गृह मंत्रालय

उत्तराखंडमधील जोशीमठ येथे आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात नरेंद्र मोदी सरकार राज्यातील लोकांच्या खांद्याला खांदा लावून उभे - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह


केंद्र आणि राज्य सरकारकडून बचाव आणि मदतकार्य सुरू आहे आणि एनडीआरएफच्या तीन तुकड्या घटनास्थळी दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून एनडीआरएफच्या तुकडीला मार्गदर्शन केले

या आपत्तीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्राथमिक तत्त्वावर आवश्यक ती मदत केली जाईल

Posted On: 07 FEB 2021 7:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी 2021


उत्तराखंड येथील जोशीमठ येथे आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या या काळात राज्याबरोबर नरेंद्र मोदी सरकार खांद्याला खांदा लावून उभे आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात पत्रकारांशी बोलताना अमित शाह म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारकडून बचाव आणि मदतकार्य सुरू आहे आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या (एनडीआरएफ) तीन तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ते म्हणाले की, अन्य तुकड्या देखील उत्तराखंडमध्ये जाण्यासाठी तयार आहेत. लवकरच बाकीच्या तुकड्या देखील तेथे दाखल होतील. आयटीबीपीचे जवान देखील घटनास्थळी पोहोचले आहेत, बरोबरच राज्यातील यंत्रणा देखील कार्यान्वित झाल्या आहेत, असे अमित शाह म्हणाले.

अमित शाह म्हणाले की, जोशीमठाच्या जवळ हिमकडा आणि डोंगरकडा नदीमध्ये कोसळल्यामुळे पाण्याचा प्रवाह खूप वाढला आहे तसेच प्रथम ऋषी गंगा आणि त्यानंतर अलकनंदामध्ये पाण्याची पातळी वाढण्यास सुरूवात झाली आहे. शाह पुढे म्हणाले की, काही लोक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती देखील हाती आली आहे. संकटाच्या या काळात सरकार उत्तराखंडच्या पाठिशी आहे आणि शक्य ती सर्व प्रकारची मदत तातडीने उपलब्ध करून लवकरात लवकर या संकटावर मात करून जनजीवन पूर्वीसारखे सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.

अमित शाह म्हणाले की, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे आणि हवाई दलालाही देखील सज्जतेची सूचना करण्यात आली आहे. अमित शाह म्हणाले की, पंतप्रधानांनी देखील दूरध्वनीवर एनडीआरएफच्या तुकडीला मार्गदर्शन केले आहे. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय हे गृह मंत्रालयाच्या एनडीआरएफच्या नियंत्रण कक्षात स्वतः उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अमित शाह असेही म्हणाले की, ते उत्तराखंडच्या सर्व नागरिकांना हे आश्वास्त करु इच्छितात की, सर्व परिस्थिती लक्षात घेता, लवकरात लवकर दुर्घटनेची स्थिती नियंत्रणात आणली जाईल आणि या आपत्तीपासून बचावासाठी केंद्र सरकारच्या वतीने प्राथमिक स्वरूपावर आवश्यक असलेली सर्व मदत केली जाईल.

* * *

S.Thakur/S.Shaikh/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1695993) Visitor Counter : 109