पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेवाडी- मदार विभागामध्ये मालवाहतूक समर्पित पश्चिमी मार्गिका आज राष्ट्राला अर्पण करण्यात आली; या कार्यक्रमप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
07 JAN 2021 11:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जानेवारी 2021
नमस्कार!
राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र, हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल, उप-मुख्यमंत्री दुष्यंत चौताला, मंत्रिमंडळातील माझे सहयोगी पीयूष गोयल, राजस्थानचेच गजेंद्रसिंह शेखावत, अर्जनराम मेघवाल, कैलाश चौधरी, हरियाणाचेच राव इंद्रजीत सिंह, रतनलाल कटारिया, कृष्णपाल, संसदेतले माझे इतर सर्व सहयोगी खासदार, आमदार, भारतामध्ये कार्यरत असलेले जपानचे राजदूत सतोशी सुजुकी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर !
बंधू आणि भगिनींनो,
आपल्या सर्वांना माझ्यावतीने 2021 या नववर्षाच्या शुभेच्छा ! देशामधल्या पायाभूत सुविधा आधुनिक बनविण्यासाठी जो महायज्ञ सुरू आहे, त्याने आज एक नवीन गती प्राप्त केली आहे. गेल्या फक्त 10 -12 दिवसांचीच तर गोष्ट करायची झाली तर, आधुनिक डिजिटल पायाभूत सुविधांच्या मदतीने शेतक-यांच्या खात्यामध्ये थेट 18 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रूपये जमा करण्यात आले आहेत. दिल्ली मेट्रोच्या विमानतळ द्रूतगती मार्गिकेवर ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ सुरू करण्यात आले. त्याच प्रकारे विनाचालक मेट्रोचा प्रारंभ झाला आहे. गुजरातमधल्या राजकोटमध्ये एम्सच्या तर ओडिशातल्या संबलपूर येथे आयआयएमच्या स्थायी परिसरांच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. नॅशनल अॅटोमिक टाइमस्केल आणि भारतीय निर्देशक द्रव्य प्रणाली राष्ट्राला समर्पित केली आहे. देशातल्या पहिल्या राष्ट्रीय पर्यावरणीय प्रमाण प्रयोगशाळेचा शिलान्यास केला आहे. 450किलोमीटर लांबीची कोच्ची- मंगलुरू वायूवाहिनी देशाला अर्पण करण्यात आली. महाराष्ट्रातल्या सांगोला येथून पश्चिम बंगालच्या शालीमारसाठी 100 वी किसान रेल्वे सुरू केली. आणि याच काळामध्ये मालवाहतूक समर्पित पश्चिमी मार्गिका प्रकल्पामध्ये न्यू भाऊपूर ते न्यू खूर्जा या दरम्यान मालवाहतुकीच्या मार्गिकेवर पहिली मालगाडी धावायला लागली आणि आता आज, मालवाहतूक समर्पित पश्चिमी मार्गावरील 306 किलोमीटर लांबीची मार्गिका देशाला समर्पित केली आहे. विचार करा, फक्त 10 ते 12 दिवसांमध्ये इतके काही झाले आहे. ज्यावेळी नवीन वर्षाचा प्रारंभच देशासाठी इतका चांगला झाला आहे, तर मग आगामी काळ अधिकच चांगला असणार आहे. इतक्या प्रकल्पांचे लोकार्पण, इतके शिलान्यास हे सगळे काही खूप महत्वपूर्ण आहे, कारण भारताने हे काम या कोरोना संकटकाळामध्ये केले आहेत. काही दिवसांपूर्वीच भारताने कोरोनाच्याविरोधातल्या दोन ‘मेड इन इंडिया’ लसींना मान्यता दिली आहे. भारताची स्वतःची लस तयार झाल्यामुळे देशवासियांच्या मनात नवीन आत्मविश्वास निर्माण केला आहे. 2021च्या प्रारंभीचे हे वातावरण आणि आत्मनिर्भरतेला गती देणारा हा देशाचा कामाचा वेग, या सर्व गोष्टी पाहून, ऐकून कोणत्या हिंदुस्तानीचे, माता भारतीच्या कोणत्या पुत्राचे, भारतावर प्रेम करणा-या कोणत्या व्यक्तीचे मस्तक गर्वाने-अभिमानाने उंचावणार नाही? आज प्रत्येक भारतीयाने आव्हान स्वीकारले आहे आणि ते म्हणतात, आम्ही थांबणार नाही की थकणार नाही! आम्ही भारतीय - सर्वजण मिळून अधिक वेगाने पुढे जाणार आहोत.
मित्रांनो,
मालवाहतूक समर्पित मार्गिकेचा हा प्रकल्प 21 व्या शतकामध्ये भारतासाठी ‘गेम चेंजर’ ठरणार आहे, त्याच दृष्टीने या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. या प्रकल्पावर गेले 5-6 वर्ष अथक परिश्रम केल्यानंतर आज त्याचा एक खूप मोठा भाग प्रत्यक्षात पहायला मिळतो आहे. काही दिवसांपूर्वीच न्यू भाऊपूर ते न्यू खुर्जा विभागामध्ये मालवाहतूक सुरू झाली. या मार्गावर आता 90 किलोमीटर प्रतितास या वेगाने मालगाड्या धावत आहेत. याच मार्गावर आधी फक्त 25 किलोमीटर प्रतितास या वेगाने वाहतूक होत होती. म्हणजे आता पहिल्यापेक्षा जवळ-जवळ तिप्पट जास्त वेगाने मालगाड्या जात आहेत. भारताला आधीच्या तुलनेत याच वेगाने काम करायचे आहे आणि देशाची अशीच प्रगती घडवून आणायची आहे.
मित्रांनो,
आज हरियाणातल्या न्यू अटेलीपासून राजस्थानातल्या न्यू किशनगढसाठी पहिली डबलडेकर कंटेनर मालगाडी रवाना करण्यात आली आहे. याचा अर्थ मालवाहू वाघिणीच्या वर आणखी एक वाघीण!! तेही दीड किलोमीटर लांबीची ही मालगाडी आहे. अशी मालवाहू सुविधा निर्माण करणे म्हणजे, एक मोठी उपलब्धी आहे. यामुळे आता भारताची गणना सामर्थ्यशील अशा निवडक देशांमध्ये झाली आहे. यामागे आमचे अभियंते, तंत्रज्ञ आणि श्रमिक वर्गाचे खूप कठोर परिश्रम आहेत. देशाला गर्व, अभिमान वाटावा, अशी ही कामगिरी आहे. यासाठी मी या सर्वांचे अभिनंदन करतो.
मित्रांनो,
आजचा दिवस एनसीआर, हरियाणा आणि राजस्थानमधले शेतकरी, उद्योजक, व्यापारी, अशा प्रत्येकासाठी नवीन आशा-आकांक्षा, नवीन संधी घेऊन आला आहे. मालवाहतूक समर्पित मार्गिका, मग तो पूर्वेचा असो अथवा पश्चिमेचा, तो फक्त आधुनिक मालगाड्यांसाठी केवळ आधुनिक मार्गच नाही. तर ही मालवाहतूक समर्पित मार्गिका देशाच्या वेगवान विकासाची मार्गिकाही आहे. ही मार्गिका म्हणजे देशातल्या वेगवेगळ्या शहरांध्ये नवीन वृद्धी केंद्र आणि वृद्धी बिंदू आहेत, हे बिंदू आणि केंद्र आता विकासाचा आधारही बनतील.
बंधू आणि भगिनींनो,
देशाच्या वेगवेगळ्या भागाचे सामर्थ्य अशा पद्धतीने वाढविण्यात येत आहे, हेही या मालवाहतूक मार्गिकेने दाखवायला प्रारंभही केला आहे. न्यू भाऊपूर - न्यू खुर्जा विभागामध्ये एकाबाजूने पंजाबातून हजारो टन अन्नधान्य घेवून गाडी निघाली, तर दुस-या बाजूने झारखंडमधून मध्य प्रदेशातल्या सिंगरौली इथून हजारो टन कोळसा घेऊन मालगाडी एनसीआर, पंजाब आणि हरियाणा येथे पोहोचली. असेच काम पश्चिमी मालवाहतूक मार्गिकेवरही होणार आहे. उत्तर प्रदेश, हरियाणापासून ते राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र राज्यात मालवाहतूक होऊ शकणार आहे. हरियाणा आणि राजस्थानमध्ये कृषी आणि त्यासंबंधित व्यापार करणे आता अधिक सुकर होणार आहे. त्याचबरोबर महेंद्रगढ, जयपूर, अजमेर, सीकर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये उद्योगांना नवीन ऊर्जा, चैतन्यही मिळू शकणार आहे. या राज्यांमधील उत्पादन प्रकल्प आणि उद्योजकांना कमी खर्चात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत वेगाने पोहोचण्याचा मार्ग मुक्त झाला आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातल्या बंदरांपर्यंत वेगाने आणि स्वस्त दरात संपर्क यंत्रणा उपलब्ध झाल्यामुळे या क्षेत्रामध्ये गुंतवणुकीच्या नवीन शक्यतांनाही बळ मिळेल.
मित्रांनो,
आपण सर्वजण खूप चांगले जाणून आहोत की, आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती ज्याप्रमाणे जीवनासाठी आवश्यक आहे, तितकीच व्यवसाय, कारभार करण्यासाठीही गरजेची आहे. प्रत्येक नवीन व्यवस्था पुढे जाण्यासाठी अशा कार्यातूनच निर्माण होत असते आणि त्या व्यवस्थेला बळकटीही मिळत जाते. यासंबंधित कार्य, अर्थव्यवस्थेला अनेक इंजिनांसारखी गती देते. यामुळे फक्त तिथल्या स्थानिक भागातच रोजगार निर्माण होतो असे नाही तर इतर उद्योगांमध्येही रोजगाराच्या संधी निर्माण होतात. ज्याप्रमाणे सीमेंट, स्टील, वाहतूक यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती होते. या मालवाहतूक समर्पित मार्गिकेनेच 9 राज्यांतल्या 133 रेल्वे स्थानकांना व्यापले आहे. या रेल्वे स्थानकांवर, त्यांच्याबरोबरच नवी बहुउद्देशिय पुरवठा केंद्र, मालवाहतूक टर्मिनल, कंटेनर डेपो, कंटेनर टर्मिनल, पार्सल केंद्र यासारख्या अनेक व्यवस्था विकसित होतील. या सर्वांचा लाभ शेतकरी बांधवांना होईल, लहान उद्योगांना होईल, कुटीर उद्योगांना होईल तसेच मोठ्या उत्पादकांनाही होणार आहे.
मित्रांनो,
आज हा रेल्वेचा कार्यक्रम आहे, त्यामुळे लोहमार्गाविषयी बोलणे तर स्वाभाविक ठरणार आहे. म्हणूनच लोहमार्गालाच आधार बनवून आणखी एक उदाहरण इथे देतो. आज भारतामध्ये पायाभूत सुविधांचे काम दोन लोहमार्गांवर एकाचवेळी सुरू आहे. एक लोहमार्ग - व्यक्तीगत असून तो व्यक्तीला विकासाच्या मार्गाने पुढे नेत आहे. तर दुसरा लोहमार्ग देशाच्या वृद्धीचा आहे. तो देशाच्या वाढीच्या इंजिनाला नवीन चैतन्य-ऊर्जा-शक्ती प्रदान करीत आहे. जर व्यक्तीच्या विकासाविषयी बोलायचे झाले तर आज देशामध्ये सामान्य माणसासाठी घर, शौचालय, पेयजल, वीज, स्वयंपाकाचा गॅस, रस्ते, इंटरनेट यासारख्या प्रत्येक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अभियान सुरू आहे. पंतप्रधान घरकुल योजना, स्वच्छ भारत मोहीम, सौभाग्य, उज्ज्वला, प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना यासारख्या अनेक योजनांमुळे कोट्यवधी भारतीयांचे जीवन सुकर होईल, सुलभ होईल, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल आणि त्यांना सन्मानाने जीवन जगण्याची संधी मिळेल यासाठी जनतेच्या कल्याणाची कामेही वेगाने सुरू आहेत. तर दुसरीकडे पायाभूत सुविधांच्या दुस-या लोहमार्गाचा लाभ देशाच्या विकासाचे इंजिन, आमचे उद्योजक, आमचे उद्योग यांना होत आहे. आज महामार्ग, हवाईमार्ग, जलमार्ग यांच्या माध्यमातून संपूर्ण देशात संपर्क यंत्रणेचे जाळे तयार करण्यात येत आहे. आणि हे काम अतिशय वेगाने केले जात आहे. आपल्या बंदरांना वाहतुकीच्या वेगवेगळ्या माध्यमांतून जोडण्यात येत आहे. बहुउद्देशीय संपर्क यंत्रणेवर लक्ष केंद्रीत केले जात आहे.
आज देशभरामध्ये मालवाहतूक मार्गिकेप्रमाणेच आर्थिक मार्गिका, संरक्षण मार्गिका, तंत्रज्ञान केंद्र, औद्योगिक वसाहत यासाठी अशा विशेष व्यवस्था तयार करण्यात येत आहेत. आणि मित्रांनो, संपूर्ण जग पाहते आहे की, व्यक्तिगत आणि औद्योगिक क्षेत्र यांच्यासाठी अधिक चांगल्या पायाभूत सुविधा भारतामध्ये तयार होत आहेत. त्याचा एक सकारात्मक प्रभाव पडतो. त्याचा परिणाम म्हणजे भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत वाढ होत आहे. या प्रभावाचा आणखी परिणाम म्हणजे, संपूर्ण दुनियेचा आता भारतावर असलेला विश्वास वाढतोय. आज या कार्यक्रमामध्ये जपानचे राजदूत सुजुकी हेही उपस्थित आहेत. जपान आणि जपानचे लोक, भारताच्या विकास यात्रेमध्ये एका विश्वासू मित्राप्रमाणे सातत्याने भारताचे सहभागीदार झाले आहेत. पश्चिमी मालवाहतूक समर्पित मार्गिकेच्या निर्माणामध्येही जपानने आर्थिक सहकार्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचीही मदत केली आहे. त्यांच्या या समर्थनाबद्दल मी जपान आणि जपानी लोकांचे अभिनंदन करतो. त्यांना विशेष धन्यवाद देतो.
मित्रांनो,
व्यक्तिगत, औद्योगिक आणि गुंतवणूक यांच्यामध्ये योग्य प्रकारे संतुलन साधून भारतीय रेल्वे सातत्याने आधुनिक बनत आहे. आपल्याकडे रेल्वे प्रवाशांना आधी जे अनुभव येत होते, ते कोणी विसरू शकणार आहे का? आपणही त्या कठीण, अवघड काळाचे साक्षीदार आहोत. आरक्षणापासून ते प्रवास संपेपर्यंत तक्रारींचा डोंगर निर्माण होत होता. रेल्वेच्या बोगींची स्वच्छता करणे असो, गाडी वेळेवर सुटणे, तिचा प्रवास नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणे असो, सेवा असो, इतर सुविधा आणि सुरक्षा असो, मानवरहीत फाटक यंत्रणा संपुष्टात आणण्याचे काम असो, प्रत्येक टप्प्यावर रेल्वेमध्ये परिवर्तन घडवून आणणे जरूरीचे आहे, अशा मागण्या होत्या. परिवर्तन घडवून आणण्याच्या या कामांना गेल्या काही वर्षांमध्ये वेग आल्याचे दिसून येत आहे. रेल्वे स्थानकांपासून ते बोगींच्या आतमध्ये केली जाणारी स्वच्छता असो अथवा ‘बायो-डिग्रेडेबल’ शौचालये असो, भोजन सेवेसंबंधीच्या व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याचे काम असो, अथवा ‘विस्टा डोम’ बोगींची निर्मिती असो, भारतीय रेल्वे आधुनिक होत आहे. आणि हे काम अतिशय वेगाने होत आहे. भारताला वेगाने पुढे नेण्यासाठी ही कामे केली जात आहेत.
मित्रांनो,
गेल्या सहा वर्षांमध्ये नवीन रेलमार्ग, रेलमार्गांचे रूंदीकरण आणि विद्युतीकरण यांच्यावर जितकी गुंतवणूक झाली आहे, तितकी यापूर्वी कधीच झाली नाही. रेल्वेचे जाळे तयार करण्यावर लक्ष केंद्रीत केल्यामुळे भारतीय रेल्वेचा वेगही वाढला आहे आणि रेल्वेची व्याप्तीही वाढली आहे. आता ईशान्येकडील प्रत्येक राज्याच्या राजधानीला रेल्वेने जोडण्याचे काम पूर्ण होईल, आता हा दिवस फार दूर नाही. आज भारतामध्ये सेमी हाय स्पीड रेल्वे धावत आहेत. उच्चवेगाने रेल्वे धावू शकेल इतक्या क्षमतेचा रेलमार्ग टाकण्याचे काम करण्यापासून ते उत्कृष्ट तंत्रज्ञानाच्या वापरापर्यंत भारतामध्ये काम करण्यात येत आहे. भारतीय रेल्वे आज ‘मेक इन इंडिया’च्या दृष्टिकोनातून एक उत्तम अभियांत्रिकीचे उदाहरण बनत आहे. रेल्वे ज्या वेगाने प्रगती करीत आहे, तीच गती भारताला प्रगतीपथावर नवीन उंची प्राप्त करून देईल, असा मला विश्वास आहे. भारतीय रेल्वेने अशाच पद्धतीने देशाची सेवा करावी. यासाठी माझ्यावतीने खूप खूप शुभेच्छा! कोरोना काळामध्ये रेल्वेच्या सहका-यांनी ज्या पद्धतीने काम केले, श्रमिकांना स्वगृही पोहोचवले आणि त्यांचे खूप आशीर्वाद मिळवले आहेत. देशाच्या लोकांचा रेल्वेच्या प्रत्येक कर्मचा-याविषयी असलेला स्नेह आणि आशीर्वाद दिवसेंदिवस वृद्धिंगत होत रहावा, अशी माझी सदिच्छा आहे.
पुन्हा एकदा देशाच्या लोकांचे पश्चिमी मालवाहतूक समर्पित मार्गिकेसाठी खूप-खूप अभिनंदन करतो.
खूप- खूप धन्यवाद!!
* * *
U.Ujgare/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1687029)
Visitor Counter : 298
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam