आयुष मंत्रालय

आयुष मंत्रालयाच्यावतीने आयोजित वेबिनारमध्ये उत्तम आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी निद्रा आणि योग यांचे महत्व अधोरेखित

Posted On: 11 JAN 2021 8:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 जानेवारी 2021

 

योग आणि निसर्गोपचार केंद्रीय संशोधन संस्था (सीसीआरवायएन) या आयुष मंत्रालयाच्या स्वायत्त संस्थेच्यावतीने आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा आणि बरेचदा दुर्लक्षित असलेल्या घटकांकडे लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. यासाठी आयुष मंत्रालयाच्यावतीने दि. 7 जानेवारी, 2021 रोजी ‘‘निद्रा आणि योग’’ या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये निद्रा या विषयातील तज्ज्ञांनी सहभाग नोंदवला. यामध्ये मेंदूविकारतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय तज्ज्ञ, संशोधक आणि योग तसेच निसर्गोपचार चिकित्सक सहभागी झाले होते. या विज्ञानाधारित सत्रामध्ये तज्ज्ञांनी निद्रेविषयी अनेक महत्वाचे मुद्दे मांडले आणि योग निद्रेचे महत्व आणि लाभ विशद केले. 

या वेबिनारमध्ये सहभागी झालेले नवी दिल्लीच्या एम्सचे माजी प्राध्यापक डॉ. एच एन मल्लिक यावेळी म्हणाले, माणसाच्या झोपेचा संबंध हा जैविक लय, शरीर विज्ञान यांच्याशी निगडित असतो. आपल्या शरीराअंतर्गत एकूणच तालबद्धता साधण्याचे अतिशय महत्वाचे काम झोप करते. शरीर विज्ञानातल्या तालबद्धतेसाठी कारणीभूत ठरणा-या घटकांची आणि त्यांच्या परिणामांची माहिती डॉ. मल्लिक यांनी यावेळी दिली. 

खंडित झोपेमुळे आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात, याची माहिती देताना ऋषिकेश येथील एम्सचे मानसोपचार आणि निद्रा वैद्यक विभागाचे अतिरिक्त प्राध्यापक डॉ. रवी गुप्ता म्हणाले, कोणत्याही अडथळ्याविना चांगली झोप झाली तर वजन नियंत्रित करणे आणि श्वासोच्छवास सुकरतेने घेणे शक्य होते. यासाठी प्राणायाम, योग, व्यायाम करण्याची आवश्यकता आहे, यावर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला. पुण्याच्या ‘एएफएमसी’च्या क्रीडा वैद्यकीय आणि वैद्यकीय शिक्षक विभागाच्या समन्वयक प्राध्यापक डॉ. करूणा दत्ता यांनी ज्यांना निद्रानाशाचा विकार आहे, त्यांच्यासाठी योगनिद्रा हा सर्वात उत्तम उपाय असल्याचे दिसून आले आहे, असे सांगून आपला अनुभव सामायिक केला. तसेच योगमुळे झोपेचा दर्जा सुधारण्यास मदत होत असल्याचेही सांगितले. ‘सीसीआरवायएन’चे  संचालक डॉ. राघवेंद्र राव यांनी योग आणि निद्रा यांच्यामुळे कर्करोग आणि कोविडच्या रूग्णांमध्ये सुधारणा दिसून आल्याचे यावेळी नमूद केले. 

 

* * *

M.Chopade/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1687713) Visitor Counter : 108