दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

पंतप्रधानांच्या हस्ते इंडिया मोबाइल काँग्रेस 2020 चे उद्‌घाटन


भविष्यात गरूड भरारी घेण्यासाठी 5 जी तंत्रज्ञानाची अंमलबजावणी नियोजित वेळेत होणे सुनिश्चित करण्याची गरज: पंतप्रधान

इलेक्ट्रॉनिक कचरा योग्य प्रकारे हाताळण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेच्या चक्रीय प्रवाहासाठी कृती दल तयार करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

कोविड-19च्या आव्हानात्मक काळामध्ये डिजिटल तंत्रज्ञान आणि आभासी संवाद साधनांची विलक्षण योग्यता सिद्ध झाली- रविशंकर प्रसाद

Posted On: 08 DEC 2020 4:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज आभासी इंडिया मोबाइल काँग्रेस (आयएमसी) 2020 च्या उद्‌घाटनप्रसंगी भाषण झाले. ‘‘सर्वसमावेशक नवसंकल्पना - स्मार्ट, सुरक्षित, शाश्वत’’ या संकल्पनेवर यंदा आयएमसी 2020चे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत अभियानाला प्रोत्साहन देणे, हाही एक उद्देश यामागे आहे. भारताला  आत्मनिर्भर बनविताना  डिजिटल समावेशकता  असावी आणि शाश्वत विकास, उद्योजकता आणि नवसंकल्पना यांचे संवर्धन करण्याचा पंतप्रधानांचा दृष्टिकोन आहे. त्यानुसार दूरसंचार आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये परकीय आणि स्थानिक गुंतवणूकीला त्याचबरोबर संशोधन आणि विकास कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट आहे.

या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना पंतप्रधान मोदी यांनी भारताला दूरसंचार उपकरणे, संरचना , विकास आणि उत्पादन यांचे जागतिक केंद्र बनविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन कार्य करण्याचे आवाहन केले. तंत्रज्ञानामध्ये सातत्याने होत असलेले संशोधन आणि प्रगतीमुळे मोबाइल फोन आणि तत्सम इतर साधने वरचेवर बदलण्याची संस्कृती येत आहे, याविषयी  सतर्क होण्याची गरज आहे, असे सांगून इलेक्ट्रॉनिक कचऱ्यांची वाढती समस्या हाताळण्यासाठी अधिक योग्य मार्गाचा विचार करण्याची आणि अर्थव्यवस्थेचा चक्रीय प्रवाह निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. भविष्यात गरूड भरारी घेण्यासाठी आणि लक्षावधी भारतीयांना सक्षम बनविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन 5 जी  तंत्रज्ञानाची  अंमलबजावणी नियोजित वेळेत  सुनिश्चित करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केले.

भविष्यातल्या तंत्रज्ञान क्रांतीतून जीवनमान सुधारण्यासाठी विचार करणे आणि त्याप्रमाणे नियोजन करणे महत्वाचे आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, उत्तम आरोग्य सेवा, उत्तम शिक्षण, आणि आमच्या शेतक-यांना उत्तम माहिती आणि चांगल्या संधी, लहान व्यावसायिकांना उत्तम बाजारपेठ मिळवून देणे, ही काही उद्दिष्टये निश्चित केली आहेत, त्यावर कार्य करता येईल.

संपूर्ण जगामध्ये महामारीच्या उद्रेक झालेला असताना ही दूरसंचार क्षेत्राच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण पद्धतीने सर्व कामे सुरू होती, याबद्दल पंतप्रधानांनी या क्षेत्रातल्या प्रतिनिधींचे कौतुक केले. अशा अवघड काळामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये राहणारे आई आणि मुलगा केवळ मोबाइलमुळे एकमेकांच्या संपर्कात राहू शकत होते. शाळा आणि वर्ग सुरू नसतानाही विद्यार्थी आपल्या शिक्षकांकडून शिकू शकले. एखाद्या रूग्णाला डॉक्टरांकडून आपल्या घरामधूनच वैद्यकीय सल्ला घेता आला आणि व्यापारी वर्गाला वेगवेगळ्या भागातल्या ग्राहकांशीही जोडणे शक्य झाले.

अलिकडच्या नवीन तंत्रज्ञानामध्ये विशिष्ट कोड बनवून ते उत्पादन वैशिष्टपूर्ण बनविण्याची संकल्पना उद्योजकांना महत्वाची वाटते. तर गुंतवणूकदारांना भांडवल महत्वाचे वाटते. मात्र बरेचदा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे युवकांनी त्या उत्पादनावर दाखवलेला विश्वास आहे, यावर भर देऊन पंतप्रधान मोदी म्हणाले, या सगळ्यांचा एकत्रित विचार करून दृढनिश्चयाने कार्य करून व्यवसाय लाभदायक ठरवणे महत्वाचे आहे.

मोबाइल तंत्रज्ञानामुळेच आम्ही कोट्यवधी भारतीयांपर्यंत लक्षावधी डॉलर्सची मदत  पोहोचवू शकलोत, असे आवर्जुन नमूद करून पंतप्रधान मोदी यांनी, महामारीच्या काळामध्ये देशभरातल्या गरीब आणि गरजु  लोकांना सरकारकडून त्वरित मदत देऊ शकल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांमध्ये अब्जावधींचे ‘कॅशलेस’ व्यवहार झाले. यामुळे व्यवहारांमध्ये पारदर्शकता आली आता आम्ही टोलनाकेही मानव संपर्करहित  करून अधिक सुरळीत, कार्यक्षम करीत आहोत.

भारताने मोबाइल उत्पादनाला चांगले यश मिळविल्याबद्दल  पंतप्रधान मोदी यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, मोबाइल उत्पादनासाठी भारताला सर्वाधिक पसंती मिळत असलेला देश म्हणून उदयास येत आहे. भारतामध्ये दूरसंचार उपकरणे, साधनांच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून  या क्षेत्रात ‘उत्पादन संलग्न प्रोत्साहन’-‘पीएलआय’ योजना सुरू केली आहे, असेही ते पुढे म्हणाले. आगामी तीन वर्षांत देशातल्या प्रत्येक गावामध्ये अतिवेगवान संपर्क सुनिश्चित करण्यासाठी फायबर ऑप्टिक  केबल टाकण्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्चित केले आहे. देशातल्या दुर्गम आणि अतिदुर्गम भागामध्ये संपर्क साधने पोहोचणे अवघड आहे, अशा आकांक्षी जिल्हयांना चिन्हांकित केले आहे, त्याचबरोबर दहशतवादी कारवायांनी प्रभावीत असलेली गावे, ईशान्येकडील राज्ये, लक्षव्दीप बेटे यांना जोडण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. दुर्गम भागामध्ये ब्रॉडबँड संपर्क व्यवस्था आणि सार्वजनिक स्थानी वाय-फाय हॉटस्पॉट तयार करण्यासाठी कार्य करण्यात येत असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली.

मोबाइल काँग्रेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, आणि कायदा आणि न्याय खात्याचे मंत्री रविशंकर प्रसाद, शिक्षण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे, डीसीसी अध्यक्ष आणि दूरसंचार विभागाचे  सचिव अंशु प्रकाश, रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, भारती एंटरप्रायझेसचे अध्यक्ष सुनिल भारती मित्तल उपस्थित होते.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यावेळी म्हणाले, कोविड-19च्या आव्हानात्मक काळामध्ये डिजिटल तंत्रज्ञान आणि आभासी संवाद साधनांची विलक्षण योग्यता सिद्ध झाली आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे घरामध्ये राहून काम करण्याच्या सवलतीचा मुक्त वापर करता येऊ शकतो, हे सर्वांच्या लक्षात आले आहे. उदाहरणार्थ आयटी क्षेत्रात 85 टक्के काम घरातून केले जात आहे. मोबाइलला केंद्रस्थानी ठेवून त्या दृष्टीने कामाची एक अनुकूल परिसंस्था तयार करण्यात येणार आहे. डिजिटल समावेशकतेबाबतचा उद्दिष्टय साध्य करण्यासाठी विविध कार्यक्रमांची चर्चा करताना त्यांनी भारत नेट 2020चा उल्लेख करून जवळपास देशातल्या 2.5 लाख ग्रामपंचायती ब्रॉडबँडने जोडण्यात येत असल्याचे सांगितले. आगामी 1000 दिवसांमध्ये  सर्व खेडी ऑप्टिकल फायबर केबलने जोडण्यात येणार आहेत. त्याचबरोबर नॅशनल ब्रॉडबँड मिशन अंतर्गत 2022 पर्यंत सर्व गावांमध्ये ब्राडबँड उपलब्ध होणार आहे. दूरसंचार क्षेत्रामध्ये परकीय भांडवल आणि परकीय नवसंकल्पना यांचे स्वागत असून सुरक्षा आणि सुरक्षितता यांना समान महत्व देण्यात येईल, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

मोबाइल उत्पादन क्षेत्रामध्ये लागू केलेल्या ‘पीएलआय’ योजनेची माहिती देऊन दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यामुळे जगभरातून गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत, तसेच त्यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीला चालना मिळाली असल्याचे सांगितले. मोबाइल उत्पादकांनी भारतामध्ये उत्पादन करून निर्यात करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग, क्लाउड कॉम्प्युटिंग, डेटा अॅनालिसिस यासारख्या उदयोन्मुख डिजिटल तंत्रज्ञानाला भारतामध्ये मोठ्या संधी आहेत, असे त्यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्तेवर एकाधिकार असणे योग्य नाही. तसेच तिचा वापर सामान्य लोकांच्या सक्षमीकरणासाठी व्हावा, ते एक शस्त्रसाधन बनू नये, असेही मत रविशंकर प्रसाद यांनी यावेळी व्यक्त केले. डिजिटल समावेशकतेचे लाभ किती होऊ शकतात, याचा अनुभव सर्वांनींच घेतला आहे. याचे उदाहरण देताना त्यांनी देशामध्ये राबविण्यात आलेल्या जनधन योजना, थेट लाभ हस्तांतर, यूपीआयच्या माध्यमातून होणारे व्यवहार इत्यादींची माहिती दिली. अशा सर्व व्यवहाराच्या केंद्रस्थानी मोबाइल आहे, त्यामुळे आजच्या काळामध्ये मोबाइल अतिशय महत्वाचे साधन असल्याचे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यावेळी म्हणाले, उद्योग, शासन, शैक्षणिक आणि इतर भागधारकांनी एकत्रित येऊन भविष्यातल्या नवसंकल्पनांच्या पर्यायांवर चर्चा करावी. डेटा अॅनालिटिक्स आणि डेटा प्रायव्हसी , सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांमधील अद्ययावत संकल्पना विचारात घेण्यासाठी हे एक चांगले व्यासपीठ असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमात दूरसंचार विभागाचे सचिव अंशु प्रकाश, सीओएआय अर्थात सेल्यूलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल डॉ. एस.पी. कोचर यांचीही भाषणे झाली.

आयएमसी 2020 चे दि. 8 ते 10 डिसेंबर या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आले आहे. कोविड-19 महामारीचा उद्रेक लक्षात घेऊन ही परिषद आभासी स्वरूपामध्ये होत आहे. दूरसंचार विभाग आणि सेल्यूलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (सीओएआय) यांच्यावतीने आयोजित  काँग्रेसमध्ये 30 पेक्षा हुन अधिक देशातले प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. यामध्ये 210 वक्त्यांची भाषणे होणार असून 50 हुन अधिक बौद्धिक सत्रांचे आयोजन करण्यात आहे. या दरम्यान 150  विविध प्रदर्शनांचे आयोजन केले आहे. या तीन दिवसांच्या कार्यक्रमाला तीन हजारांपेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. दूरसंचार क्षेत्रामध्ये असलेली भविष्यातली आव्हाने आणि शाश्वत उपाय योजनानवीन संकल्पना आणि संधी यावर काँग्रेसमध्ये चर्चा करण्यात येणार आहे.

 

Jaydevi P.S/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1679101) Visitor Counter : 226