नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
आयआरईडीएचे मुंबईत शाखा कार्यालय सुरू
महाराष्ट्र विभागातील कंपनीच्या कर्जदार आणि भागधारकांच्या सुलभतेसाठी शाखा
Posted On:
26 SEP 2020 6:03PM by PIB Mumbai
भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्था लिमिटेड (आयआरईडीए) ने मुंबईत कर्जदार आणि भागधारकांच्या सुविधेसाठी शाखा कार्यालय सुरू केले आहे. केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत असलेली आयआरईडीए मिनि रत्न (श्रेणी– I) संस्था आहे. संस्थेची चेन्नई आणि हैदराबाद येथे यापूर्वीच शाखा कार्यालये सुरु करण्यात आली आहेत.
आयआरईडीएचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार दास यांनी संचालक (तांत्रिक) चिंतन शाह यांच्या उपस्थितीत अंधेरी पूर्व, मुंबई येथे कार्यालयाचे उद्घाटन केले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, व्यवसाय विस्तार करण्यासाठी मुंबई शाखा महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हे प्रदेशातील कंपनीच्या कर्जदारांना आणि भागधारकांना सुलभतेने सेवा प्रदान करेल.
मुंबई ही आर्थिक राजधानी आहे आणि परिसरात आयआरडीएच्या व्यवसायावर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित करून शाखा सुरू करणे ही बऱ्याच काळापासूनची गरज होती. कोविड—19 परिस्थितीत ही शाखा संबंधितांना चांगलीच मदतीची ठरेल. कंपनी व्यवसायातील संभाव्यतेनुसार देशाच्या इतर भागात शाखा कार्यालये सुरू करण्यावर विचार करण्यात येईल, असे दास म्हणाले. कंपनीच्या विकेंद्रीकरणाची संकल्पना केंद्र सरकारच्या व्यवसाय सुलभता धोरणाचा भाग आहे.
आयआरईडीएविषयी:
आयआरईडीए गैर-बँकिंग वित्तीय संस्था म्हणून 1987 स्थापना केलेली एक सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनी आहे जी नवीन आणि अक्षय ऊर्जेच्या स्त्रोतांशी संबंधित प्रकल्पांच्या स्थापनेसाठी आणि विकासासाठी आर्थिक सहाय्य करते. ‘कायमस्वरुपी ऊर्जा’ (ENERGY FOR EVER) हे कंपनीचे ब्रीद आहे. आयआरईडीएचे कॉर्पोरेट आणि नोंदणीकृत कार्यालय नवी दिल्ली येथे आहे.
***
B.Gokhale/ S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1659345)
Visitor Counter : 212