कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

कृषी क्षेत्रातील नव्या सुधारणा तरुण कृषी व्यावसायिकांना प्रोत्साहक ठरतील आणि कृषी क्षेत्र व्यवसाय म्हणून स्वीकारायला त्यांना उत्तेजन मिळेल : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांचे मत

Posted On: 09 OCT 2020 7:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 ऑक्‍टोबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कृषी क्षेत्रातील सुधारणा तरुण कृषी व्यावसायिकांना प्रोत्साहक ठरतील आणि कृषी क्षेत्र व्यवसाय म्हणून स्वीकारायला त्यांना उत्तेजन मिळेल असे आज केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंग यांनी सांगितले.

दोडा आणि किश्तवार जिल्ह्यातील शेतकरी,सरपंच आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करताना डॉ.जितेंद्र सिंग म्हणाले की कृषी क्षेत्रातील नव्या सुधारणांमध्ये मोठी दीर्घकालीन दूरदृष्टी आहे आणि आजच्या पिढीतील तरुण तसेच सुशिक्षित शेतकऱ्याला त्याच्या व्यावसायिक वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्या आवडीचे पर्याय वापरून बघण्याचे स्वातंत्र्य देऊन त्याच्यातील तंत्रज्ञानविषयक माहितीचा उत्तम उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने या सुधारणांची रचना केली आहे.

प्रत्येक मावळत्या दिवसासोबत नव्या सुधारणांचे अधिकाधिक फायदे लक्षात येत जातील, बिगर कृषक कुटुंबातील अनेक तरुण कृषी क्षेत्रात नवीन स्टार्ट-अप्स सुरु करून त्याकडे व्यवसाय म्हणून बघतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या मार्फत धान्यांची विक्री करायची पद्धत 50वर्षांपूर्वीच्या परिस्थितीत योग्य असली तरी आता वेळ बदलली आहे.आता शेतीमालासाठी नवे बाजार खुले झाले आहेत आणि शेतकऱ्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचणे सुलभ झाले आहे. आजच्या तरुणाकडे संपर्काची उत्तम साधने उपलब्ध आहेत, त्याच्याकडे अनेक गोष्टींची माहिती आहे आणि परिघाबाहेर पडण्याची क्षमता आहे म्हणूनच बदलत्या काळाची पावले ओळखूनच नव्या कृषी सुधारणांची रचना करण्यात आली आहे.

या चर्चेत भाग घेणाऱ्या सर्व तरुण शेतकऱ्यांनी आणि स्थानिक पंचायत प्रतिनिधींनी मोदी सरकारने केलेल्या नव्या कायद्यांचे एकमुखाने स्वागत केले. या कायद्याविरोधात होत असलेली निदर्शने विशिष्ट लोकांनी आणि येणाऱ्या काळात आपले महत्व आणि फायदा कमी होईल असा विचार करणाऱ्या मध्यस्थांनी घडवून आणली आहेत असा आरोप या सर्वांनी केला. शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी समाजविघातक घटकांनी तयार केलेल्या विरोधी वातावरणाचा सामना करण्यासाठी परिसरातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचून त्याच्या मनातील शंका दूर करू असा शब्द चर्चेत भाग घेणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांनी दिला.

 

* * *

B.Gokhale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1663228) Visitor Counter : 90