आदिवासी विकास मंत्रालय
दिल्ली हाट येथे 1 फेब्रुवारी 2021 रोजी उपराष्ट्रपती राष्ट्रीय ‘‘आदि महोत्सवा’चे उद्घाटन करणार
Posted On:
30 JAN 2021 6:52PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते नवी दिल्लीतल्या दिल्ली हाट येथे ‘आदि महोत्सव’ या राष्ट्रीय आदिवासी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ट्रायफेडच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन 1 फेब्रुवारी रोजी (सोमवारी) सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा असणार आहेत. तसेच आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंग, ट्रायफेडचे अध्यक्ष रमेश चंद मीना, आदिवासी व्यवहार मंत्रालयाचे सचिव आर सुब्रमण्यम यावेळी अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत. दि. 1 ते 15 फेब्रुवारी, 2021 या कालावधीत आदि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
आदिवासी संस्कृती, हस्तकला आणि पाककृती आणि त्यांचे वाणिज्य व्यवहार या दृष्टीने आदि महोत्सव महत्वपूर्ण ठरत असून 2017 पासून दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या या महोत्सवाला दिवसेंदिवस अधिक लोकप्रियता आणि यश मिळत आहे. संपूर्ण देशभरातल्या आदिवासी समाजाच्या समृद्ध आणि वैविधतापूर्ण कला, संस्कृतीचा परिचय या महोत्सवामुळे एकाच स्थानावरून मिळू शकतो.
गेल्यावर्षी संपूर्ण देशभर कोविड साथीचा उद्रेक झाल्यामुळे ट्रायफेडच्यावतीने आदि महोत्सवाचे आयोजन केले नव्हते. परंतु यंदा ही परंपरा आता पुन्हा सुरू केली आहे. दिल्ली हाटमध्ये राष्ट्रीय आदिवासी महोत्सवामध्ये आदिवासी कला आणि हस्तकलेच्या वस्तू, औषधे, खाद्यपदार्थ, यांच्याबरोबरच लोककला सादर करण्यात येणार आहे. या महोत्सवामध्ये देशातल्या 20 राज्यांमधले जवळपास 1000 आदिवासी कलाकार, कारागिर आणि पाकतज्ज्ञ सहभागी होवून आणि आपल्या समृद्ध परंपरेची, संस्कृतीची झलक सादर करणार आहेत.
देशामध्ये एकूण लोकसंख्येपैकी 8 टक्क्यांपेक्षाही जास्त लोक आदिवासी आहेत. समाजातला वंचित घटक यामध्ये जास्त आहे. त्यांच्यामध्ये नैसर्गिक साधेपणा आहे, त्यामुळे त्यांच्या निर्मितीमध्ये शाश्वतता आहे. हातमगाचे कापड, रेशमी वस्त्रे, लोकरीची वस्त्रे, धातुकला, टेराकोटा, मण्यांचे काम, अशा अनेक आदिवासी कला संरक्षित करणे आवश्यक आहे. ट्रायफेड ही आदिवासी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत नोडल संस्था म्हणून आदिवासींसाठी कार्य करीत आहे. त्यांचे जीवन आणि परंपरा यांचे जतन करून त्यांना उत्पन्न मिळावे तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ट्रायफेड कार्यरत आहे.
S.Kane/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1693655)
Visitor Counter : 251