रेल्वे मंत्रालय

भारत-बांग्लादेश आभासी द्विपक्षीय शिखर परिषदे दरम्यान भारत आणि बांगलादेशच्या पंतप्रधानांनी   हल्दीबारी - चिलाहाती  रेल्वे मार्गाचे  संयुक्तपणे उद्घाटन केले


या प्रदेशातील लोकांचे परस्पर संबंध आणि आर्थिक घडामोडीना चालना देण्यात  यामुळे मदत होईल

Posted On: 17 DEC 2020 9:36PM by PIB Mumbai

 

लोकांचे परस्पर संबंध वृद्धिंगत करण्याच्या दिशेने एक प्रमुख पाऊल म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या  पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान स्तरावरील आभासी द्विपक्षीय शिखर परिषदेदरम्यान आज 17.12.2020  रोजी भारतातील हल्दीबारी आणि बांगलादेशमधील चिलाहाटी दरम्यान रेल्वे मार्गाचे  संयुक्तपणे उद्घाटन केले.

त्यानंतर , चिलाहाटी स्थानकावरून बांगलादेशचे रेल्वेमंत्री मो. नुरुल इस्लाम सुजन यांच्या हस्ते मालगाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला जिने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून  भारतात  प्रवेश केला आणि दोन्ही देशांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी नवीन युगाचा प्रारंभ केला. .

भारत आणि बांगलादेशचे रेल्वे जाळे ब्रिटिश राजवटीतील भारतीय रेल्वेकडून मिळालेला वारसा आहे. 1947  मध्ये फाळणीनंतर भारत आणि तत्कालीन पूर्व पाकिस्तान (1965 पर्यंत) दरम्यान 7  रेल्वे मार्ग  कार्यरत होते. सध्या भारत आणि बांगलादेश दरम्यान 4 परिचालन रेल्वे मार्ग आहेत- पेट्रापोल (भारत) - बेनापोल (बांगलादेश), गेडे (भारत) - दर्शना (बांग्लादेश), सिंघाबाद (भारत) -रोहनपूर (बांगलादेश), राधिकापूर (भारत) -बिरोल (बांगलादेश). हल्दीबारी आणि  चिलाहाटी रेल्वे मार्ग 17.12.2020  पासून  कार्यान्वित होत असून भारत आणि बांगलादेश दरम्यान 5वा रेल्वे मार्ग आहे.

1965 पर्यंत हल्दीबारी - चिलाहाती रेल्वे मार्ग कार्यरत होता . फाळणीच्या वेळी कोलकाता ते सिलीगुडी  ब्रॉडगेज मुख्य मार्गाचा हा भाग होता. आसाम आणि उत्तर बंगालला जाणाऱ्या रेल्वेगाड्या फाळणीनंतरही तत्कालीन पूर्व पाकिस्तानच्या प्रदेशातून जात होत्या.  उदाहरणार्थ, सीलदाह येथून  सिलीगुडीला जाणारी रेल्वेगाडी दर्शनाहून पूर्व पाकिस्तानच्या प्रांतात  जायची आणि हल्दीबारी - चिल्लाटी मार्गाचा वापर करून  बाहेर पडायची. मात्र 1965 च्या युद्धाने भारत आणि तत्कालीन पूर्व पाकिस्तानमधील सर्व रेल्वे संपर्क बंद झाले . त्यामुळे भारतीय पूर्व क्षेत्रात 1965 मध्ये रेल्वेचे  विभाजन झाले.  त्यामुळे हा रेल्वे मार्ग  पुन्हा सुरू करण्याची महत्त्वाची कल्पना केली जाऊ शकते.

मे,  2015  मध्ये दिल्लीत आयोजित आंतर-सरकारी रेल्वे बैठक (आयजीआरएम) मधील संयुक्त घोषणापत्राच्या अनुषंगाने; तत्कालीन रेल्वे मार्ग  पुन्हा सुरू करण्यासाठी 2016-17 मध्ये हल्दीबारी स्थानक ते बांगलादेश सीमेपर्यंत चिलहाती  (लांबी -  3.50 कि.मी.) ला जोडण्यासाठी  नवीन ब्रॉडगेज लाइन बांधण्यासाठी रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली. भारतीय  रेल्वेने हल्दीबारी स्थानकापासून आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत रेल्वे मार्ग सुरु करण्यासाठी  82.72 कोटी रुपये खर्च केले.  बांगलादेश रेल्वेने त्यानुसार चिलहाटी स्थानक ते आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत त्यांच्या बाजूच्या रेल्वेमार्गाचे अद्ययावतीकरण काम हाती घेतले आहे. बांगलादेशच्या बाजूने चिलाहाटी - परबतीपूर - संतहार - दर्शना विद्यमान मार्ग आधीच ब्रॉडगेजमध्ये आहे.

17.12.2020 रोजी  सुरु करण्यात आलेला हल्दीबारी - चिलहाटी मार्ग आसाम आणि पश्चिम बंगालमधून बांगलादेशात जाण्यासाठी फायदेशीर ठरेल. हा नव्याने सुरु केलेला रेल्वे मार्ग  प्रादेशिक व्यापाराच्या वाढीला  आधार देण्यासाठी आणि या क्षेत्राच्या आर्थिक व सामाजिक विकासाला प्रोत्साहित करण्यासाठी मुख्य बंदरे, सुकी बंदरे  आणि भौगोलिक सीमांवर रेल्वे सुलभता वाढवेल. या मार्गावर प्रवासी गाड्यांचे नियोजन झाल्यावर दोन्ही देशांचे सामान्य लोक आणि व्यापारी माल आणि  प्रवासी वाहतुकीचा लाभ घेऊ शकतील. हा  नवीन मार्ग कार्यान्वित झाल्यामुळे बांगलादेशातील पर्यटक नेपाळ, भूतान इत्यादी देशांव्यतिरिक्त दार्जिलिंग, सिक्किम, डुवर्स यासारख्या ठिकाणी सहज भेट देऊ शकतील. या दक्षिण  आशियाई देशांच्या आर्थिक घडामोडीनाही  या नव्या रेल्वे मार्गाचा  फायदा होईल.

***

M.Chopade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1681587) Visitor Counter : 214