इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
अमेझॉन इंडिया भारतात इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मितीला करणार आरंभ
केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी अमेझॉनचे भारतातील प्रमुख अमित अगरवाल यांच्याशी दूरदृश्य पद्धतीने केलेल्या चर्चेनंतर घोषणा
भारतीय कारागिरांनी बनवलेली तसेच भारतातील आयुर्वेदिक उत्पादने ई-कॉमर्स मंचावरून जागतिक बाजारपेठेत नेण्याची अमेझॉन इंडियाला मंत्र्यांची सूचना
Posted On:
16 FEB 2021 7:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2021
इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे तसेच न्याय व कायदा मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी आज अमेझॉनचे भारतातील प्रमुख, अमित अगरवाल यांच्याशी दूरदृश्य पद्धतीने बैठक घेतली. या बैठकीत डिजिटल क्षेत्राशी संबधित अनेक बाबींवर चर्चा झाली. या बैठकीनंतर अमेझॉन इंडियाने भारतात अमेझॉन फायर स्टिक टिव्ही उत्पादन सुरू करणार असल्याची घोषणा केली.
“भारत हा गुंतवणूकीच्या दृष्टीने आकर्षक आहेच पण इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक पुरवठा साखळीत मुख्य भूमिका बजावण्यासाठीही आता सज्ज आहे”, असे यावेळी दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान तसेच कायदा व न्यायमंत्री रवीशंकर प्रसाद म्हणाले. आपल्या सरकारच्या प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव (PLI) योजनेच्या निर्णयाला जागतिक पातळीवरही भरपूर प्रतिसाद मिळाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. चेन्नईत उत्पादन युनिट सुरू करण्याच्या अमेझॉनच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, यामुळे, स्वदेशी उत्पादनाच्या क्षमता वाढतील व रोजगार निर्माण होतील, असे ते म्हणाले. डिजीटली सामर्थ्यवान आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या उद्दिष्टाचा हा पुढील भाग असेल, असेही त्यांनी सांगितले. भारतात भारतासाठी इलेक्ट्रॉनिक उत्पादने उत्पादित करणे व ती भारताबाहेरही निर्यात करणे या अमेझॉनच्या प्रयत्नांचा हा आरंभ असेल असेही मंत्रीमहोदयांनी नमूद केले.
चेन्नईच्या फॉक्सकॉनची उपकंपनी असलेली क्लाउड नेटवर्क टेक्नॉलॉजी ही या उत्पादनासाठी अमेझॉनची कंत्राटदार उत्पादन कंपनी असेल आणि या वर्षाअखेरपर्यंत उत्पादनाला सुरूवात होईल.
भारतीय कारागिरांनी तयार केलेल्या वस्तू त्याचप्रमाणे आयुर्वेदिक उत्पादने ई-कॉमर्सच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठेत नेण्यास अमेझॉन इंडियाने सहाय्य करावे असे रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले. अमेझॉन जागतिक कंपनी असली तरी अमेझॉन इंडियाने भारतीय व्यवसाय क्षेत्राशी व संस्कृतीशी नाते जोडणारी भारतीय कंपनी म्हणून भरारी घ्यावी अशी अपेक्षा रविशंकर प्रसाद यांनी यावेळी व्यक्त केली
S.Tupe/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1698519)
Visitor Counter : 259