माहिती आणि प्रसारण मंत्रालय
मेघमल्लार ही पूर्व पाकिस्तान मधील प्रत्येक कुटुंबाची युद्ध-कथा आहे: दिग्दर्शक जाहिदूर रहीम अंजान
पणजी, 20 जानेवारी 2021
“बांगलादेशात आम्ही 1971 च्या स्वातंत्र्य युद्धाला लोकांचे युद्ध असे संबोधतो. माझा चित्रपट मेघमल्लार हा युद्धकाळातील एका छोट्या शहरातील कुटुंबाच्या संघर्षाची कथा आहे.” असे बांगलादेशी चित्रपट दिग्दर्शक जाहिदूर रहीम अंजान यांनी सांगितले.
“ही एका कुटुंबाची कथा नसून तत्कालीन पूर्व पाकिस्तानमधील प्रत्येक कुटूंबाची कथा आहे. या स्वातंत्र्य युद्धात प्रत्येक कुटुंबाने योगदान दिले आहे, आमच्या इतिहासातील महत्वपूर्ण घटना,” असल्याचे बांगलादेशचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता शाहिदुझमान सलीम यांनी सांगितले. गोवा येथे आयोजित 51 व्या इफ्फी सोहळ्यात आज (20 जानेवारी 2021) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते पत्रकारांशी संवाद साधत होते.
“प्रसिद्ध कादंबरीकार अख्तरुझमान इलियास यांच्या एका छोट्या कथेवर आधारित, मेघमल्लार हा चित्रपट एका सामान्य कुटुंबातील अवघ्या तीन दिवसांच्या कालावधीतील जीवन-परिवर्तनाचे अनुभव कथन करणारी शोककथा आहे. हा चित्रपट माझ्या देशाचे सौंदर्य देखील दर्शवितो, ” असे अंजान म्हणाले.
“आपली पिढी ही युद्धानंतरची पिढी आहे, ज्यांनी युद्ध पाहिले नाही; या चित्रपटाच्या माध्यमातून तुम्ही युद्धातील वास्तविक परिस्थिती पाहू आणि त्याचा अनुभव घेऊ शकता, ”असे असे बांगलादेशची राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेत्री अपर्णा घोष म्हणाली, तीने या चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका साकारली आहे.
“आम्ही उत्सवाच्या मूडमध्ये आहोत; आमच्या स्वातंत्र्याचे हे 50 वे वर्ष असून आमचे राष्ट्रपिता, बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांची 100 वी जयंती आहे.”
बांगलादेशच्या चित्रपट-उद्योगाविषयी बोलताना अंजान आणि सलीम यांनी माहिती दिली की बांगलादेश सरकार चित्रपटाच्या निर्मितीसाठी सहाय्य आणि अनुदान देते. असे असले तरी या धाटणीच्या चित्रपटांना बांगलादेश मध्ये व्यवसायिक यश मिळत नाही असे दिग्दर्शक म्हणाले.
दिग्दर्शकाने सांगितले की त्यांचे भविष्यातील चित्रपट हे पर्यावरण आणि महिलांशी संबंधित विषयांवर असतील .
* * *
M.Chopade/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1690598)
Visitor Counter : 189