अर्थ मंत्रालय
करचोरी/बेनामी संपत्ती/परदेशी अघोषित मालमत्ता यासंदर्भात तक्रार नोंदवण्यासाठी सीबीडीटी ने सुरु केले ई-पोर्टल
Posted On:
12 JAN 2021 10:22PM by PIB Mumbai
ई-प्रशासनाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत आणि करचोरीसारख्या प्रकारांना आळा घालण्यात जनसहभाग वाढवण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने करचोरी, बेनामी संपत्ती, परदेशी अघोषित मालमत्ता यासंदर्भात तक्रार नोंदवण्यासाठी एक स्वचलित समर्पित ई-पोर्टल सुरु केले आहे. विभागाच्या वेबसाईटवर असलेल्या या पोर्टलवर नागरिकांना थेट तक्रारी दाखल करता येतील.
आता सर्वसामान्य लोक विभागाच्या https://www.incometaxindiaefiling.gov.in/ या ई फायलिंग वेबसाईट वर असलेल्या लिंकवर जाऊन “करचोरी/बेनामी संपत्ती/परदेशी अघोषित मालमत्ता यासंदर्भात तक्रार” या शीर्षकाखाली तकार दाखल करू शकतील. ज्यांच्याकडे पॅन/आधार कार्ड आहे, असे लोक किंवा ज्यांच्याकडे ते नाही असेही लोक या सुविधेचा वापर करु शकतील. मोबाईल किंवा इमेलच्या माध्यमातून ओटीपी आधारित पडताळणी झाल्यावर, तक्रारदार, प्राप्तीकर कायदा 1961, काळा पैसा (बेनामी परदेशी संपत्ती आणि उत्पन्न) अंमलबजावणी कायदा 1961 आणि बेनामी व्यवहार प्रतिबंधक कायदा (सुधारित) अशा तीन वेगवेगळ्या प्रकारे तक्रार दाखल करु शकेल.
तक्रार दाखल झाल्यावर, विभागाकडून तक्रारदाराला एक विशिष्ट क्रमांक दिला जाईल. हा क्रमांक वापरुन, तक्रारदार आपल्या तक्रारीवरील तपास किंवा सद्यस्थिती विभागाच्या संकेतस्थळावर बघू शकेल. जनतेला विभागाशी संपर्क साधण्याचे सुलभ साधन असावे या हेतूने, हे ई-पोर्टल सुरु करण्यात आले आहे.
****
S.Tupe/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1688088)
Visitor Counter : 464