वस्त्रोद्योग मंत्रालय
पंतप्रधानांच्या हस्ते 27 फेब्रुवारीला होणार 'इंडिया टॉय फेअर 2021' चे उद्घाटन
Posted On:
25 FEB 2021 6:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 27 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'इंडिया टॉय फेअर 2021 ' चे अर्थात भारतीय खेळणी मेळ्याचे उदघाटन होणार आहे.
मुलांच्या मानसिक विकासात खेळणी महत्त्वाची भूमिका बजावतात आणि मुलांमध्ये मनोवैज्ञानिक आणि संज्ञानात्मक कौशल्ये सुधारण्यात देखील मदत करतात. क्रियाशीलता वाढवण्यासोबतच खेळणी आकांक्षांनाही नवे पंख देतात, असे पंतप्रधानांनी ऑगस्ट 2020 मध्ये मन की बात या कार्यक्रमात सांगितले होते. मुलाच्या सर्वांगीण विकासात खेळण्यांचे महत्त्व लक्षात घेऊन पंतप्रधानांनी यापूर्वीही देशात खेळण्यांचे उत्पादन वाढविण्यावर जोर दिला आहे. यासंदर्भातील पंतप्रधानांच्या विचारांवर आधारित इंडिया टॉय फेअर 2021 चे आयोजन केले जात आहे.
मेळ्याविषयी
27 फेब्रुवारी ते 2 मार्च 2021 या काळात हा मेळा आयोजित करण्यात आला आहे. उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी शाश्वत दुवे तयार व्हावेत आणि संवादाला चालना मिळावी यासाठी खरेदीदार, विक्रेते, विद्यार्थी, शिक्षक, डिझाइनर आदींसह सर्व संबंधितांना एकत्रित आणण्याचे उद्दिष्ट या आयोजनामागे आहे. या क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षित करणे आणि निर्यातीला चालना याद्वारे, आगामी काळात खेळण्यांचे उत्पादन व सोर्सिंग याचे जागतिक केंद्र म्हणून भारताला कसे पुढे आणता येईल, याबाबत चर्चा करण्यासाठी या व्यासपीठाच्या माध्यमातून सरकार आणि उद्योग एकत्रित येऊ शकतील.
ई-कॉमर्स सक्षम व्हर्च्युअल प्रदर्शनात 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 1000 हून अधिक प्रदर्शक त्यांची उत्पादने प्रदर्शित करतील. यात पारंपरिक भारतीय खेळणी तसेच इलेक्ट्रॉनिक खेळणी, आलिशान खेळणी, कोडी आणि खेळ यासह आधुनिक खेळण्यांचे दर्शन घडेल. खेळण्यांचे आरेखन व उत्पादनात क्षमता सिद्ध केलेल्या प्रख्यात भारतीय व आंतरराष्ट्रीय व्यक्तींचे असंख्य वेबिनार आणि पॅनेल चर्चादेखील आयोजित करण्यात येणार आहेत. या मेळाव्यात पारंपरिक खेळणी तयार करण्याच्या शिल्प प्रात्यक्षिकासह अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मुलांना मिळणार आहे. तसेच खेळण्यांची संग्रहालये आणि कारखान्यांना व्हर्च्युअल माध्यमातून भेट देता येणार आहे.
* * *
S.Thakur/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1700853)
Visitor Counter : 217