माहिती आणि प्रसारण मंत्रालय

“अकासा-माय होम, शहरात राहण्याची जबरदस्ती केलेल्या एका कुटुंबाच्या प्रवासाचे चित्रण” : दिग्दर्शक राडू सिओर्निसियुक

 

नऊ मुले असलेले हे कुटुंब 20 वर्षांपासून निसर्गाच्या सानिध्यात वास्तव्य करत होते, ही जागा शहरापासून जवळ असली तरी बऱ्याच कालावधीपासून थोडी विस्मृतीत गेली होती. परंतु जेव्हा रोमानियन अधिकाऱ्यांनी त्या भागाला संरक्षित जागेचा दर्जा देण्यासाठी पावले उचलली तेव्हा नियतीने काहीतरी वेगळीच योजना आखली होती. माझा माहितीपट अकासा-माय होममध्ये या कुटुंबाच्या प्रवासाचे चित्रण केले आहे, ज्यांना त्यांच्या जंगलातील सुंदर कोशातून बाहेर काढल्यानंतर शहरात राहण्यासाठी बळजबरी करण्यात आली. एक पत्रकार म्हणून मी त्यांच्यावर केवळ एक बातमी तयार केली असती परंतु असे न करता आम्ही त्यांच्या चार वर्षांच्या नाट्यमय प्रवासाचा पाठपुरावा केला आणि हा माहितीपट तयार केला. , अकासा-माय होम या माहितीपटामागील निर्मितीची कथा सांगताना दिग्दर्शक राडू सिओर्निसियुक 51 व्या इफ्फी मध्ये बोलत होते. पणजी, गोवा येथे आयोजित 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज 21 जानेवारी 2021 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत राडू सिओर्निसियुक पत्रकारांशी संवाद साधत होते. फिनलँड, जर्मनी आणि रोमानिया येथे चित्रित झालेल्या या चित्रपटाला महोत्सवाच्या विशेष प्रदर्शन (स्पेशल स्क्रीनिंग) विभागात स्थान मिळाले आहे.

सिओर्निसियुक यांनी माहितीपट निर्मितीमागील घटनाक्रम सांगितला: रोमानियन सरकार, राजधानी बुखारेस्ट जवळील शहरात असलेल्या भागाला संरक्षित जागेचा दर्जा देणार होते. या हिरव्यागार जागेच्या मध्यभागी शास्त्रज्ञांना एक अद्भुत वातावरण असल्याचे आणि तेथे युरोपमधील काही दुर्मिळ पक्षी, प्राणी आणि वनस्पती आढळल्याने हे पाऊल उचलले.

या कुटुंबाची माहिती कशी मिळाली? राडू यांच्या म्हणण्यानुसार, एकदा त्यांनी आणि पटकथालेखक लीना व्दोवी यांनी सरकारच्या या निर्णयाबद्दल अहवाल तयार करण्याचा निर्णय घेतला, आणि प्रथमदर्शनी ही परिस्थिती समजून घेण्यासाठी त्या जागेला भेट दिली. तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. बाहेरच्या जगापासून दूर एक नऊ मुलांचे कटुंब गेली 20 वर्षे तेथे राहात होते. त्या मुलांच्या निसर्गाशी असलेल्या सुंदर नात्याने आम्हाला भुरळ घातली आणि आम्ही आमचा हा प्रकल्प एखाद्या वृत्तांत अहवालापर्यंत मर्यादित न ठेवता यावर अधिक संशोधन करण्याचे ठरवले.

त्यानंतरच्या भारावून टाकणाऱ्या प्रवासाचे वर्णन करताना राडू पुढे म्हणाले: या कुटुंबाचे जंगलात राहण्यापासून ते राजधानी सारख्या मोठ्या शहरातील राहणीमान स्विकारण्यापर्यंतचा त्यांचा हा संपूर्ण प्रवास आम्ही जवळून पहिला आहे.

या चित्रपटाचा आमच्या आयुष्यावर हा परिणाम झाला आहे की आम्ही देखील या चित्रपटाच्या निर्मिती नंतर शहराबाहेर वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला आहे, असे राडू म्हणाले.

पत्रकारिता आणि चित्रपटनिर्मिती दरम्यान संतुलन साधण्यासंबंधी विचारले असता राडू म्हणाले: हे दोन्ही व्यवसाय एकमेकाला खूप पूरक आहेत.

हा माहितीपट ज्यूरिख फिल्म फेस्टिव्हल, सनडन्स फिल्म फेस्टिव्हल आणि सिडनी फिल्म फेस्टिव्हल यासह जगातील काही नामांकित चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

दिग्दर्शक राडू सिओर्निसियुक यांनी 2012 मध्ये रोमानियातील पहिली स्वतंत्र मीडिया संस्था - कासा जर्नलिस्टुलुईची स्थापना केली आहे. सखोल, दीर्घकालीन आणि मल्टीमिडिया वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा हा समुदाय आहे.

 

S.Tupe/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1690970) Visitor Counter : 226