सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

सौर उर्जेचा वापर व्यवसाय किफायतशीर बनवेल-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची एमएसएमईंना सूचना


बिगरमानांकित एमएसएमईंना अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी एमएसएमई मंत्रालय जागतिक बँकेसोबत कार्यरत

Posted On: 02 MAR 2021 10:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मार्च 2021

आपले व्यवसाय अधिक कार्यक्षम करण्यासाठी छतावरील सौरउर्जा प्रणालीचा वापर करण्याचे आणि त्यासाठी सवलतीच्या दरात उपलब्ध होणाऱ्या कर्जाचा लाभ घेण्याचे आवाहन केंद्रीय एमएसएमई आणि रस्तेवाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांनी केले आहे. एमएसएमई उद्योगांसाठी वीजवापरावरील खर्च कमी करण्यासाठी छतावरील सौरउर्जा हा अतिशय उत्तम पर्याय आहे आणि त्यामुळे त्यांच्या परिचालन खर्चात एक पंचमांशपर्यंत कपात होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. एमएसएमईंमध्ये छतावरील सौर प्रणालीच्या वापराबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे त्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केले. एमएसएमईंना आपल्या व्यवसायात वाढ करण्यासाठी छतावरील सौर प्रणालीचा विचार करणे अतिशय गरजेचे आहे. या प्रणालीचा वापर करून एमएसएमई एकत्रितपणे मोठ्या प्रमाणावर उर्जानिर्मिती करू शकतील आणि त्याचा स्वतःसाठी वापर करू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला एमएसएमई मंत्रालयाचे सचिव बी बी स्वेन, नवीन आणि नूतनक्षम मंत्रालयाचे सचिव इंदू शेखर, जागतिक बँकेचे भारतातील संचालक जुनैद अहमद, स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा उपस्थित होते.

उर्जेच्या वापरासाठी एमएसएमईंकडून खूप मोठ्या प्रमाणावर खर्च (सरासरी आठ रुपये प्रति युनिट) केला जात आहे, हा खर्च त्यांच्या एकूण उत्पादन खर्चाच्या एक पंचमांश आहे, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले. छतावरील सौरप्रणाली बसवण्यासाठी एमएसएमईंना मदत करण्याच्या उद्देशाने बिगर मानांकित एमएसएमईंना अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी एमएसएमई मंत्रालय जागतिक बँकेसोबत एका कर्ज हमी कार्यक्रमासंदर्भात काम करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. मोठ्या उर्जा प्रकल्पातील सौरउर्जेचे दर आता 1.99रु/ किलोवॉट अवर इतक्या विक्रमी पातळीवर खाली आले असल्याने एमएसएमईंना आपला उर्जा खर्च कमी करण्यासाठी या संधीचा लाभ घेतला पाहिजे, असे ते म्हणाले. छतावरील सौरप्रणाली उद्योगात इतर कोणत्याही अपारंपरिक उर्जा उद्योगापेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळत असल्याने ती आर्थिक पुनरुज्जीवनामध्ये योगदान देणारी असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. जागतिक बँक-एसबीआय यांनी भारताला छतावरील सौरप्रणालीसाठी 625 दशलक्ष डॉलरचे पाठबळ दिले आहे. भारतातील जागतिक बँकेचे संचालक जुनैद अहमद यांनी या कार्यक्रमात या प्रणालीसाठी जागतिक बँकेच्या सहभागाची माहिती दिली. एमएसएमईंना या उर्जाप्रणालीसाठी मदत करण्याकरता जागतिक बँक वचनबद्ध आहे आणि या उद्योगात केलेली गुंतवणूक भारताचे आत्मनिर्भर किंवा स्वयंपूर्ण बनण्याचे उद्दिष्ट साकार करण्यासाठी पूरक ठरेल, असे ते म्हणाले.

 

 

 

S.Tupe/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1702071) Visitor Counter : 248


Read this release in: English , Urdu , Hindi