माहिती आणि प्रसारण मंत्रालय

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच प्रसार भारती यांची भारत पर्व 2021 साठी जय्यत तयारी

Posted On: 25 JAN 2021 8:34PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 25 जानेवारी 2021

प्रजासत्ताक दिनाच्या महोत्सवासोबतच दर वर्षी भारत पर्व या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हा कार्यक्रम, देशभक्तीचा उत्साह वाढविण्यासाठी आणि आपल्या देशाच्या समृध्द आणि विभिन्न सांस्कृतिक विविधतेचे प्रदर्शन घडविण्यासाठी आयोजित केला जातो. यावर्षी,कोविड महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत 26 ते 31 जानेवारी 2021 या कालावधीत आभासी पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या आभासी मंचावर होणाऱ्या कार्यक्रमात राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि विविध मंत्रालयांसाठी संकल्पनांचा समावेश होणार आहे. भारत पर्वाची एकंदर संकल्पना आत्मनिर्भर भारत आणि एक भारत श्रेष्ठ भारत यांच्यावर आधारित असेल.

राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक विविधता यांचा प्रसार करण्यात राष्ट्रीय प्रसारण संस्था – प्रसार भारतीची महत्त्वाची भूमिका आहे. प्रसार भारतीने देखील भारत पर्व कार्यक्रमाच्या आभासी मंचावर एक स्टॉल उभारला असून त्याच्या माध्यमातून त्यांच्या कार्यक्रमांचे प्रमुख क्षण प्रदर्शित करून एक भारत श्रेष्ठ भारत अभियाना च्या प्रोत्साहनासाठी प्रसारभारती करीत असलेल्या प्रयत्नांचे प्रदर्शन केले जाईल. आभासी स्टॉलची रचना खालीलप्रमाणे असेल.

प्रकाशन विभाग देखील या पहिल्या आभासी भारत पर्व 2021 मध्ये ‘विरासत शब्दों की, भाव भारतीयता का’ या ही संकल्पना घेऊन सहभागी होत आहे. भारताची विविधता आणि उर्जा साजरी करत केंद्र सरकारचा प्रकाशन विभाग कला आणि संस्कृती, इतिहास आणि वारसा,आधुनिक भारताचे निर्माते यांच्याविषयीच्या पुस्तकांचे तसेच एक भारत, श्रेष्ठ भारत मालिकेतील पुस्तकांचे मोठे प्रदर्शन मांडणार आहे.

गांधीवादी विचारांवरील पुस्तकांचा मोठा प्रकाशक असलेला प्रकाशन विभाग देखील महात्मा गांधींच्या निवडक पुस्तकांचे प्रदर्शन करणार आहे. या मंचाला भेट देणारे नागरिक, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती तसेच पंतप्रधानांच्या भाषणांची पुस्तके पाहू शकतील. याखेरीज तिथे, लहान मुलांचे साहित्य, राष्ट्रीय स्वातंत्र्य लढा, राष्ट्रपती भवन मालिका अशी विविध विषयांवरील पुस्तके पाहता येतील.

या पुस्तकांखेरीज प्रकाशन विभाग त्यांची योजना, कुरुक्षेत्र,आजकल आणि बाल भारती ही चार मासिके आणि साप्ताहिक रोजगार वार्ता देखील प्रदर्शित करणार आहे. प्रकाशन विभागाची ही पुस्तके विकासविषयक मुद्यांवरील चर्चेसाठी मंच उपलब्ध करून देतात आणि सामान्य नागरिक तसेच इतर सहभाग धारकांना भारत सरकारच्या महत्त्वाच्या उपक्रमांविषयी राष्ट्रीय दृष्टीकोन समजावून देतात.

ब्युरो ऑफ आउटरिच कम्युनिकेशन ही संस्था महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त भरवलेल्या प्रदर्शनातील महत्त्वाचा भाग भारत पर्व च्या या सत्रात उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये ‘स्वच्छ भारत, सशक्त भारत, बापू के सपनोंका भारत’ या संकल्पनेवर आधारित प्रदर्शनावर आधारित फोटो, ॲनिमेशन आणि प्रश्नमंजुषा यांचा समावेश असेल. भारताच्या नकाशाच्या आकारामध्ये ‘इंडिया ऑफ माय ड्रीम्स’ या संकल्पनेवर आधारित महात्मा गांधी यांच्यावरील व्हिडिओ आणि चलचित्र ॲनिमेशन तसेच ‘संकल्प से सिद्धी तक’या मोहिमेअंतर्गत भारत सरकारने संपादन केलेल्या उल्लेखनीय यशाचे वर्णन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्गार यांचादेखील या प्रदर्शनात समावेश असेल. प्रदर्शनाच्या उर्वरित भागात महात्मा गांधी यांच्या जीवनातील महत्त्वाचे टप्पे/प्रसंग दाखविणारे दुर्मिळ फुटेज, फोटो, तसेच 50 व्या इफ्फीमधील छोटे व्हिडीओ/ झलकी यांचे प्रदर्शन केलेले असेल.

भारत पर्व चे संकेतस्थळ : www.bharatparv2021.com

M.Chopade/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1692321) अभ्यागत कक्ष : 201