ये एक श्लोक आहे - ‘ज्ञानम् विज्ञानम् सहितम् यत् ज्ञात्वा मोक्ष्यसे अशुभात्’।  अर्थात जेव्हा ज्ञान आणि विज्ञान एकत्र येतात तेव्हाच समस्या आणि दुःखाचे निराकरण होते.  शतकानुशतके गीता भारताच्या  कर्म निष्ठेचे प्रतीक आहे, गीतेमध्ये म्हंटले आहे - ‘योगः कर्मसु कौशलम्’।   अर्थात आपले कर्तव्ये सक्षमपणे करणे म्हणजेच योग होय.

मित्रांनो,

गीता हा एक अध्यात्मिक ग्रंथ आहे ज्यामध्ये ‘न अनवाप्तम् अवाप्तव्यम् वर्त एव च कर्मणि’। अर्थात देव हे सर्व लाभ-तोटा आणि इच्छांपासून मुक्त असले तरी ते कर्म केल्याशिवाय राहू शकत नाहीत असे म्हणायचे धैर्य केले. म्हणूनच कोणतीही व्यक्ती ही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही ही गोष्ट गीता पूर्ण व्यावहारिकतेने सांगते. आपण कर्मापासून मुक्त होऊ शकत नाही. आता आपल्या कर्माला कोणती दिशा द्यायची, कोणते स्वरूप द्यायचे ही आता आपली जबाबदारी आहे. गीता आपल्याला मार्ग दाखवते, आपल्याला कोणताही आदेश देत नाही. गीतेने अर्जुनाला कोणतेही आदेश दिले नाहीत  आणि आताच डॉ साहेबांनी सांगितले की गीता कोणताच उपदेश देत नाही.  संपूर्ण गीतेच्या उपदेशानंतर श्रीकृष्णाने शेवटच्या अध्यायात अर्जुनाला हेच सांगितले होते, म्हणजे सर्व काही सांगितल्यावर, जे आवश्यक आहे ते सर्व ठासून संगीतल्यावर सरते शेवटी त्याने काय सांगितले - ‘यथा इच्छसि तथा कुरु’।  अर्थात, आता मला जे काही सांगायचे होते ते सर्व सांगून झाले आहे,   आता तुला जे योग्य वाटेल ते तू कर. इतका उदार विचारवंत दुसरा कोणी असू शकत नाही.  कर्म आणि विचारांचे स्वातंत्र्य हीच  भारताच्या लोकशाहीची खरी ओळख आहे. आपली लोकशाही आपल्या विचारांचे स्वातंत्र्य देते, काम करण्याचे स्वातंत्र्य आहे, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात समान हक्क देते. राज्यघटनेचे रक्षण करणार्‍या लोकशाही संस्थांकडून आम्हाला हे स्वातंत्र्य मिळते. म्हणून जेव्हा कधी आपण आपल्या अधिकाराविषयी बोलतो तेव्हा आपल्याला लोकशाही कर्तव्यांची देखील जाण ठेवली पाहिजे. देशात असेही काही लोकं आहेत जे नेहमी, आपल्या घटनात्मक संस्थांच्या सन्मानाला, त्यांच्या विश्वासार्हतेवर कशा प्रकारे आघात केला जाईल नेहमी हाच प्रयत्न करत असतात. आपली संसद असो, न्यायव्यवस्था, सैन्य असो, आपल्या स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी या सगळ्यावर आघात करण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रवृत्तीमुळे देशाचे खूप मोठे नुकसान होते. अशी माणसे देशाच्या मुख्य प्रवाहाचे प्रतिनिधित्व करीत नाहीत ही समाधानाची बाब आहे. कर्तव्ये हाच आपला संकल्प समजून आज देश पुढे जात आहे. गीतेच्या कर्मयोगाला मंत्र बनवून, देश आज गाव-गरीब, शेतकरी-मजूर, दलित-मागासवर्गीय, समाजातील प्रत्येक वंचित लोकांची सेवा करण्याचा, त्यांचे जीवन बदलण्याचा प्रयत्न करीत आहे.

मित्रांनो,

गीतेच्या माध्यमातून भारताने देश आणि काळाच्या सीमा ओलांडून संपूर्ण मानवतेची सेवा केली आहे. गीता तर एक असा ग्रंथ आहे की, तो संपूर्ण विश्वासाठी, विश्वातल्या प्रत्येक प्राणीमात्रासाठी आहे. दुनियेतल्या असंख्य भाषांमध्ये गीतेचा अनुवाद झाला आहे. कितीतरी देशांमध्ये गीतेवर शोध करण्यात येत आहे. विश्वातल्या कितीतरी विव्दानांनी गीतेचा अभ्यास केला आहे. भारताचा आदर्श गुण म्हणजे निःस्वार्थ सेवा, या भारताच्या गुणाचा परिचय संपूर्ण दुनियेमध्ये गीता ग्रंथामुळे होऊ शकला आहे. नाही तर, भारताची निःस्वार्थ सेवा, आपल्याकडे असलेली ‘विश्व बंधुत्वा’ची भावना ही अनेकांसाठी कोणत्याही आश्चर्यापेक्षा कमी नाही.

आपण बघा,

कोरोनासारखी महामारीची समस्या दुनियेसमोर निर्माण झाली. त्यावेळी या संकटाच्या धोक्याविषयी संपूर्ण विश्वाला फारशी कल्पना नव्हती. एक ‘निनावी शत्रू’ च  सर्वांसमोर आला होता. त्याच्याशी दोन हात करण्याची दुनियेची तयारी नव्हती, मानवाची तयारी नव्हती  आणि तशीच स्थिती भारतामध्येही होती. परंतु भारताने स्वतःला तर सावरलेच आणि त्याचबरोबर विश्वाच्या सेवेसाठी जे काही शक्य आहे, ते केले. विश्वासाठी काम करण्याची वेळ आली त्यावेळी,  भारत मागे हटला नाही. दुनियेतल्या विविध देशांना औषधांचा पुरवठा केला. ज्या गोष्टींची, वस्तूंची आवश्यकता होती, ती सर्व सामुग्री पोहोचवली. आज दुनियेमध्ये अनेक देश असे आहेत, की ज्यांच्याकडे लस बनविण्यासाठी आवश्यक साधन-स्त्रोत नाहीत. अशा देशांना भारताने कोणत्याही अटी-नियम आणि करार आणि शर्ती यांचा विचार न करता, कोणत्याही अटीविना लस दिली आहे. तिथल्या लोकांनाही भारताने दिलेल्या या सेवेमुळे सुखद आश्चर्य वाटले. त्यांच्यासाठी हा एक वेगळाच अनुभव आहे.

मित्रांनो,

याच पद्धतीने दुस-या देशांचे जे अनेक लोक जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले होते. भारताने त्यांनाही सुरक्षितपणे त्यांच्या त्यांच्या मायदेशी पोहोचवले. अशी कामे करताना भारताने नफा-नुकसानीचे कोणतेही गणित मांडले नाही. केवळ मानवाची सेवा करणे कर्म आहे असे मानून भारताने हे कर्तव्य पार पाडले. ज्यावेळी दुनियेतले लोक, विश्वाचे नेता भारताने केलेल्या मदतीविषयी बोलतात, माझ्याशी बोलताना भारताला याबद्दल धन्यवाद देतात, त्यावेळी मी म्हणतो, भारताच्या दृष्टीने ही काही मदत नाही तर आमच्यावर इतरांना मदत करण्याचे झालेले संस्कार आहेत. भारताच्या दृष्टीने ही महानता नाही तर मानवता आहे. भारत अनेक युगांपासून अशा प्रकारे निष्काम भावनेने मानव मात्रांची सेवा करीत आला आहे. ज्यावेळी लोक गीतेची पाने उलटतात, आणि त्याचा अर्थ जाणून घेतात त्याचवेळी भारताच्या सेवा संस्काराचे मर्म लोकांना समजते. गीतेने आपल्याला  पावलो-पावली हेच शिकवले आहे. - ‘‘कर्मणि एव अधिकारः ते मा फलेषु कदाचन’’ याचा अर्थ, कोणत्याही फळाची चिंता, अपेक्षा न करता निष्काम भावनेने कर्म करीत रहावे. गीतेने आपल्याला सांगितले आहे - ‘‘युक्तः कर्म फलं त्यक्त्वा शान्तिम् आप्नोति नैष्ठिकीम्’’ याचा अर्थ असा आहे की, लाभाची चिंता न करता, कर्म हे कर्तव्य भावनेने, सेवाभावनेने केले तर, आंतरिक शांती मिळते. मनाला शांती मिळणे हेच सर्वात मोठे सुख आहे, सर्वात मोठा पुरस्कार आहे.

मित्रांनो,

गीतेमध्ये तामसिक, राजसिक आणि सात्विक, अशा तीन प्रवृत्तींचे वर्णन भगवान कृष्णाने केले आहे. आज माझ्यासमोर असलेल्या अनेक लोकांपैकी गीता जाणणारे, गीतेचे मर्मज्ञ लोकही आहेत. तुम्ही सर्वजण चांगले जाणता की, गीतेच्या 17 व्या अध्यायामध्ये याविषयी श्लोक आहे. आणि माझ्या अनुभवानुसार जर आपण साध्या, सोप्या पद्धतीने त्याचा अर्थ लावला तर या तामसिक, राजसिक आणि सात्विक प्रवृत्तीविषयी बोलायचे झाले तर, जे काही सर्वांजवळ आहे, ते माझे व्हावे- आपल्यालाच मिळावे, ही तामसिक प्रवृत्ती झाली. याच कारणामुळे जगामध्ये युद्ध होत आहेत. अशांती निर्माण होते. षडयंत्र रचले जातात. जे काही माझे आहे, ते माझ्याकडे रहावे. जे इतरांचे आहे, ते त्याचे आहे. त्याने आपल्याकडच्या गोष्टींनी आपले जीवन कंठावे. ही राजसिक प्रवृत्ती झाली. साधारणपणे असा विचार सामान्य दुनियेत केला जातो. मात्र जे काही माझे आहे, तितकेच ते सर्वांचे आहे. माझे जे काही आहे, ते या संपूर्ण प्राणीमात्रांचे आहे. ही सात्विक प्रवृत्ती झाली. याच सात्विक प्रवृत्तीवर भारताने नेहमीच आपल्या मानवी मूल्यांना आकार दिला आहे. समाजाचे मापदंड अशाच सात्विक प्रवृत्तीवर बनविण्यात आले आहेत. आपल्याकडे कुटुंबातल्या लहान मुलांना सर्वात आधी असेच शिकवले जाते. जे काही मिळाले आहे, ते आधी सर्वांना वाटावे आणि मग आपण स्वतःला घ्यावे. मी आणि माझे असे कधी बोलू नये, आपण सर्वांनी मिळून, वाटून घ्यायचे आहे, ही शिकवण आपण मुलांना देतो. याच संस्कारांमुळे भारताने कधीही आपला ठेवा, आपले ज्ञान, आपल्याकडे लावलेल्या शोधांना केवळ आर्थिक आधारावर पाहिले नाही. आमचे गणिताचे ज्ञान असो, वस्त्रोद्योग असो, धातूविज्ञान असो, अनेक प्रकारचे व्यापारी अनुभव असो, अथवा आयुर्वेदाचे विज्ञान असो, आम्ही या गोष्टी मानवतेचा ठेवा आहेत असे मानले आहे. आयुर्वेदातल्या विज्ञानाच्या मदतीने तर अनेक युगांपासून मानवतेची सेवा केली जात आहे. ज्या काळामध्ये आधुनिक वैद्यकीय शास्त्र या रूपामध्ये नव्हते, त्यावेळी आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार केले जात होते. आजही ज्यावेळी जगामध्ये पुन्हा एकदा वनौषधी, निसर्गोपचार यांच्याविषयी चर्चा केली जाते आणि उपचाराच्याहीआधी बरे होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात, आज ज्यावेळी आयुर्वेदावर वेगवेगळ्या देशांमध्ये शोधकार्य सुरू आहे, त्यांना भारताकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. आपल्याकडून आवश्यक असलेली मदतही केली जात आहे. भूतकाळामध्ये, आपल्या प्राचीन विद्यापीठांमध्ये परदेशातून विद्यार्थी येत  होते. परदेशी पाहुणे येत होते, त्या सर्वांना आम्ही आपल्या ज्ञान-विज्ञानाचे भंडार मोठ्या  उदारतेने दिले आहे. आम्ही जितकी जास्त प्रगती केली, त्यापेक्षाही जास्त अखिल मानवाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करीत आहोत.

मित्रांनो,

आमचे हेच संस्कार, आमचा हाच इतिहास आज ‘आत्मनिर्भर भारता’च्या संकल्पाच्या रूपाने पुन्हा एकदा जागृत होत आहे. आज पुन्हा एकदा भारत आपले सामर्थ्‍य सिद्ध करीत आहे. त्यामुळे संपूर्ण विश्वाच्या प्रगतीला वेग येऊ शकणार आहे. मानवतेची आणखी जास्त सेवा करता येणार आहे. अलिकडच्या काही महिन्यांमध्ये दुनियेला भारताने दिलेले योगदान दिसून आले आहे. आत्मनिर्भर भारताचे हेच योगदान आणखी जास्त व्यापक रुपामध्ये जगाला उपयोगी ठरणार आहे. या लक्ष्यपूर्तीसाठी आज देशाला गीतेतल्या कर्मयोगाची आवश्यकता आहे. अनेक युगांच्या अंधःकारातून बाहेर काढून एका नवीन भारताच्या सूर्योदयासाठी, आत्मनिर्भर भारताच्या निर्माणासाठी, आपल्याला आपले नेमके कर्तव्य काय आहे, हे ओळखता आले पाहिजे, त्याच्यासाठी कृतसंकल्प केला पाहिजे. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते- ‘क्षुद्रम् हृदय दौर्बल्यम् त्यक्तवा उत्तिष्ठ परंतप’’ ! याचा अर्थ असा आहे की, संकुचित विचार , संकुचित मन, आंतरिक दुर्बलता यांचा त्याग करून आता उभे रहावे. भगवान कृष्णाने हा उपदेश देताना गीतेमध्ये अर्जुनाला ‘भारत’ असे संबोधले आहे. आज गीतेचे हे संबोधन आपल्या ‘भारतवर्षा’साठी आहे. 130 कोटी  भारतवासियांसाठी आहे. आज या आवाहनाविषयीही नवीन जागृती निर्माण होत आहे. आज दुनिया भारताकडे एका नवीन दृष्टीने, वेगळ्या अपेक्षेने, एका नवीन सन्मानाने पहात आहे. आपण या परिवर्तनाला भारताच्या आधुनिक ओळखीला, आधुनिक विज्ञानाच्या शिखरापर्यंत घेऊन जायचे आहे. आपण सर्वजण मिळून हे लक्ष्य गाठणार आहोत, असा मला विश्वास आहे. स्वातंत्र्याची 75  वर्षे म्हणजे देशाच्या नवीन भविष्याच्या प्रारंभाचा आधार बनतील. पुन्हा एकदा मी डॉक्टर साहेबांना, या न्यासाचे संचलन करणा-या महनीय व्यक्तींना आणि हे काम करण्यासाठी आपण जे परिश्रम घेतले आहेत, त्यासाठी सर्वांना मी अगदी हृदयापासून खूप-खूप शुभेच्छा देतो. आणि मला विश्वास आहे की, या ग्रंथाचा जे लोक संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोग करतील, त्यांना या ग्रंथाचा वापर करण्याची एक सवयच लागेल. त्यांच्यासाठी हा ग्रंथ खूपच जास्त उपयोगी ठरणार आहे. कारण  आमच्यासारख्या लोकांना जरा जास्तच अशा ग्रंथाची आवश्यकता पडते. असे ग्रंथ संदर्भासाठी खूप उपयोगी ठरतात आणि म्हणूनच मला असे वाटते की, हा एक अमूल्य खजिना तुम्ही दिला आहे. हा ग्रंथ म्हणजे विश्वाच्या पहिल्या चिंतन धारेसारखा आहे. युद्धभूमीवर रचला गेलेला, शंखनादांच्या घोषामध्ये रचना केला गेलेला, विश्वामध्ये संवाद माध्यम म्हणून रचला गेलेला, अशा अनेक वैशिष्ट्यांनी युक्त असा विश्वातला हा पहिला ग्रंथ आहे, या गोष्टीशी मी अगदी सहमत आहे. ज्या स्थानी जय-पराजयाची थाप व्दारावर पडत होती, अशा समयी या ग्रंथाची रचना झाली आहे. अशा प्रतिकूल वातावरणामध्ये, अशांत वातावरणामध्ये, इतक्या शांतचित्तातून विचारधारा प्रवाहीत होणे, म्हणजे अमृत प्रसाराशिवाय आणखी  दुसरे काही असूच शकत नाही. अशा महान गीतेचे ज्ञान आगामी पिढीला, त्यांना जी भाषा समजते, त्या भाषेतून, ज्या रूपातून त्यांना तो ग्रंथ समजेल, त्या रूपातून देत राहिले पाहिजे,  हे प्रत्येक पिढीचे काम आहे. डॉक्टर कर्णसिंह जी यांनी, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने, त्यांच्या महान परंपरेने या कामाला सदोदित जीवंत ठेवले आहे. येणा-या पिढ्याही ही परंपरा जीवंत ठेवतील, याचा मला पूर्ण विश्वास आहे. आणि डॉक्टर कर्णसिंह जी यांनी केलेली सेवा सदोदित स्मरणात ठेवतील. या महान कार्यासाठी त्यांना मी आदरपूर्वक वंदन करतो आणि वयाने ते ज्येष्ठ आहेत. सार्वजनिक जीवनातही ते इतके ज्येष्ठ आहेत की, त्यांचा आशीर्वाद आपल्यावर सदैव रहावा, अशी इच्छा आहे. कारण त्यांच्या आशीर्वादाने आपणही हे आदर्श पुढे नेऊन काही ना काही देशासाठी करीत राहू.

खूप-खूप धन्यवाद!!

 

****

MC/SM/SB/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1703704) Visitor Counter : 338