उपराष्ट्रपती कार्यालय

दहशतवादाच्या प्रायोजक देशांना एकटे पाडण्यासाठी जागतिक समुदायाने एकत्रित येण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन


‘आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वंकष परिषद’ भरविण्याच्या भारताचा प्रलंबित प्रस्ताव स्वीकारण्याचे उपराष्ट्रपतींचे संयुक्त राष्ट्राला आवाहन

अधिक समावेशक आणि न्याय्य जागतिक सुव्यवस्था सक्षम करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघामध्ये सुधारणा करण्याची उपराष्ट्रपतींची मागणी

दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना उपराष्ट्रपतींनी वाहिली आदरांजली

महामारीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी गरजूंना मदत करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत आभासी कार्यक्रमामध्ये सुधा मूर्ती यांना यंदाचा ‘लाल बहादूर शास्त्री उत्कृष्टता पुरस्कार’ बहाल

सुधा मूर्ती यांच्या समाजकार्याचे उपराष्ट्रपतींने केले कौतुक

Posted On: 21 NOV 2020 9:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2020


दहशतवादाच्या प्रायोजक देशांना एकटे पाडून त्यांच्यावर निर्बंध लादण्यात यावेत, यासाठी जागतिक समुदायाने एकत्रित येण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू यांनी आज केले.

दहशतवादाच्या वाढत्या संकटाविषयी चिंता व्यक्त करून नायडू यांनी ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वंकष परिषद’ भरविण्याचा भारताचा प्रलंबित प्रस्ताव स्वीकारण्यात यावा, असे आवाहनही उपराष्ट्रपतींनी संयुक्त राष्ट्राला केले.

कोणताही देश दहशतावादाच्या अरिष्टामध्ये सुरक्षित नसतो, हे लक्षात घेऊन आता केवळ बोलून किंवा विरोधी विधाने करून चालणार नाही तर ठोस कारवाई करण्याची वेळ आली आहे. असे सांगून उपराष्ट्रपती पुढे म्हणाले, ‘‘अधिक समावेशक आणि न्याय्य जागतिक सुव्यवस्था सक्षम करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे.’’

लाल बहादूर शास्त्री व्यवस्थापन संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या ‘‘लाल बहादूर शास्त्री उत्कृष्टता पुरस्कार’’ वितरणाच्या आभासी कार्यक्रमामध्ये उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू बोलत होते. यंदाचा ‘लाल बहादूर शास्त्री उत्कृष्टता पुरस्कार’ इन्फोसिस प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांना त्यांच्या समाजसेवेबद्दल बहाल करण्यात आला. याप्रसंगी बोलताना नायडू म्हणाले, समाजामध्ये शांतता नांदण्यासाठी प्रोत्साहन दिले जावे, तसेच दारिद्र्य निर्मूलन, जनतेमध्ये सामाजिक-आर्थिक सुधारणा घडून यावी आणि दहशतवादाचा धोका नष्ट करण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येण्याची गरज आहे.

भारताचे माजी, दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना उपराष्ट्रपतींनी आदरांजली वाहिली. यावेळी ते म्हणाले, भारताचे ते एक महान सुपुत्र होते. नम्र, साधे व्यक्तिमत्व असलेले शास्त्रीजी देशाच्या पंतप्रधानपदी, सर्वात उच्च पदापर्यंत पोहोचले तरीही ते पूर्वीसारखेच साधे होते. नम्रता आणि मानवतावादी दृष्टीकोन त्यांचा कायम होता. राजकीय पदाची प्रतिष्ठा, सन्मान, सचोटी जपताना त्यांनी नैतिक मूल्यांशी तडजोड न करता देशाची सेवा केली.

लाल बहादूर शास्त्री यांच्या व्यक्तिमत्वामधील महत्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकताना उपराष्ट्रपती म्हणाले की, कोणत्याही वाटाघाटी यशस्वी करण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य त्यांच्याकडे होते, ते अतिशय प्रभावीपणाने संवाद साधत  होते. बोलणी यशस्वी होण्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्या प्रश्नाकडे पाहण्याची क्षमता असावी लागते. शास्त्रीजी समोरच्या व्यक्तींच्या भावनांचा विचार करून वाटाघाटी करीत असत.

नायडू म्हणाले, आपल्या माजी पंतप्रधानांनी हरित आणि श्वेत क्रांती घडवून आणण्यासाठी परिश्रम केल्यामुळेच देशातले शेतकरी बांधव अन्न सुरक्षा सुनिश्चित करू शकत आहेत आणि भारत सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला आहे.

विविध क्षेत्रामध्ये आघाडीवर कार्यरत असलेल्या योद्ध्यांचे कौतुक करताना उपराष्ट्रपती म्हणाले, टाळेबंदीत निर्बंध असतानाही आपले शेतकरी बांधव आघाडीच्या योद्ध्यांप्रमाणेच कार्यरत होते आणि त्यांनी मुबलक अन्नधान्य पिकवले. डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्यसेवक, सुरक्षा दलांचे जवान, सफाई कामगार आणि प्रसार माध्यमातील कर्मचारी यांनीही ज्या समर्पण भावनेने कार्य केले, त्यांचे मी कौतुक करतो.

उपराष्ट्रपती म्हणाले, केंद्र आणि विविध राज्य सरकारांनी लोकांच्या मदतीसाठी अनेक उपाय योजना केल्या आहेत. महामारीच्या काळामध्ये सर्वांनाच मदतीचा हात दिला आहे. भारतीय तत्वज्ञानामध्ये प्राचीन काळापासून ‘‘सर्वेजनसुखिनोभवंतु’’ ही संकल्पना आहे. ‘वाटून घ्या आणि एकमेकांची काळजी घ्या’ अशीही शिकवण आपल्याकडे फार पूर्वीपासून दिली जाते. अशा संकटाच्या काळामध्ये मानवतावादी दृष्टीकोनातून आपण सर्वांच्या मदतीसाठी नेहमीच कटिबद्ध राहिले पाहिजे,  असेही त्यांनी नमूद केले.

सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि ख्यातकीर्त लेखिका सुधा मूर्ती यांना यंदाचा 21वा ‘लाल बहादूर शास्त्री उत्कृष्टता पुरस्कार’ आज बहाल करण्यात आला. यावेळी नायडू यांनी सूधा मूर्ती यांचे त्यांनी केलेल्या कार्याबद्दल अभिनंदन केले.  इन्फोसिस प्रतिष्ठानच्यावतीने आरोग्य सेवा, शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता आणि ग्रामीण विकास यासाठी विविध प्रकल्पाच्या माध्यमातून वंचित घटकांना मदत दिली जाते, त्याचे नायडू यांनी कौतुक केले.

लाल बहादूर शास्त्री यांच्यासारख्या महान व्यक्तींचे जीवनकार्य आणि त्यांची शिकवण राज्य सरकारांनी शालेय अभ्यासक्रमाचा भाग बनविण्याचे आवाहन नायडू यांनी यावेळी केले.

या आभासी कार्यक्रमामध्ये इन्फोसिस प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुधा मूर्ती, लाल बहादूर शास्त्री व्यवस्थापन संस्थेचे अध्यक्ष अनिल शास्त्री, आणि संस्थेचे संचालक प्राध्यापक डी.के. श्रीवास्तव, प्रमुख राजकारणी, संस्थेचे प्राध्यापक, विद्यार्थी सहभागी झाले होते.

उपराष्‍ट्रपती नायडू यांच्या पूर्ण भाषणासाठी येथे क्लिक करावे....


* * *

S.Thakur/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1674810) Visitor Counter : 123