आयुष मंत्रालय
कोविड-19 विरुद्धच्या जनआंदोलनाला अधिक चालना देण्यासाठी आयुष क्षेत्र सज्ज
कोविड-19 विरोधात जवळपास 2000 जणांनी घेतली शपथ
Posted On:
14 OCT 2020 9:33PM by PIB Mumbai
कोविड-19 विरोधात आयुष मंत्रालयाने जन आंदोलनाला प्रारंभ केला आहे. ‘कोविड-19 च्या विरोधामध्ये सार्वजनिक आरोग्य प्रतिसाद: कोविड -19 योग्य वर्तन मोहीम सुरू करण्यात आली आहे. या आंदोलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्टिटरच्या माध्यमातून आवाहन करून दि. 8 ऑक्टोबर रोजी प्रारंभ केला. आगामी काळात येणारे सण-उत्सव लक्षात घेवून देशातल्या नागरिकांनी सार्वजनिक स्थानी कोविड-19 ला प्रतिबंध करण्यास मदत ठरेल असे योग्य आचरण करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आयुष विभागातल्या व्यावसायिकांना कार्य करताना जनतेशी सहजतेने संपर्क साधावा लागतो. त्यामुळे या मोहिमेला अधिक चालना देण्यासाठी आता आयुष विभाग सज्ज झाला आहे.
या मोहिमेचे यश सर्वस्वी लोकांच्या सहभागावर अवलंबून आहे, हे लक्षात घेवून आयुष क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे व्यावसायिक आणि इतर कर्मचारी लोकांचे कोविड-19 योग्य वर्तन कसे असावे, याच्या माहितीचा प्रसार करणार आहेत. या मोहिमेमध्ये ‘दक्षता बाळगून अनलॉक प्रक्रिया’ पार पाडण्यावर भर देण्यात येणार आहे. त्याच बरोबर सर्वांनी बाहेर पडताना मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतराच्या नियमांचे काटेकोर पालन करावे आणि हातांची स्वच्छता कायम ठेवावी, या तीन संदेशांचा प्रसार प्रामुख्याने करण्यात येणार आहे.
कोविड-19 विरोधातील आंदोलन यशस्वी करण्यासाठी मंत्रालयाशी संलग्न असलेली आणि अधीन असलेल्या कार्यालये तसेच सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातल्या संस्था आणि शैक्षणिक संस्था यांच्याबरोबर भागीदारी करण्यात येत आहे. आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय आयुष मिशनला समर्पित असलेले दवाखाने तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आयुष संचालनालयाअंतर्गत असलेल्या वैद्यकीय संस्था, आयुष संचालक हे या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने सहभागी होणार आहेत. नागरिकांच्या वर्तनामध्ये बदल होणे आवश्यक असल्याचा संदेश सर्वत्र प्रसारित करण्यासाठी नियोजित पद्धतीने मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य सचिवही सहभागी होत आहेत.
देशामध्ये जवळपास 750 आयुष वैद्यकीय महाविद्यालयांचे जाळे आहे. त्यांच्यामार्फत संदेशांचा प्रसार करण्यासाठी विद्यार्थी आणि अध्यापक अतिशय महत्वाची भूमिका बजावणार आहेत. सीसीआयएम आणि सीसीएचच्या अध्यक्षांच्यामार्फत सर्व महाविद्यालयांना कार्यान्वित करण्याची विनंती करण्यात आली आहे.
आयुष मंत्रालयाशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे संलग्न असलेल्या राष्ट्रीय संस्था आणि संशोधन परिषदेच्या रूग्णालयांची आणि संशोधन संस्थांची संख्या जवळपास 150 आहे. या संस्था संदेश प्रसारण केंद्र म्हणून त्याचबरोबर इतर प्रतिबंधात्मक कार्य करण्यासाठी मोहिमेमध्ये सहभागी होणार आहेत. या संस्थांच्या प्रमुखांनी 'कोविड- 19 योग्य वर्तना'विषयी माहिती प्रसारित करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आयुष औषधांचे उत्पादक, आयएमपीसीएल म्हणजेच आयुष रोग प्रतिकारक क्षमता वृद्धीसाठी संच, यासारख्या उत्पादनांची माहिती देणे हा सुद्धा या मोहिमेचा एक भाग असणार आहे.
आयुष मंत्रालयाच्यावतीने कोविड-19 शपथ देण्यात येत आहे. सर्व विभागातले कर्मचारी, मंत्रालय संलग्न, तसेच अधीन असलेली कार्यालये आणि इतर तळागाळामध्ये काम करणा-या संघटना आणि लोकांना कोविड-19 शपथ देण्यात आली. आत्तपर्यंत जवळपास 2000 जणांना ही शपथ देण्यात आली असून आगामी काळामध्य कोविड-19 विरोधातल्या मोहिमेमध्ये हे सर्व उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
---------
R.Tidke/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1664571)
Visitor Counter : 253