ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी बीआयएसला (भारतीय मानक ब्युरो) व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन देण्यासाठी  "एमएसएमई, स्टार्ट अप्स आणि महिला उद्योजक" यांच्यासाठी चाचणी शुल्क कमी करण्याचे निर्देश दिले

Posted On: 01 MAR 2021 4:29PM by PIB Mumbai

 

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण, रेल्वे आणि वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली आज भारतीय मानक ब्युरोच्या तिसर्‍या प्रशासकीय परिषदेची व्हर्चुअल बैठक झाली. या वेळी ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे उपस्थित होते.

गोयल यांनी बीआयएस अधिकारी, विविध मंत्रालये/नियामक यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर भारतीय मानक निर्मिती आणि अंमलबजावणी प्रक्रियेचा आढावा घेतला. मानक कसे ठरवले जातात आणि त्यांची अंमलबजावणी अधिक चांगली करण्यासाठी काय करता येईल यावर विस्तृत चर्चा झाली.  एक राष्ट्र एक मानकअसायला हवे आणि जागतिक मानकांनुसार भारतीय मानक निश्चित केले जावे यावर यावेळी भर  देण्यात आला.

ते म्हणाले की एमएसएमई, स्टार्ट-अप्स आणि महिला उद्योजकांसाठी सुरुवातीच्या काही वर्षांत मानक चाचणी शुल्क देखील कमी केले जावे. यामुळे त्यांना त्यांची उत्पादने प्रमाणित करण्यास आणि व्यवसाय सुलभतेसाठी प्रोत्साहन मिळेल .

चाचणी प्रयोगशाळेच्या व्यापक विस्ताराचे आणि आधुनिकीकरणाचे निर्देश गोयल यांनी बीआयएसला दिले जेणेकरुन उद्योजकांना  चाचणी व मानक प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दूरचा  प्रवास करावा लागणार नाही. ते म्हणाले की, आपण हे सुनिश्चित करायला हवे  की चाचणी प्रयोगशाळेत दर्जा  तपासणीसाठी कुणालाही दूर प्रवास करावा लागणार नाही.

गोयल यांनी बीआयएसला त्याच्या प्रमाणीकरण प्रक्रिया व तपासणीत सर्वाधिक पारदर्शकता येण्यासाठी ग्राहक सनद तयार करण्याच्या सूचना दिल्या.

ते म्हणाले की बीआयएससाठी विशेषत: राष्ट्रीय प्राधान्यक्रमाच्या या कार्यक्रमांसाठी मानक निश्चिती  प्रक्रियेला गती देण्याचे मोठे आव्हान आहे. बीआयएसने हे सुनिश्चित केले पाहिजे की जिथे मानक अस्तित्वात नाहीत तिथे  तांत्रिक समित्यांनी लवकरात लवकर आवश्यक नवीन मानक विकसित केले पाहिजेत किंवा जेव्हा आवश्यकता  असेल तेव्हा विद्यमान मानकांचा आढावा आणि त्यात सुधारणा  करणे आवश्यक आहे.

बीआयएस देशभरात 37,000 हून अधिक उत्पादन प्रमाणपत्र परवाने चालवत आहे.

अनिवार्य नोंदणी योजनेत (सीआरएस) आयएसआय मार्क, नोंदणीकृत ज्वेलर्स आणि चिन्हांकित इलेक्ट्रॉनिक वस्तूंची सत्यता पडताळणी करण्यासाठी हितधारकांना सुविधा देण्यासाठी एंड्रॉइड मोबाइल ऍपची सुधारित आवृत्ती - बीआयएस केअर लागू केली आहे. हे  अ‍ॅप वापरकर्त्यांना तक्रारी दाखल करण्यात मदत करते.

***

M.Chopade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1701701) Visitor Counter : 271