वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
सरकारने स्टार्टअप्सना प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी अनेक लाभदायक योजना सादर केल्या आहेत- पियुष गोयल
शेतकऱ्यांना संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न ही एक मोठी सुधारणा असून यामुळे आपल्या शेतकऱ्यांना मदत होईल
Posted On:
08 DEC 2020 9:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2020
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज सांगितले की सरकारने स्टार्टअप्सना प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी अनेक लाभदायक योजना सादर केल्या आहेत. आयसीएआयच्या स्टार्टअप मंथन 2.0 ला संबोधित करताना ते म्हणाले की सरकार स्टार्टअप परिसंस्थेला त्यांचा पाया विस्तारण्यासाठी सातत्याने माहिती आणि प्रेरणा देत आहे.
स्टार्टअपला पाठिंबा देण्याबाबत बोलताना गोयल म्हणाले की यात कर लाभाचा समावेश आहे. “सरकारने आश्वासक स्टार्टअप्सच्या सुरुवातीच्या टप्प्यातील निधीच्या आवश्यकताना वित्तपुरवठा करण्यासाठी 10,000 कोटींच्या आरंभिक कॉर्पससह स्टार्टअप्ससाठी एक निधी तयार केला आहे. सरकारी ई-बाजारपेठा स्टार्टअप्सना देशातील सर्व सरकारी उपक्रमांना त्यांची सेवा आणि उत्पादने पुरवण्याची एक समान संधी उपलब्ध करुन देतात ”, असे ते पुढे म्हणाले.
गोयल म्हणाले की, आज भारत स्वावलंबी होण्याच्या मार्गावर आहे आणि स्टार्टअप्स या मार्गाचे नेतृत्व करत आहे. “आपण मानवी इतिहासाच्या गंभीर टप्प्यावर आहोत जिथे आपल्या कृतींचा कोट्यावधी लोकांवर थेट परिणाम होईल. आपले उद्योजक एक सुवर्णकाळ निर्माण करू शकतात जिथे आपले स्टार्टअप्स त्यांच्या वचनबद्धतेने, उत्साहाने आणि चिकाटीने सर्व क्षेत्रांमध्ये भारताला अग्रेसर बनवेल. स्टार्टअप्स कठोर परिश्रम करत असताना आपण त्यांच्या प्रयत्नात त्यांना पाठिंबा देऊ ”, असे ते म्हणाले.
गोयल म्हणाले की सर्जनशीलता , नवसंशोधन , आविष्कार आणि विकास हा नवीन भारताचा पाया आणि आदेश आहे. “या नव्या परिस्थितीत आपल्याला स्वावलंबी होण्यासाठी दीर्घकालीन शाश्वत उपायांची आवश्यकता आहे. नाविन्यपूर्ण संशोधन , शोध आणि उपक्रम यांची परिसंस्था तयार करण्यासाठी आम्ही 2016 मध्ये स्टार्टअप इंडिया उपक्रम सुरु केला. आता जगातील तिसर्या क्रमांकाची स्टार्टअप परिसंस्था भारतात आहे. ”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सनदी लेखापाल (सीए) आपल्या दुर्गम खेड्यात व शहरांमध्ये उद्योजकता भावना निर्माण करण्यास मदत करतील
असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, सरकारबरोबर भागीदारीत काम करणारे सनदी लेखापाल येत्या काही वर्षांत भारत आणि देशातील लोकांना मोठे यश मिळवून देऊ शकतात. “
पंतप्रधान म्हणाले की, “स्टार्टअप्स नाविन्याची ताकद दाखवणारे वाढीचे इंजिन असतात.” सनदी लेखापाल स्टार्टअप उद्योजक होणार आहेत आणि नव्या स्टार्टअप्सला सेवा पुरवठादार म्हणून काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गोयल यांनी सनदी लेखापालांना विनंती केली की संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना त्यांनी कृषी कायद्यांचे लाभ समजावून सांगावेत. “आम्ही त्यांना अधिक पर्याय देऊन संधींचे नवीन दरवाजे उघडत आहोत. शेतकर्यांना संधी उपलब्ध करुन देण्याचा हा प्रयत्न म्हणजे एक मोठी सुधारणा आहे जी दीर्घकाळापर्यंत, आपल्या शेतकर्यांना त्यांचे उत्पन्न वेगाने वाढवण्यास, उत्तम पीक पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करण्यात मदत करेल. मला विश्वास आहे, जास्तीत जास्त लोकांना या बदलाचे महत्व समजेल आणि आपल्या शेतकरी बंधू आणि भगिनींच्या जीवनात मोठी सुधारणा आणि समृद्धी दिसून येईल, असे ते म्हणाले.
गोयल यांनी एमएसएमई बिझिनेस कंटिन्युइटी चेकलिस्ट जारी केल्याबद्दल आयसीएआय संस्थेचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, संस्थेचा हा आणखी एक अद्भुत उपक्रम असून एमएसएमई मार्गदर्शन करण्यात त्याची मदत होईल. ते म्हणाले की, संस्थेने सर्व नवोदित उद्योजक, विचारवंतांना आणि व्यवसायांना सामायिक करण्यासाठी आणि सहकार्यासाठी उपलब्ध करुन दिलेला हा मंच त्यांना नाविन्य आणि व्यवसाय विकासाच्या कल्पनांसह सक्षम करेल.
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1679223)
Visitor Counter : 201