रसायन आणि खते मंत्रालय

जनऔषधी दिवसानिमित्त साप्ताहिक कार्यक्रमांच्या मालिकेत सहाव्या दिवसाचे कार्यक्रम

Posted On: 06 MAR 2021 8:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 मार्च 2021

 

जनऔषधी दिवस दरवर्षी सात मार्च रोजी साजरा केला जातो. यंदा यानिमित्त एक ते सात मार्च असे साप्ताहिक कार्यक्रम साजरे केले जात आहेत. आज सहाव्या दिवशी,माफक दरात उपलब्ध असलेल्या जेनेरिक औषधींविषयी जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम साजरे करण्यात आले. यात बाईक रैली, पदयात्रा आणि मानवी साखळी आयोजित करण्यात आली होती. बीपीपीआय, जनऔषधी मित्र आणि जनऔषधी केंद्रांच्या मालकांनी देशभर हे कार्यक्रम आयोजित केले होते. या उपक्रमांच्या माध्यमातून, लोकांना जेनेरिक औषधांची कार्यक्षमता आणि उपयुक्तता समजावून सांगण्यात आली. जन औषधी केंद्रांमध्ये माफक दरात मिळणाऱ्या या औषधांविषयी लोकांच्या मनात असलेल्या शंका-कुशंका दूर करण्याच्या दृष्टीने ही जनजागृती करण्यात आली.

पीएमबीजेपी (प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना) अंतर्गत विकल्या जाणाऱ्या औषधांच्या किमती या पहिल्या तीन ब्रांडेड औषधांच्या सरासरी किमतींच्या 50% एवढे असाव्यात या तत्वावर ठरवल्या जातात. त्यामुळेच, जन औषधींच्या किमती, ब्रांडेड औषधांच्या एमआरपीपेक्षा किमान 50 टक्क्यांनी तर कधी 90% कमी असतात.

चालू वित्तीय वर्ष 2020-21 पीएमबीजेपी अंतर्गत, पाच मार्चपर्यंत 593.84 कोटी रुपयांच्या (एम आरपी नुसार) औषधांची विक्री करण्यात आली. यामुळे देशातील नागरिकांच्या सुमारे 3600 कोटी रुपयांची बचत झाली आहे.

देशभरातील  7400 पेक्षा जास्त प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रांमध्ये जन औषधी दिवस 2021 चा सप्ताह साजरा केला जात आहे. यानिमित्त विविध उपक्रम आयोजित करत आरोग्य आणि स्वच्छतेविषयी देखील जनजागृती केली जात आहे. एक मार्च रोजी आरोग्य तपासणी शिबिरांच्या आयोजनातून या सप्ताहाची सुरुवात करण्यात आली होती.

उद्या या सप्ताहाचा समारोप होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यानिमित्त उद्या सकाळी 10 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे आपले विचार मांडतील.

 

 

Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1702932) Visitor Counter : 124