संरक्षण मंत्रालय

क्यूआरएसएएम प्रणालीची दुसरी यशस्वी उड्डाण चाचणी

Posted On: 17 NOV 2020 8:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  17 नोव्हेंबर 2020

क्विक रिएक्शन  सर्फेस टू एअर मिसाईल (क्यूआरएसएएम) प्रणालीने आणखी एका  उड्डाण चाचणीत लक्ष्याचा अचूक वेध घेतला  आणि हवेतच हे लक्ष्य निष्प्रभ केले. ओदिशाच्या किनारपट्टी जवळ चंडीपूरच्या एकात्मिक चाचणी तळावरून आज या मालिकेतील दुसरी उड्डाण चाचणी दुपारी 3 वाजून 42 मिनीटांनी घेण्यात आली.  बानशी नावाच्या उच्च कामगिरी जेट मानवरहित हवाई लक्ष्याविरुद्ध  पुन्हा एकदा उड्डाण चाचणी घेण्यात आली.

मिशन संगणकाने हे क्षेपणास्त्र प्रक्षेपित करेपर्यंत  रडारांनी लांब पल्ल्यावरून लक्ष्याचा मागोवा घेतला. रडार डेटा लिंकद्वारे सतत मार्गदर्शन केले जात होते.  क्षेपणास्त्राने टर्मिनल ऍक्टिव्ह  होमिंग गायडन्समध्ये  प्रवेश केला आणि लक्ष्याच्या जवळ पोहचले.

उड्डाण चाचणी लॉन्चर, पूर्णपणे स्वयंचलित कमांड आणि कंट्रोल सिस्टम, देखरेख  प्रणाली आणि मल्टी फंक्शन रडार्सच्या शस्त्रास्त्र प्रणालीच्या तैनात व्यूहरचनेनुसार घेण्यात आली. क्यूआरएसएएम शस्त्र प्रणालीमध्ये सर्व स्वदेशी विकसित उपप्रणाली आहेत. चाचणीची सर्व उद्दिष्टे पूर्ण झाली. भारतीय सैन्य दलातील वापरकर्त्यांच्या उपस्थितीत हे प्रक्षेपण करण्यात आले.

रडार, टेलीमेट्री आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल सेन्सर सारखी अनेक उपकरणे तैनात केली होती ज्यांनी संपूर्ण उड्डाण डेटा हस्तगत केला आणि क्षेपणास्त्राच्या कामगिरीची पडताळणी केली.

हैदराबाद आणि बालासोरच्या मिसाईल कॉम्प्लेक्स प्रयोगशाळांव्यतिरिक्त पुणे येथील एआरडीई आणि  आर अँड डी (ई), एलआरडीई बंगळुरू आणि आयआरडीई देहरादूनची पथके  या चाचणीत सहभागी झाली होती.

क्यूआरएसएएमच्या मालिकेतील पहिली चाचणी 13 नोव्हेंबर 2020 रोजी घेण्यात आली आणि थेट लक्ष्याचा अचूक भेद केला. दुसऱ्या चाचणीने  वॉरहेडच्या कामगिरीचे  मापदंड सिद्ध केले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी क्यूआरएसएएमच्या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल डीआरडीओ वैज्ञानिकांचे अभिनंदन केले.  डीडीआर अँड डी सचिव आणि  डीआरडीओ चे अध्यक्ष डॉ . जी. सतीश रेड्डी यांनी क्यूआरएसएएम प्रकल्पात काम केलेल्या सर्व पथकांचे दुसऱ्या सलग यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल अभिनंदन केले.

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1673543) Visitor Counter : 237