माहिती आणि प्रसारण मंत्रालय
‘‘सांड की आँख’’ दिग्दर्शक तुषार हिरानंदानी: भारतामध्ये वास्तविक जीवनातल्या अनेक छुप्या नायकांच्या कथा सांगण्याची आवश्यकता
भारतात चित्रीकरणाचा अनुभव उत्तम, स्थानिक नागरिक मदतीला आणि सहकार्याला तत्पर असतात: हिरानंदानी
नॉन-फीचर फिल्म: सामाजिक कसोटीवरही टिकून राहिलेल्या मैत्रीच्या कथेवर बेतलेला गुजराती लघु-चित्रपट ‘‘पांचिका’’
पणजी, 17 जानेवारी 2021
गोव्यात पणजी येथे सुरू असलेल्या 51व्या इफ्फी म्हणजेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘भारतीय पॅनोरमा’च्या नाॅन फीचर फिल्मच्या उद्घाटन सत्रात आज गुजराती ‘पांचिका’’ या लघु-चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. लहान मुलं गारगोटे- पाच छोटे दगडांचे तुकडे घेऊन खेळतात, त्याला गुजरातीमध्ये ‘‘पांचिका’’ असे म्हणतात, या शीर्षकाचा हा लघु-चित्रपट आहे. आपल्या समाजाच्या अशा विशिष्ट मर्यादा असतात आणि एक प्रकारे समाजाचे वर्तन कसे असावे, याचा तो जणू आदेश असतो. मात्र ज्यावेळी मुलांच्या निखळ मैत्रीमध्ये समाजाच्या मर्यादांचा अडसर बनतो त्यावेळी त्यांच्या मैत्रीचा जणू ‘टाॅस’ होतो. आजच्या काळातही भारतामध्ये जात आणि धर्म यांच्या नजरेतून मैत्रीचा न्याय केला जातो. मात्र मैत्रीचे धागे ज्यावेळी घट्ट विणले जातात त्यावेळी सामाजिक रूढीही त्या धाग्यांना तोडू शकत नाही, हे दर्शविणारा लघुपट ‘‘ पांचिका’’ दिग्दर्शक अंकित कोठारी यांनी तयार केला आहे. इफ्फीमध्ये आज ‘पांचिका’चे प्रदर्शन करण्यात आले.
मराठीतले ख्यातकीर्त लेखक व्यंकटेश माडगुळकर यांची 1950 मध्ये लिहिलेल्या एका मराठी लघुकथेचे रूपांतर या तरूण दिग्दर्शकाने केले आहे. या संपूर्ण कथेला गुजरात आणि तिथल्या कच्छच्या रणाची पाश्र्वभूमी दिली आहे. ही मैत्रीची कथा आपल्या पद्धतीने मनोरंजक केली, असे अंकित कोठारी यावेळी प्रेक्षकांशी संवाद साधताना म्हणाले. सामाजिक संदर्भ देताना यामध्ये प्रतीकात्मक गोष्टींचा वापर केला आहे. कच्छच्या रणामध्ये सहजतेने दिसणारा मिठाचा पिरॅमिड इथे मी प्रतीक आणि रूपक म्हणून वापरला असल्याचेही कोठारी यांनी सांगितले. मुलांबरोबर काम करताना येणा-या अनुभवाविषयी ते म्हणाले, मुले अगदी तयारीची असतात, ती अक्षम वगैरे नसतात तर त्यांच्याकडून काम करवून घेताना दिग्दर्शक कमी पडू शकतात. चित्रीकरणाच्यावेळी मी बाल कलाकारांना सूचना देत असे, त्याबर हुकूम ती सगळी मुले नीट काम करत होती. अगदी सांगितल्याप्रमाणेच काम करायची. निर्मात्या श्रेया कपाडिया यांनी तर मुलांशी छान जमवून घेतले होते. शॉट चांगला झाला की, त्या मुलांना चाॅकलेट आणि खायला काही तरी द्यायच्या, त्यामुळे मुलांना चांगले काम करण्याची प्रेरणाच मिळायची.
‘‘सांड की आँख’ चे दिग्दर्शक तुषार हिरानंदानी यावेळी म्हणाले, ‘‘ हा चित्रपट चरित्रपट फक्त महिलांच्या सक्षमीकरणाची महती सांगतोय आणि त्या काहीही करू शकतात म्हणून प्रेरणा देणारा चित्रपट नाही. तर साधारणपणे वयाची साठी आली की, बहुतांश लोक कोणत्याही कामासाठी प्रयत्न करायचीही तयारी दर्शवत नाहीत. रिलायन्स बिग एंटरटेन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाषीश सरकार यावेळी म्हणाले, ‘‘ काही वेळा पुढे जाण्यासाठी आपल्याला काही गोष्टी खूप प्रेरणा देतात. अशा गोष्टी समाजापुढे आल्या पाहिजेत, त्यांचे यश साजरे केले पाहिजे. त्यांच्यातला उत्साह, त्यांच्यामधील मानवी मूल्ये समाजापुढे आले पाहिजे. प्रौढ वयामध्ये एखादी कामगिरी करणे म्हणजे ते खरेच नायक आहेत.’’ या चित्रपटामध्ये दोन्ही प्रौढ महिलांना यश मिळवताना येणारे अडथळे समाजातले आहेत. समाज एक पात्र म्हणून चित्रपटात दिसते. कोणताही थेट उपदेश करण्याऐवजी अतिशय रंजक पद्धतीने सामाजिक विषय मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटामध्ये केला असल्याचे तुषार हिरानंदानी यांनी सांगितले. अशा पद्धतीने विषय लोकांपर्यंत पोहोचतो, त्याचा परिणाम होतो, चरित्रात्मक शैलीतले चित्रपट परिणामकारक ठरतात, असे दिसून आल्याचेही हिरानंदानी यांनी सांगितले. भारतामध्ये अनेक छुपे नायक आहेत, त्यांच्या कथा चित्रित करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. या चित्रपटातल्या चंद्रो आणि प्रकाशी या दोन महिला नायिका आहेत. प्रत्यक्षात ज्यांच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतला त्यांच्याविषयी स्थानिक मीरतमधल्या लोकांनाही फारशी माहिती नव्हती.
भारतामध्ये चित्रीकरणाचा अनुभव कसा आहे, याविषयी बोलताना हिरानंदानी म्हणाले, मीरतमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले. तिथलेस्थानिक लोक अतिशय मदत करणारे, सहकार्य करणारे आहेत, त्यामुळे खूप चांगला अनुभव आला. फक्त मोठ्या वलयांकित कलाकारांमुळेच चित्रपट यशस्वी ठरतो असे नाही तर भारतात चरित्रात्मक चित्रपटामध्ये प्रतिभावंत आणि कष्टाची तयारी असलेल्या कलाकारांची गरज आहे.’’
* * *
M.Chopade/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1689555)
Visitor Counter : 164