उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपतींचे हवामान बदलाच्या प्रतिसादासाठी बालक केंद्री दृष्टीकोन बाळगण्याचे आवाहन


हवामान बदलाच्या धोरणात बालकांचे हक्क समाविष्ट करण्यास सांगितले

Posted On: 20 NOV 2020 8:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  20 नोव्हेंबर 2020

उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी आज हवामान बदलाच्या प्रतिसादामध्ये ‘बालक केंद्री’ दृष्टिकोनाचा समावेश करण्याची गरज व्यक्त केली. मूलभूत हवामान बदल आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची रणनीती, धोरणे आणि नियोजन दस्तऐवज यामध्ये बालकांचे हक्क समाविष्ट करावेत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. 

उपराष्ट्रपतींनी आज जागतिक बाल दिनानिमित्त ‘संसदेतील बालक समिती’ने आयोजित केलेल्या  ‘बालकांसह हवामान संसद’ - ऑनलाईन वेबिनारला संबोधित केले.

या कार्यक्रमाचे उद्दिष्ट, हवामान बदलांच्या महत्त्वपूर्ण विषयावर संसदसदस्य आणि बालकं यांच्यात सुसंवाद साधणे हे होते. मागील पिढ्यांपेक्षा आजच्या  मुलांना अधिक चांगली माहिती असते, हे जाणून त्यांनी हवामान बदलाच्या संदर्भातील चर्चेत मुलांना सहभागी करून घेण्याचे आवाहन केले.

भविष्यात  मुलांना  हवामानातील बदल, त्याचे परिणाम आणि शाळा आणि वास्तव पातळीवर उपाययोजना यावर जनजागृती करणारे धोरणकर्ते आणि परिवर्तनवादी नेते होण्यासाठी तयार करण्याची आवश्यकता आहे, यावर  त्यांनी भर दिला.

जागतिक आरोग्य संघनेच्या आकडेवारी बाबत सांगताना नायडू म्हणाले की, हवामान बदलामुळे दरवर्षी लाखो अतिरिक्त मृत्यू होतात आणि यापैकी बहुतेक मृत्यू आजारपण, जखमी होऊन आणि अल्प पोषणाने होतात. बालकं (0-14 वर्ष) जागतिक लोकसंख्येच्या एक चतुर्थांश आहेत आणि ते हवामानातील बदलामुळे प्रभावित होणार्‍या सर्वात मोठ्या आणि सर्वात असुरक्षित गटांपैकी एक आहेत, असा इशारा त्यांनी दिला.

दुष्काळ, पूर, चक्रीवादळ, वणवे, यासारख्या हवामान बदलाच्या वाढत्या घटनांचा उल्लेख करतांना उपराष्ट्रपती म्हणाले ,की हरितगृह वायूंच्या सतत उत्सर्जनामुळे पृथ्वीच्या वातावरणाचे मोठे नुकसान झाले आहे आणि त्याचे दुष्परिणाम मानवतेच्या अस्तित्वासाठी धोकादायक आहेत.

ग्लोबल वार्मिंगचे दुष्परिणाम विशद करताना उपराष्ट्रपतींनी असा इशारा दिला की, बदलत्या हवामानामुळे उपासमार  आणि अल्प पोषणामुळे जगातील अन्न सुरक्षा देखील धोक्यात येईल, मुलांना याचा सर्वाधिक त्रास होईल, असेही ते म्हणाले.

विशेषत: मुलांवर हवामान बदलाचा आणि आपत्तींचा होणारा परिणाम नमूद करून नायडू यांनी अल्पपोषण, शाळा बंद करावी लागणे, बालमजुरीत  वाढ आणि मानसिक आघात संभाव्य परिणाम म्हणून सूचीबद्ध केले. गरीब आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या बालकांमध्ये ही परिस्थिती विशेषतः गंभीर असेल, असा इशारा त्यांनी दिला.

नायडू यांनी प्लास्टिक प्रदूषणाबद्दलही चिंता व्यक्त केली, विशेषत: महासागरांमध्ये, जेथे जवळजवळ 50% एकदाच -वापरातील प्लास्टिक उत्पादने संपतात, सागरी जीवन नष्ट करतात आणि मानवी खाद्य साखळीत प्रवेश करतात. त्यांनी 2022 पर्यंत देशातून एकच वापरलेले प्लास्टिक नष्ट करण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाचे समर्थन करण्यास प्रत्येकाला सांगितले.

नायडू यांनी भारतीय महिला आणि मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी परिश्रम घेतल्याबद्दल केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांची प्रशंसा केली. तसेच, संसद सदस्या श्रीमती वंदना चव्हाण यांनीही मुलांच्या हक्काबाबतचे प्रश्न लोकसभेच्या ‘ग्रुप फॉर चिल्ड्रन’ या माध्यमातून उपस्थित केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी, संसदेतील बालकांसाठीच्या समुहाच्या निमंत्रक श्रीमती वंदना चव्हाण, भारतातील युनिसेफच्या प्रतिनिधी डॉ यास्मीन अली हक, अनेक खासदार, बाल हक्क चळवळीतील कार्यकर्ते आणि बालकांचा या दृकश्राव्य माध्यमातून झालेल्या कार्यक्रमात सहभाग होता.

 

S.Thakur/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1674539) Visitor Counter : 169