विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

कोविड-19 ची लस विकसित करण्यात भारत आघाडीवर : डॉ हर्ष वर्धन

Posted On: 07 DEC 2020 8:28PM by PIB Mumbai

 

केंद्रीय आरोग्य आणि विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज पोर्तुगाल सोबतच्या DST-CII इंडिया पोर्तुगाल तंत्रज्ञान शिखर परिषद 2020 मध्ये सहभाग घेतला. भारतात सध्या कोविडसाठीच्या तीस लसींचे संशोधन विविध टप्प्यात आहे. त्यापैकी दोन लसी- आयसीएमआर आणि भारत बायोटेक यांनी एकत्रितपणे विकसित केलेली कोवॅक्सीन आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ने विकसित केलेली कोविशिल्ड या चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यावर पातळीवर आहेत,” अशी माहिती डॉ हर्षवर्धन यांनी या परिषदेत दिली.

देशातील सर्वोच्च वैद्यकीय संस्था- भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था-ICMR या चाचण्यांवर देखरेख ठेवून  आहे. जगातील इतर सर्व महत्वाच्या ठिकाणी विकसित झालेल्या लसींची चाचणीही भारतात सुरु आहे. जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी- सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीच्याही चाचण्या करत आहे. झायडस कॅडिला कंपनी भारतीय डीएनए लसीची दुसऱ्या टप्प्यातली चाचणी करत आहे. तर रशियाने विकसित केलेल्या लसीची अंतिम मानवी चाचणी यशस्वी झाल्यावर आणि त्याला मान्यता मिळाल्यावर डॉ रेड्डीज लेबॉरेटरी ती विकसित करेल.असे डॉ हर्ष वर्धन यांनी सांगितले.

कोविडविषयक पेटंट साठी अर्ज करणाऱ्या जगातल्या प्रमुख दहा देशांमध्ये भारताचा समावेश आहे, अशी माहितीही हर्षवर्धन यांनी दिली. भारताच्या कोविडच्या लढयाविषयी सांगतांना ते म्हणाले, की केंद्र सरकारच्या मदतीने 100 पेक्षा अधिक स्टार्ट अप कंपन्यांनी कोविडमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी नवनवीन उत्पादने आणि उपाय शोधून काढत त्यांची निर्मिती केली आहे. 

देशासाठी एक उत्तम तंत्रज्ञानयुक्त व्यवस्था विकसित करण्यासाठी सरकार आणि उद्योग जगत यांच्यातील प्रभावी भागीदारीचे प्रतिबिंब या  परिषदेत उमटले आहे, असे डॉ हर्षवर्धन म्हणाले. या संवादातून, परिषदेत सहभागी झालेल्या कंपन्यांसाठी नव्या संधींची दलाने उघडतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यातून आरोग्य, पाणी, कृषी, उर्जा आणि माहिती-तंत्रज्ञान या क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत होतील असेही ते म्हणाले.

पोर्तुगालचे विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच उच्च शिक्षण मंत्री प्रो मैन्युअल हेथर या परिषदेचे प्रमुख पाहुणे आणि वक्ते होते. आपल्या बीजभाषणात त्यांनी म्हटले की सध्या एकमेकांसोबत राहण्याचा काळ असून आमचे भारतासोबतचे बंध अत्यंत मजबूत आहेत, असे ते म्हणाले. या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला केवळ ज्ञानावर अवलंबून राहावे लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या परिषदेत, कृषी-तंत्रज्ञान, जल-तंत्रज्ञान, आरोग्य-तंत्रज्ञान, प्रदूषण मुक्त -तंत्रज्ञान, उर्जा, हवामान बदल, माहिती-तंत्रज्ञान, उदयोन्मुख तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि स्टार्ट अप, तसेच अवकाश-सागरी संवाद या क्षेत्रांवर भर देण्यात आला आहे.                 

*****

M.Chopade/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1678930) Visitor Counter : 281