माहिती आणि प्रसारण मंत्रालय

वाईफ ऑफ ए स्पाय एका जोडप्याच्या दयनीय काळाचे चित्रण : दिग्दर्शक कियोशी कुरोसावा

Posted On: 24 JAN 2021 6:42PM by PIB Mumbai

 

पणजी, 24 जानेवारी 2021

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) 51 व्या आवृत्तीचा समारोप कियोशी कुरोसावा दिग्दर्शित जपानी चित्रपट वाईफ ऑफ ए स्पाय ने झाला. काही अप्रत्याशित परिस्थितीमुळे बेदखल झालेल्या एका पती पत्नीची कहाणी यामध्ये मांडण्यात आली आहे. भावनिक चढउतारांच्या कथेत, जिथे मत्सर भावनेतून एका पत्नीला ग्रासलेले असताना, जेव्हा तिला सत्याची बाजू कळते, तेव्हा तिच्या कुटुंबाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अकल्पित काहीतरी करते.

कुरोसावा, ज्यांनी इफ्फी 51 च्या समारोप समारंभात व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले, ते म्हणाले, ``इफ्फीच्या समारोपासाठी वाईफ ऑफ ए स्पाय या चित्रपटाची निवड होणे ही खूप अभिमानाची बाब आहे. मी साधारण सहा ते सात वर्षांपूर्वी गोव्यामध्ये आलो होतो. ती माझ्यासाठी अतिशय संस्मरणीय आठवण आहे. तिथे प्रत्येक गोष्ट अतिशय सुंदर आहे, समुद्र, शहर आणि येथील माणसे अतिशय प्रेमळ आहेत. प्रामुख्याने येथील जेवण अतिशय चविष्ट होते. मी अगदी स्वप्नवत दिवस येथे घालविले. मला खरेतर प्रत्यक्ष तेथे येऊनच आपल्या सर्वांची भेट घेण्याची इच्छा होती पण मला माहीत आहे, की सध्या ही गोष्ट अशक्य आहे. जपानमधून ऑनलाइन माध्यमातून तुमच्याशी संवाद साधणे ही एकच गोष्ट सध्या मी करू शकतो. पण सिनेमा सातासमुद्रापार पोहोचला आणि माझी खात्री आहे की मी या सिनेमाबाबत काही सांगण्यापेक्षा सिनेमाच तुम्हाला स्पष्टपणे सगळे सांगेल. माझा सिनेमा हा जपानमधील 1940 चा काळ आहे आणि तो एका जोडप्याच्या दयनीय काळाचे चित्रण आहे.`` अशा प्रकारे संवाद साधत असतानाच किरोसावा यांनी सर्वांना विनंती केली की शेवटपर्यंत सिनेमा पाहून त्याचा आनंद घ्यावा.

वाईफ ऑफ ए स्पाय हे एक ठराविक काळात घडलेले नाट्य आहे, ज्यामध्ये साताको, यू ओई या जपानी अभिनेत्याने भूमिका निभावली आहे आणि युसाकू फुकुहारा यांनी ईस्से ताकाहाशी ची भूमिकी वठविली आहे. दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीची रात्र, एक स्थानिक व्यापारी, युसाकू फुकूहारा, याला काही गोष्टी अस्थिर होण्याच्या दिशेने जात आहेत, याची जाणीव होते. तो पत्नी सतोको हिला सोडतो आणि मन्च्युरियाला जाण्यासाठी निघतो. तेथे, तो योगायोगाने एका क्रूर कृत्याचा साक्षीदार होतो आणि ते प्रकाशात आणण्यासाठी कंबर कसतो. तो प्रत्यक्ष कृती करण्याचे ठरवितो. दरम्यान, सतोको हिला तिचा बालपणीचा मित्र आणि सेनेतील पोलिस अधिकारी तैजी त्सुमोरी याची भेट होते. तो तिला सांगतो की तिच्या पतीने मन्च्युरिया येथून परत आणलेल्या स्त्रीचा मृत्यू झाला आहे. सतोको हिला मत्सर वाटू लागतो आणि त्यातून ती कोलमडते आणि युसाकूसह तिचा संघर्ष सुरू होतो. पण जेव्हा तिला युसाकूचा खरा हेतू कळतो, तेव्हा ती त्याच्या सुरक्षेसाठी आणि कुटुंबाच्या आनंदासाठी अकल्पित असे काही करते, हे सांगणारी ही कथा आहे.

हा 115 मिनिटांचा सिनेमा 77 व्या वेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मुख्य स्पर्धेमध्ये निवडला गेला होता. तिथे त्याला रजत सिंहाचे पारितोषिक मिळाले होते.

कियोशी कुरोसावा हे जपानी चित्रपट दिग्दर्शक, पटकथाकार, चित्रपट समीक्षक आणि टोकियो विद्यापीठात कलेचे प्राध्यापक आहेत. त्यांनी विविध शैलींमध्ये काम केले आहे. आणि जपानी भयपट शैलीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानासाठी ते सर्वोत्तम म्हणून ओळखले जातात.

.......

M.Chopade/S.Shaikh/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1691914) Visitor Counter : 214