माहिती आणि प्रसारण मंत्रालय

सत्यजीत रे यांच्या शताब्दीनिमित्त गोव्यात 51 व्या इफ्फीमधील विशेष विभागाचे धृतिमन चटर्जी यांच्या हस्ते उद्घाटन

Posted On: 17 JAN 2021 10:35PM by PIB Mumbai

पणजी, 17 जानेवारी 2021

 

भारतीय चित्रपट सृष्टीवर आपल्या कारकिर्दीचा अमिट ठसा उमटविणारे प्रतिभावंत दिग्गज चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या चित्रपटांचा मागोवा घेणारा एक स्वतंत्र विभाग यंदाच्या 51व्या इफ्फी म्हणजेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये तयार केला आहे. या विभागाचे उद्घाटन सुप्रसिद्ध बंगाली अभिनेते धृतिमन चटर्जी यांच्या हस्ते आज करण्यात आले.
धृतिमन चटर्जी यांनी आपल्या कारकिर्दीचा प्रारंभ 1970 मध्ये सत्यजित रे यांच्या ‘प्रतिव्दंदी’  या प्रायोगिक चित्रपटातून केला होता.

इफ्फीच्या या विशेष विभागामध्ये सत्यजिर रे यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या  पाच चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.

  1. चारूलता (1964) - रवींद्रनाथ टागोरांच्या उत्कष्ट कथेवर हा चित्रपट  आधारित असून त्यामध्ये एकाकी तरूण पत्नीची कहाणी आहे. या चित्रपटाचे समीक्षकांकडून खूप  कौतुक झाले होते.
  2. घर बायेर (1984) - बंगालच्या फाळणीच्या पृष्ठभूमीवर घडणारे एक रोमँटिक नाट्य या चित्रपटात घडते. दोन वेगळ्या विचारधारांमध्ये अडकलेली नायिका यामध्ये सत्यजित रे यांनी रंगवली आहे.
  3. पथेर पांचाली (1955) - अपू त्रिधारेतील हा पहिला चित्रपट आहे. बिभुतीभूषण बंदोपाध्याय यांच्या कादंबरीवर आधारित या चित्रपटात अपूच्या बालपणीच्या काळाचे चित्रण आहे.
  4. शतरंज के खिलाडी (1977) - प्रेमचंद यांच्या लघुकथेवरून तयार करण्यात आलेल्या या चित्रपटामध्ये स्वातंत्र्य लढ्याच्या पूर्व काळाची म्हणजे 1857 च्या आधीची पाश्र्वभूमी चित्रित केली आहे.
  5. सोनार केल्ला (1974) - सत्यजित रे यांच्या हेरकथांमधले पात्र ‘फेलुदा’ याच्या प्रारंभीच्या काळातला जो प्रवास आहे त्याविषयी  हा चित्रपट  आहे.

याप्रसंगी बोलताना चटर्जी म्हणाले, सत्यजीत रे यांचा सिनेमा कालातीत आहे, तो आजच्या काळाशी सुसंगत आहे आणि तो समकालीन आहे, असेही म्हणता येते. चित्रपट निर्मितीची कलेमध्ये रे  हे एक कुशल कारागिर होते, हे त्यांच्या प्रत्येक सिनेमामध्ये दिसून येते. त्यांच्या चित्रपटात साधेपणा होता अतिशय कमी खर्चात तयार होणारा त्यांचा सिनेमा आशयाच्या दृष्टीने  मात्र जागतिक दर्जाचा होता. मानवतावादी सत्यजित रे  हे कोणत्याही परिस्थितीकडे अतिशय सहानुभूतीने पाहत होते. निंदा करणे त्यांच्या स्वभावातच नव्हते, असेही धृतिमन चटर्जी यावेळी म्हणाले.

 


* * *

Jaydevi PS/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1689561) Visitor Counter : 153