संरक्षण मंत्रालय

नौदल तळावर प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची पासिंग आऊट परेड

Posted On: 05 DEC 2020 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  5 डिसेंबर 2020

 

नौदल अधिकाऱ्यांच्या एकात्मिक अधिकारी प्रशिक्षणार्थीच्या 98 व्या तुकडीने आपला 5 डिसेंबर 2020 रोजी जहाजावरील प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला.  त्यांची आज पासिंग आऊट परेड झाली. कोविडच्या पार्श्वभूमीवर, हा दीक्षांत कार्यक्रम मर्यादित स्वरूपात घेण्यात आला. दक्षिण नौदल विभागाचे चीफ स्टाफ ऑफीसर (प्रशिक्षण) रिअर ॲडमिरल अ‍ॅन्तोनी जॉर्ज यांनी गुणवत्ताप्राप्त प्रशिक्षणार्थीना चषक प्रदान करुन त्यांचा गौरव केला. या अभ्यासक्रमाअंतर्गत या तुकडीत 132 प्रशिक्षणार्थी होते, यात 114 नौदल अधिकारी, तटरक्षक दलाचे 13 अधिकारी आणि पाच परदेशी प्रशिक्षणार्थी होते. (म्यानमारचे 2, मालदीव, सेशेल्स आणि टान्झानियाचे प्रत्येकी एक) कोची तळावरील पहिल्या प्रशिक्षण पथकात तीर, मगर, शार्दुल, सुजाता, तटरक्षक दलाचे जहाज सारथी, खलाशी प्रशिक्षक जहाजे तरंगिणी आणि सुदर्शिनी यांचा समावेश आहे.

या समारंभात, सर्वांगीण सर्वोत्कृष्ट सागरी प्रशिक्षणार्थीला दिला जाणारा, ‘चीफ ऑफ नेव्हल स्टाफ’ हा प्रतिष्ठेचा चषक आणि टेलिस्कोप सब लेफ्टनंट सुशील सिंग  यांना देण्यात आला. सर्वांगीण गुणवत्ता यादीत प्रथम असल्याबद्दलचा ऑर्डर ऑफ नेव्हल स्टाफ चषक आणि बायनाकुलर्स सब लेफ्टनंट अभिषेक इंगळे यांना आणि सर्वोत्कृष्ट तटरक्षक दल प्रशिक्षणार्थीचा डीजी आयसीजी चषक असिस्टंट कमांडट सोनमाळे सूरज कृष्णात यांना आणि एफओसी-इन-सी इस्ट रोलिंग ट्रॉफी सब लेफ्टनंट केशव सत्यम कट्टी यांना देण्यात आली. फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ हा क्रीडा आणि इतर उपक्रमांसाठीचा फिरता चषक सब लेफ्टनंट देबाशिष सिंग देव यांना प्रदान करण्यात आला.

24 आठवड्यांचा हा प्रशिक्षण अभ्यासक्रम 29 जून रोजी सुरु झाला होता. या प्रशिक्षण काळात, सागरी प्रशिक्षणार्थींनी समुद्री जहाज, दिशादर्शन, जहाज हाताळणी, टेहळणी यासह सर्व पैलूंचे प्रशिक्षण घेतले. यात प्रात्यक्षिकांवर अधिक भर देण्यात आला होता. सागरावर जास्तीत जास्त काल व्यतीत करण्याचा अनुभव त्यांना मिळावा यासाठी अत्यंत सखोल आणि कठीण प्रशिक्षण दिले जाते. जहाजावरील आव्हानात्मक काळाचा अनुभव मिळेल अशा तऱ्हेने प्रशिक्षण देऊन, युद्ध तसेच युध्दाव्यतिरिक्त इतर कामे करण्याचे प्रशिक्षणही दिले जाते.  प्रशिक्षणार्थी 61 दिवस समुद्रावर प्रशिक्षण घेतले, आणि भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यासह मलाक्का आणि सिंगापूर बंदरांना भेट दिली. आयएनएस तरंगिणी आणि सुदर्शिनी या जहाजांवर त्यांना खलाशी प्रशिक्षणही दिले जाते.

हे अधिकारी आता पश्चिम आणि पूर्व समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या विविध युद्धनौकांवर तैनात केले जातील, तिथे त्यांना पुढील टप्प्यातील प्रशिक्षण दिले जाईल.

 

 

 

S.Thakur/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1678651) Visitor Counter : 210