विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

भारताला जागतिक नेता म्हणून प्रस्थापित होण्यासाठी आणि अधिक उत्तम आंतरराष्ट्रीय सहयोग मिळविण्यासाठी तंत्रज्ञान हा सशक्त उपाय ठरू शकेल : मुख्य विज्ञान सल्लागार प्रा.के.विजय राघवन

Posted On: 28 NOV 2020 5:52PM by PIB Mumbai

 

सध्याच्या जगात प्रत्येक देशाला जागतिक पातळीवर परस्पर संबंध वाढविणे आवश्यक असल्यामुळे भारताने या बाबतीत आत्मनिर्भर होण्याचे आव्हान पेलण्याचे महत्त्व भारत सरकारचे मुख्य विज्ञान सल्लागार प्रा.के.विजय राघवन यांनी अधोरेखित केले. तसेच भारताला जागतिक नेता म्हणून प्रस्थापित होण्यासाठी आणि अधिक उत्तम आंतरराष्ट्रीय सहयोग मिळविण्यासाठी तंत्रज्ञान हा सशक्त उपाय ठरू शकेल असे मत त्यांनी व्यक्त केले. गीता अर्थात ग्लोबल इनोव्हेशन अँड टेकनोलॉजी या संस्थेच्या 9 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित केलेल्या फायरसाईड चॅटया आभासी चर्चासत्रात ते गुरुवारी बोलत होते.

आत्मनिर्भरतेचा विषय आंतराष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरील पुरवठा साखळ्यांच्या संदर्भात विचारात घ्यायला हवा असे त्यांनी सांगितले. आत्मनिर्भरतेच्या चौकटीचा विचार करताना नीती, नियमन आणि अंमलबजावणीची उदाहरणे या तीन मुख्य मुद्द्यांना ध्यानात ठेवून अत्यंत जलद गतीने आणि सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवे असे प्रा.के.विजय राघवन म्हणाले.

आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीत विज्ञान आणि तंत्रज्ञानाला खूप महत्त्व आहे मात्र प्रत्येक समस्येवर  विज्ञान आणि तंत्रज्ञान हे उत्तर होऊ शकत नाहीत तर ते त्या उत्तराचा एक भाग असतात. राजकारण, अर्थकारण, समाजकारण आणि इतर अनेक विषयांबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा एक घटक या दृष्टीकोनातून विचार करायला हवा तसेच  नीती, नियमन आणि अंमलबजावणीची उदाहरणे यांच्या आधाराने सर्वांनी एकत्रितपणे काम करायची गरज आहे असा सल्ला त्यांनी दिला.

कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपल्या संशोधन प्रयोगशाळा, संशोधन आणि विकास संस्था आणि उद्योग जगत यांच्यात तसेच उद्योग क्षेत्र आणि समाज यांच्यात अभूतपूर्व सहकार्याचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यकाळात देखील हे साहचर्य खोलवर रुजायला हवे अशी अपेक्षा राघवन यांनी या प्रसंगी व्यक्त केली.

कोविड – 19 विषाणू संसर्गावरील लसीचे वितरण आणि व्यवस्थापनाबाबतच्या आणि या लसीच्या आपत्कालीन वापरासंबंधीच्या प्रश्नांना प्रा.के.विजय राघवन यांनी उत्तरे दिली. आरोग्य मंत्रालयाच्या सहकार्याने, तज्ञ गटाने या लसीचे वितरण आणि व्यवस्थापन यासंदर्भात आरोग्य यंत्रणेला सज्ज करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे अशी माहिती प्रा.राघवन यांनी दिली.

गीता संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित या एकदिवसीय कार्यक्रमात जागतिक दृष्टीकोन: साहचर्यावर आधारित जगात आत्मनिर्भर होऊ घातलेले देशया विषयावर मंडळाचे चर्चासत्र झाले, यामध्ये तैवान, कोरिया प्रजासत्ताक, कॅनडा, स्वीडन, फिनलंड आणि इटली यासारख्या अनेक देशांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला. 

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003D1XY.jpg

 

S.Tupe/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1676770) Visitor Counter : 133