Posted On:
16 NOV 2020 7:19PM by PIB Mumbai
भारताचे उपराष्ट्रपती श्री. व्यंकय्या नायडू आज म्हणाले की, पत्रकारीतेच्या स्वातंत्र्यावरील कोणताही हल्ला हा राष्ट्रहितासाठी हानीकारक आहे आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन त्याला विरोध करायला हवा.
राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त प्रेस काॅन्सिल आँफ इंडियाच्या वतीने "कोविड-19 महामारीतील प्रसारमाध्यमांची भूमिका आणि तिचा माध्यमांवर झालेला परिणाम" या विषयावरील वेबिनारमधे ध्वनिमुद्रित व्हिडिओ संदेशाद्वारे बोलत असताना उपराष्ट्रपती म्हणाले," मुक्त आणि निर्भय माध्यमांखेरीज लोकशाही जिवंत राहू शकणार नाही."
भारतातील माध्यमे सदैव लोकशाहीच्या पायाचे परिरक्षण आणि सबलीकरणासाठी आघाडीवर राहिली आहेत असे ते पुढे म्हणाले."मजबूत, मुक्त आणि समृध्द माध्यमे ,ही स्वतंत्र न्यायालयीन व्यवस्थेइतकीच लोकशाहीची मुळे घट्ट धरून ठेवण्यासाठी आणि घटनेद्वारे मिळालेली कायदेशीर सत्ता मजबूत करण्यासाठी महत्त्वाची आहेत,"यावर त्यांनी भर दिला.
पत्रकारीता ही एक पुण्यकर्माची चळवळ असून, जनतेला सक्षम करण्यासाठी माध्यमे महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत आणि राष्ट्रहिताला पुढे नेत आहेत, असे म्हणत त्यांनी माध्यमांची प्रशंसा केली.
त्याच वेळी माध्यमांनी आपल्या परीने निष्पक्ष ,वस्तुनिष्ठ राहून अचूकपणे वार्तांकन करावे, असा सल्ला श्री. नायडू यांनी दिला." सनसनाटीपणाचा अव्हेर करायला हवा आणि बातम्यांमध्ये आपल्या विचारधारेचे मिश्रण करण्याची पद्धत थांबवायला हवी.शिवाय विकासाच्या बातम्यांचे वृत्तांकन करण्यासाठी अधिक जागा उपलब्ध करायला हवी," असेही ते पुढे म्हणाले.
कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर छापील आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी पहिल्या फळीच्या योध्दयांत रुपांतरीत होऊन ,महामारीच्या गंभीर परीणामांकडे दुर्लक्ष करत सर्व घटनांचे अविरतपणे कव्हरेज सुनिश्चित केल्याबद्दल, उपराष्ट्रपतींनी माध्यमांचे अभिनंदन केले.
बातम्या आणि माहिती प्रसारित करण्यासाठी अविरत कष्ट घेणाऱ्या प्रत्येक पत्रकार, कॅमेरामन आणि इतर संबंधित व्यक्तींचे मी मनापासून कौतुक करतो, असेही ते पुढे म्हणाले.
विशेषतः आजुबाजूला बनावट बातम्यांचे पेव फुटल्याचे निरिक्षण नोंदवत, या महामारीच्या काळात योग्य माहिती योग्य वेळी पोहोचविण्याचे महत्व आहे यावर उपराष्ट्रपतींनी भर दिला.
असत्य आणि अप्रमाणित दाव्यांपासून सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असल्याचे सांगत उपराष्ट्रपती म्हणाले, की या संदर्भात जनतेला शिक्षित करण्याची प्रचंड मोठी जबाबदारी माध्यमांवर आहे.
कोविड-19 च्या संसर्गाला बळी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांबद्दल त्यांनी तीव्र सहानुभूती व्यक्त केली. कोविड-19 मुळे माध्यम उद्योगावर झालेल्या विपरीत परिणामाबद्दल बोलताना ते म्हणाले, की यामुळे काही वृत्तपत्रांना आपल्या आवृत्त्या कमी करून डीजीटल होण्यास प्रवृत्त व्हावे लागले आहे. छापील आणि इलेक्ट्रॉनिक्स दोन्ही माध्यमात कामगार कपात(टाळेबंदीच्या) करण्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत, असे श्री. नायडू म्हणाले.
या कठीण काळात पत्रकारांना उघड्यावर सोडून जाता कामा नये,असे सांगत सर्व हितसंबंधितांना एकत्र येऊन कोरोना विषाणूमुळे आलेल्या विलक्षण परीस्थितीत नवनवीन उपाययोजना शोधून काढण्याचे आवाहन त्यांनी केले.
या महामारीने माध्यम संस्थांनी लवचिक आणि बदलणाऱ्या व्यावसायिक पध्दतींचा अवलंब करण्याची गरज असल्याचे निरीक्षण नोंदवत, श्री. नायडू यांनी सांगितले की , सध्या जास्तीत जास्त प्रमाणात लोक घरी आहेत त्यामुळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तसेच सामाजिक सुसंवादाचा अभाव असल्यामुळे एकटेपण घालवण्यासाठी, प्रसार माध्यमांवर आणि मनोरंजन उद्योगावर लोक विसंबून रहात आहेत.
रामायण आणि महाभारत या मालिका पुनप्रसारीत होऊन त्यांना मिळालेल्या प्रचंड लोकप्रियतेचे उदाहरण देत, उपराष्ट्रपतींनी माध्यम उद्योगाला प्रेक्षक वाढीचा आधार घेण्यासाठी आणि आपले आर्थिक आरोग्य सुधारण्यासाठी, पर्यायी मार्ग शोधण्याचे सूचित केले.
उपराष्ट्रपतींच्या संदेशाचा संपूर्ण मजकूर वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Jaydevi PS/S.Patgoankar/P.Kor