पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
जागतिक पर्यावरण संरक्षणासाठी भारत-फ्रेंच भागीदारी उर्वरित जगासाठी एक उदाहरण घालून देईल : प्रकाश जावडेकर
Posted On:
28 JAN 2021 7:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जानेवारी 2021
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री, प्रकाश जावडेकर आणि फ्रान्सच्या पर्यावरण बदल मंत्री बार्बरा पॉम्पिली यांनी आज नवी दिल्लीत भारत-फ्रेंच पर्यावरण वर्षाचा शुभारंभ केला. शाश्वत विकासासाठी भारत-फ्रेंच सहकार्य बळकट करणे, जागतिक पर्यावरण संरक्षणासाठी केलेल्या उपायांची परिणामकारकता वाढवणे आणि त्यांना अधिक बळ देणे हा यामागचा मूळ उद्देश आहे.
बार्बरा पॉम्पीली यांच्या पहिल्याच भारत दौर्यावर त्यांचे स्वागत करताना प्रकाश जावडेकर यांनी हवामान बदलाच्या दिशेने काम करण्यामध्ये भारत-फ्रान्स आघाडीचे महत्व अधोरेखित केले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे आम्ही दोन मुख्य आधारस्तंभ आहोत. हे क्रांतिकारक पाऊल यशस्वी प्रयोगात रूपांतरित झाले आहे. जागतिक पर्यावरण संरक्षणासाठी ही भागीदारी उर्वरित जगासाठी टिकाऊ विकासाच्या दिशेने अधिक प्रभावीपणे आणि कार्यक्षमतेने कार्य करण्यासाठी एक उदाहरण घालून देईल.
“हवामान बदलासंबंधी कृतीच्या दिशेने भारताने महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे आणि उत्सर्जनाची तीव्रता 26 टक्क्याने कमी करण्याची कामगिरी आधीच साध्य केली आहे. 2020 पर्यंत भारतात नवीकरणीय क्षमता 90 गिगावॅट इतकी आहे ज्यामध्ये 36 गिगावॅट सौर ऊर्जा आणि 38 गीगावॅट पवन ऊर्जेचा समावेश आहे. “,अशी माहिती जावडेकर यांनी दिली
ते पुढे म्हणाले की, भारत शाश्वत विकासामध्ये भारत -फ्रेंच सहकार्य बळकट करण्यासाठी, जागतिक पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने केलेल्या उपायांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि त्यांना अधिक बळ देण्यास उत्सुक आहे.
पर्यावरण संरक्षण, हवामान बदल, जैवविविधता संवर्धन, शाश्वत शहरी विकास आणि नवीकरणीय उर्जेचा विकास या पाच मुद्यांवर या वर्षी भर दिला जाईल.
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1693011)
Visitor Counter : 306